खोलापूर हे अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पश्चिमेस सु. २९ किमी.वर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. यादव राजवंशाचा सेनापती खोलेश्वर याने खोलापूर हे गाव वसविल्याचा उल्लेख अंबेजोगाई येथील इ. स. १२२८-१२२९ च्या शिलालेखात आहे. आजचे गाव आणि त्यासभोवतालच्या परिसरात, मुख्यत्वाने नदी आणि गाव यांमधील भागात, प्राचीन वस्तीमुळे तयार झालेली पांढरी पाहावयास मिळते. १९७९-८० मध्ये नागपूर विद्यापीठाचे अजय मित्र शास्त्री आणि चंद्रशेखर गुप्त यांनी केलेल्या समन्वेषणात येथील पांढरीचा विस्तार आजच्या गावापासून नदीकाठावरील खोलेश्वराच्या मंदिरापर्यंत आढळून आला; परंतु सद्यस्थितीत यातील बरीचशी पांढरी नाहीशी झाली आहे. १९२८-२९ साली खोलापूर येथून प्राप्त रोमन बनावटीच्या मृण्मयी पदकांच्या प्रसिद्धीनंतर या स्थळाचे प्राचीनत्व सर्वप्रथम माहीत झाले. कदाचित याच आधारे कौंडिण्यपूरच्या उत्खनन अहवालातील विदर्भाच्या नकाशात खोलापूर हे सातवाहनकालीन स्थळ म्हणून दाखविण्यात आले असावे. एकोणीसशे साठच्या दशकात केलेल्या येथील उत्खननात एक तलाव आणि दोन भक्कम बांध्याच्या विहिरी (बाव) आढळल्या होत्या. पुढे नव्वदच्या दशकात व्ही. कांबळे आणि एस. नाईक यांना या ठिकाणावरून उत्तरेकडील काळ्या रंगाची झिलाईदार खापरे मिळाली. हे सर्व पुरावे येथील प्राचीन वस्तीचा विस्तार आणि काळ यांचे निदर्शक आहेत.
२००७-०८ आणि २००८-०९ या काळात डेक्कन कॉलेज, पुणे येथील भास्कर देवतारे यांनी या प्राचीन स्थळाचे उत्खनन केले. या उत्खननाचे तीन मुख्य हेतू होते: पहिला, येथील पांढरीचा कालानुक्रम समजून घेणे; दुसरा, पूर्णा आणि त्या अनुषंगाने पश्चिम विदर्भाचा प्राचीन इतिहास जाणून घेणे आणि तिसरा, येथील प्राचीन पीकपद्धतीचा अभ्यास करणे. उत्खनन आरंभ करण्यापूर्वी संपूर्ण खोलापूर सहा विभागांमध्ये विभागण्यात आले. यातील एकूण पाच ठिकाणी उत्खनन करण्यात आले. गावालगत नैर्ऋत्येला खोलापूर ते दर्यापूर मार्गावर उजव्या बाजूला जी पांढरी आहे, तिला स्थान (लोकॅलिटी) २ असे संबोधण्यात आले. येथे मिळालेल्या अवशेषांच्या आधारे इ. स. पू. चौथ्या शतकात खोलापूरला प्रथम वस्ती झाली, हे सिद्ध झाले. या स्थानाच्या वरील ५० सें.मी. स्तरातून नक्षीकाम असलेले मातीचे मणी, कर्णालंकार, त्रिरत्न पदक आणि आहत नाणे; तर साधारणत: १·०५ ते १·२ मी. खाली उत्तरेकडील काळ्या रंगाची झिलाईदार खापरे आणि त्यासोबत आहत नाणे मिळाले. २·६ ते २·८ मी. दरम्यान अर्ध-मौल्यवान दगडापासून तयार केलेले चकतीच्या आकाराचे कर्णभूषण आणि उत्कीर्णीत मुद्रा (head scratcher) मिळाली. या मुद्रेचा उपयोग काय असावा, याबाबत निश्चितपणे सांगणे शक्य नसले, तरी दोन मतप्रवाह आहेत. मोरेश्वर दीक्षित यांनी ‘डोक्यातील कोंडा काढण्यासाठी या वस्तूचा उपयोग होत असावाʼ, असे मत आपल्या त्रिपुरी उत्खनन अहवालात मांडले आहे (१९५५), तर ही मुद्रा ‘पूजा-विधीʼ वस्तू असावी, असे मत रेश्मा सावंत यांनी मांडले. येथील प्राप्त मडक्यांचे काठ व त्यांचे आकार यांच्या स्तरनिहाय अभ्यासातून १·३५ मी. आणि २·४ मी. दरम्यान त्यांच्यात लक्षणीय बदल झाल्याचे निदर्शनास आले. या सर्व पुराव्यांच्या आधारे स्थान क्र. २ येथे इ. स. पू. तिसऱ्या आणि चौथ्या शतकांत वस्ती होती असे सिद्ध झाले. २·४ मी.पेक्षा खालील पांढरीत नासपती (पेअर) या फळाच्या आकारातील मडक्यांचे काठ बहुसंख्य प्रमाणात मिळाले. अशा प्रकारची काठ असलेली मडकी उत्तर भारतात इ. स. पू. सहाव्या ते तिसऱ्या शतकांत प्रचलित होती. त्यावरून इ. स. पू. चौथ्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच उत्तर भारताचा विदर्भाशी असलेला संबंध अधोरेखित होतो आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या भौतिक संस्कृतीवरील प्रभाव लक्षात येतो. १·८ मी.पासून वरती विटा आणि कवेलू हे तुकड्यांच्या स्वरूपात आढळले. यावरून इ. स. पू. चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचा वापर येथे सुरू झाल्याचे सिद्ध होते. गावाच्या पूर्वेला असलेल्या पांढरीवर स्थान क्र. ५ येथेही वरील काळातील पुरावशेष प्राप्त झाले.
खोलापूर-दर्यापूर मार्गाच्या डाव्या बाजूला स्थान क्र. १ आहे. येथील पुरातत्त्वीय उत्खननातून खोलापूरपासून साधारणत: ८० किमी. पश्चिमेला असलेल्या प्राचीन भोनशी साम्य दाखविणाऱ्या वस्तू मिळाल्या. ज्यामध्ये माती, अर्धमौल्यवान दगड आणि शंख यांच्यापासून तयार केलेले मणी आणि अंगठ्या, मातीपासून तयार केलेली पदके, कर्णभूषणे, लहान आकारातील प्राणी आणि अर्चनाकुंडे, शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, हाडांपासून तयार केलेली अणकुचीदार हत्यारे आणि इतर पुरातन वस्तू, तसेच ताम्र आणि लोखंडाची उपकरणे यांचा समावेश होतो. तसेच जोड साच्यांचा (double mould) वापर करून तयार केलेले मातीचे विविध आकारांतील मणी, त्रिरत्न (साधी आणि नक्षीकाम असलेली), मनुष्य आणि युग्मपदकेही मिळाली. भोन आणि खोलापूर येथील खापरांमध्ये साधर्म्य आढळून आले. या पुराव्यांच्या आधारे इ. स. पू. पहिल्या आणि दुसऱ्या शतकांत या भागात वस्ती झाल्याचे सिद्ध होते. येथे मिळालेली नाणी पूर्णत: गंजलेली असल्याने ती अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकली नाहीत. या कालखंडातील पांढरी नदीपासून बरीच जवळ आहे. पांढरीच्या नदीकडील बाजूस आणि दक्षिणेला उंच मातीचे संरक्षक कडे पाहावयास मिळतात. नदीबाजूचा कडा तुटक स्वरूपात नदीकाठाने लांबपर्यंत पसरलेला आहे; तर पूर्वेकडील जमिनीची उंची वाढत गेल्याने दक्षिणेकडील कडा काही अंतरापर्यंत जाऊन सभोवतालच्या जमिनीशी एकरूप झालेला आढळून येतो. दोन्ही कडे ज्याठिकाणी ९० अंशामध्ये मिळतात तेथे उंच मातीचे टेकाड आहे, ज्याला मालाची टेकडी म्हणून गावकरी संबोधतात. या टेकाडावरील उत्खननात वरील काळाशी संलग्न खापरे आणि विटा मिळाल्या. तसेच संपूर्ण टेकाड आणि बाजूचे कडे हे माती टाकून तयार केल्याचे दिसून आले. यावरून स्थान क्र. १ मधील वस्तीचे नदीपासून येणाऱ्या मोठ्या पुरापासून संरक्षण करण्यासाठी हे मातीचे कडे बांधल्याचे, तर मालाची टेकडी म्हणजे दूरपर्यंत नजर ठेवण्यासाठी बांधलेले बुरूज असल्याचे सिद्ध झाले.
गावाच्या दक्षिणेला मुख्य रस्त्यापलीकडे जी पांढरी आहे, तिला स्थान क्र. ६ असे संबोधण्यात आले. येथेही स्थान क्र. १ प्रमाणे मोठ्या प्रमाणात अर्धमौल्यवान दगड, मृण्मणी व पदके आणि इतर प्रकारच्या पुरातन वस्तू मिळाल्या. हस्तिदंतापासून तयार केलेल्या कंगव्याचा यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल. परंतु १ व ६ या दोन्ही स्थानांवरील नक्षीयुक्त मृण्मणी आणि पदके यांच्यात फरक आढळून येतो. सातवाहन कालखंडाशी निगडित इतर ठिकाणांहून मिळालेल्या अलंकारांशी साम्य दाखवणारे येथील मातीचे अलंकार आहेत. जोडसाच्यांमध्ये तयार केलेली मनुष्य आणि युग्मपदके येथे नाहीत. जोडसाच्यांमध्ये तयार केलेले आणि आतून पोकळ असलेले मातीच्या प्रतिमांचे अवशेष हे येथील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या पद्धतीने तयार करण्याचे तंत्रज्ञान इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत प्रचलित असल्याचे सर्वमान्य आहे. याआधारे वरील ठिकाणी इ. स. च्या सुरुवातीपासून ते साधारणत: तिसऱ्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत वस्ती असल्याचे सिद्ध होते.
स्थान क्र. ३ गावाच्या सीमेलगत पश्चिमेला असून येथे विटांच्या आणि मातीच्या कड्या वापरून बांधलेल्या विहिरी आहेत. नदीकाठी दोन ठिकाणी प्राचीन विटा आणि कवेलू तयार करण्याच्या अवशेषयुक्त जागा सापडल्या आहेत. प्राचीन धान्यांच्या अवशेषांमध्ये तांदूळ, गहू, उडीद, तूर इ. धान्यांचा समावेश होतो.
यावरून खोलापूरच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कालखंडांत वस्ती झाल्याचे निदर्शनास येते. प्रारंभापासून खोलापूर हे या प्रदेशातील एक महत्त्वाचे राजकीय आणि व्यापारी केंद्र असावे. या प्राचीन स्थळावरून मध्ययुगीन नाणी आणि खापरे उपलब्ध झाली आहेत.
संदर्भ :
- Archaeological Survey of India, ‘IAR-Indian Archaeology : A Review,ʼ New Delhi, 1979-80.
- Deotare, B. C.; Shete, G.; Sawant, R. & Naik, S. ‘Preliminary Report on Excavation at Kholapur, District Amravati, Maharashtra,ʼ Man and Environment, 2012.
- Jain, B. ‘An Inventory of the Hoards and finds of coins and seals from Madhya Pradesh,ʼ The Journal of The Numismatic Society of India, vol.19, 1957.
- Kamble, V. & Naik, S. ‘Pottery Assemblage from Three New Historical/Protohistoric Sites in Purna Valley,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 1995.
- Sawant, Reshma ‘Head Scratchers : Fallacy and Reality,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 2006-2007.
- Shete, G. ‘Kholapur Pottery : An Attempt to Develop a Typological Basis for the Chronological Reconstruction of the Vidarbha Iron Age and Early Historic period,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 2014.
समीक्षक – भास्कर देवतारे