बच्चन, अमिताभ :  (११ ऑक्टोबर १९४२). हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता. जन्म अलाहाबाद येथे. त्यांचे वडील ⇨ हरिवंशराय बच्चन  हे हिंदी साहित्यातील ख्यातनाम कवी होते. त्यांच्या आईचे नाव तेजी बच्चन. अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवूड महाविद्यालयात झाले. त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली.

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी कोलकाता येथे एका कंपनीत काम केले. नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी (१९६९) या चित्रपटात सर्वप्रथम भूमिका मिळाली. त्यानंतर हृषीकेश मुखर्जीदिग्दर्शित आनंद (१९७१) या चित्रपटात त्या वेळचे लोकप्रिय सुपरस्टार कलाकार राजेश खन्ना यांच्यासमवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला. नमकहराम (१९७२, दिग्द. हृषीकेश मुखर्जी) या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्यापाठोपाठ आलेल्या जंजीर (१९७३, दिग्द. प्रकाश मेहरा) चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका विशेष गाजली आणि येथूनच त्यांची संतप्त तरुणाची (अँग्री यंग मॅन) प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली. प्रचलित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या संतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त घनगंभीर आवाज आणि गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच ‘सुपरस्टार’ (अभिनयसम्राट) पदावर पोचले व रूपेरी पडद्यावर जणू अमिताभयुग सुरू झाले. आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. बच्चन हे त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. आतापर्यंत त्यांनी सुमारे १६८ चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी, लोकप्रिय चित्रपटांत अभिमान (१९७३, दिग्द. हृषीकेश मुखर्जी), दीवार (१९७५, दिग्द. यश चोप्रा), शोले (१९७५, दिग्द. रमेश सिप्पी), कभी कभी (१९७६, दिग्द. यश चोप्रा), अमर अकबर अँथनी (१९७६, दिग्द. मनमोहन देसाई), मुकद्दर का सिकंदर (१९७८, दिग्द. प्रकाश मेहरा), त्रिशूल (१९७८, दिग्द. यश चोप्रा), डॉन (१९७८, दिग्द. चंद्रा बारोट), काला पत्थर (१९७९, दिग्द. यश चोप्रा), नसीब (१९८०, दिग्द. मनमोहन देसाई), लावारिस (१९८१, दिग्द. प्रकाश मेहरा), सिलसिला (१९८१, दिग्द. यश चोप्रा), नमकहलाल (१९८२, दिग्द. प्रकाश मेहरा), कुली (१९८३, दिग्द. मनमोहन देसाई), शराबी (१९८४, दिग्द. प्रकाश मेहरा), अग्निपथ (१९९०,दिग्द. मुकुल आनंद) यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल.

बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाज हे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पार्श्वनिवेदनही दिले आहे. त्यांत भुवनशोम (१९६९, दिग्द. मृणाल सेन), शतरंज के खिलाडी (१९७८, दिग्द. सत्यजित रे), लगान (दिग्द. आशुतोष गोवारीकर) आदी चित्रपटांचा उल्लेख करता येईल.

ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार जया बच्चन (भादुरी) या त्यांच्या पत्नी आहेत. १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन व सून ऐश्वर्या राय हेही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे सुप्रसिद्ध कलावंत आहेत.

१९८४ मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले. राजकारणातली त्यांची कारकीर्द अल्पकालीन ठरली. तीन वर्षांनंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या लोकप्रियतेचे एक उदाहरण म्हणजे, १९८२ साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगी त्यांना अपघात झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्या वेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या.

आतापर्यंत त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषणʼ व ‘पद्मविभूषणʼ या किताबांनी गौरविले आहे. यांशिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत. विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत. चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला (२९ डिसेंबर २०१९).

त्यांनी १९९६ मध्ये ‘ए बी सी एल्’ (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि.) ही चित्रपटनिर्मितिसंस्था स्थापन केली होती. आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली. २००० मध्ये कौन बनेगा करोडपती या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनाने घालून दिला. आजही ही मालिका भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय व वाहिन्यांना सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी मालिका म्हणून ओळखली जाते. प्रारंभी स्टार टीव्हीवर व नंतर सोनी टीव्हीवर ही मालिका आजही सुरू आहे. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी आपल्या भूमिकांचा बाज बदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो. मोहब्बते (२०००), कभी खुशी कभी गम (२००१), बागबान (२००३), ब्लॅक (२००५), सरकारराज (२००८), पा (२००९) इ. चित्रपटांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.

अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही सुरू असून वयाच्या सत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

समीक्षक : संतोष पाठारे