ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्याजवळची जगातील सर्वांत लांब, मोठी व सुप्रसिद्ध प्रवाळभित्ती (प्रवाळ खडक). या प्रवाळभित्तीची लांबी सुमारे २,००० किमी. आणि क्षेत्रफळ सुमारे ३,५०,००० चौ. किमी. आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात असलेल्या क्वीन्सलँड राज्याच्या किनाऱ्याला साधारण समांतर, वायव्य‌‌-आग्नेय दिशेत ही प्रवाळभित्ती पसरलेली आहे. किनाऱ्यापासूनचे तिचे अंतर १६ ते १६० किमी. च्या दरम्यान आहे. उत्तर भागात हे अंतर कमी, तर दक्षिण भागात जास्त आहे. अगदी उत्तर भागात असलेल्या टॉरस सामुद्रधुनीपासून दक्षिणेस मकरवृत्ताजवळील स्वाईन रीफपर्यंतच्या सागरमग्न खंडभूमीवर तिचा विस्तार आढळतो. प्रवाळभित्तीचा उत्तर भाग पॅसिफिकच्या कोरल समुद्रात आहे. प्रवाळ खडक, प्रवाळद्वीपे, वाळूचे दांडे, खाड्या, सामुद्रधुन्या इत्यादींची जटिल रचना या प्रवाळभित्तीत आढळते. यामध्ये प्रामुख्याने अनुतट आणि रोधक अशा दोन प्रकारच्या  प्रवाळभित्ती आढळतात. अनुतट प्रवाळभित्ती प्रामुख्याने बेटांच्या किनाऱ्याजवळ, तर रोधक प्रवाळभित्ती किनाऱ्यापासून दूर अंतरावर असतात. येथे सुमारे २,१०० लहानलहान स्वतंत्र प्रवाळभित्ती असून सुमारे ८०० अनुतट प्रवाळभित्ती आहेत. नॉर्थबरलँड, कंबरलँड, पाम बेटे, व्हाइट संडे इत्यादी लहानमोठ्या सुमारे ९०० प्रवाळद्वीपांचा या प्रदेशात समावेश होतो. ग्रेट नॉर्थईस्ट चॅनेल, फ्लिंडर्स पॅसेज, ट्रिनिटी ओपनिंग इत्यादी सागरी भागांनी ही भित्ती अनेक ठिकाणी तुटक तुटक झाली आहे. क्वीन्सलँडचा किनारा व महासागर यांदरम्यान प्रचंड अवरोधक भिंतीप्रमाणे असल्याने तिला ‘ग्रेट बॅरिअर रीफ’ हे नाव रूढ झाले आहे. उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे हिचे स्वरूप विस्कळीत आहे. या प्रवाळभित्तींलागतच्या जलभागातील पाणी स्फटिकांसारखे इतके निर्मळ असते की, ३० मीटर खोलीपर्यंतचेही स्पष्टपणे दिसू शकते.

प्रवाळ प्राण्यांपासून प्रवाळ खडकांची निर्मिती होते. समुद्रात तरंगणाऱ्या या प्राण्यांची शरीरे पिशवीप्रमाणे असून त्यांच्या सांगाड्यात चुन्याचे प्रमाण जास्त असते. एक प्राणि मेला की, त्याच्याच बैठकीवर दुसरा प्राणि आपले चुनखडीचे वेस्टन तयार करतो. अशा रीतीने या प्राण्यांची मृत शरीरे समुद्रतळभागावर एकावर एक  साचली जातात. हा विस्तार उभा व आडवा होत राहतो. वरच्या थरातील सांगाड्यांच्या वजनामुळे खालचे थर घट्ट व कठीण होतात. अशाप्रकारे एकसंध प्रवाळ खडक निर्माण होतात. हे खडक मधमाशांच्या पोळ्यांसारखे दिसतात.

ग्रेट बॅरिअर रीफच्या निर्मितीची सुरुवात निश्चित सांगता येत नाही; परंतु हिमयुगाच्या काळातील महासागराच्या पातळीतील बदलांमुळे रीफच्या वाढीमध्ये अनेक अडथळे आले असावेत. सुमारे १४,००० वर्षांपूर्वी आजच्या पातळीपेक्षा ती कमी होती. त्यामुळे ही प्रवाळभित्ती पाण्याच्या पृष्ठभागापेक्षा उंचावलेली होती. सुमारे ६,००० ते ८,००० वर्षांपूर्वी महासागराला आत्ताची पातळी प्राप्त झाली व किनाऱ्याच्या उथळ भागात प्रवाळांच्या वाढीस सुरुवात झाली असावी.

ब्रिटिश समन्वेषक कॅप्टन जेम्स कुक यांनी इ. स. १७७० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याचा शोध लावला. तेव्हापासून या प्रवाळशैलभित्तीच्या संशोधनास सुरुवात झाली. कुक यांनी या भित्तीचे समन्वेषण केले. त्यांनी या भित्तींदरम्यान असलेल्या खाड्या, सामुद्रधुन्या, नागमोडी वळणांचे जलभाग यांचे आराखडे तयार केले. इ. स. १९२८-२९ मध्ये काढलेल्या ग्रेट बॅरिअर रीफ मोहिमेतून येथील प्रवाळांची शारीरक्रियाविषयक आणि प्रवाळशैलभित्तीची पारिस्थितिकीय महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली.

ग्रेट बॅरिअर रीफ या प्रवाळभित्तीवर विविध प्रकारची कासवे आणि पक्षी विणीच्या हंगामात येतात. चित्तवेधक, चित्रविचित्र सागरी प्राणी, विविध प्रकारच्या प्रवाळांच्या सुंदर नैसर्गिक बागा, सागरी वनस्पती यांसाठी ग्रेट बॅरिअर रीफ प्रसिद्ध आहे. येथे प्रवाळांच्या सुमारे ४०० जाती आढळतात. त्यामुळे हौशी प्रवाशांचे हे एक आकर्षणस्थळ बनले आहे. येथील बेटांवर प्रवाशांसाठी विश्रामगृहे व अन्न्य पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. तसेच नवनवीन सागरी क्रीडाप्रकारांमुळे या बेटांवर पर्यटन व्यवसायाची भरभराट झाली आहे. याबरोबरच खनिज तेलाचा शोध घेणे व दुर्मिळ जलचरांची शेती विकसित करण्याच्या विविध योजना कार्यान्वित आहेत. ‘द ग्रेट बॅरिअर रीफ मरीन पार्क ऑथॉरिटी’द्वारा या प्रदेशाचे संरक्षण केले जाते. पर्यटनासाठी एप्रिल – सप्टेंबर या महिन्यांचा कालावधी योग्य असतो. आज जगातील एक मोठे सागरी उद्द्यान म्हणून ग्रेट बॅरिअर रीफची प्रसिद्धी आहे. त्यामुळे १९८१ मध्ये संयुक्त राष्ट्र संघानेही हे वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक व सांस्कृतिक जागतिक वारसाक्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

समीक्षक : वसंत चौधरी