प्राचीन ऐतिहासिक स्थळ असलेले कोटलिंगल हे ठिकाण तेलंगण (भूतपूर्व आंध्र प्रदेश) राज्यातील करीमनगर जिल्ह्यात गोदावरी नदीच्या उजव्या तीरावर आहे. या ठिकाणी काही शेतकऱ्यांना शेतीची कामे करतांना काही नाणी सापडली. यांतील एकूण ९४ नाणी पी. व्ही. परब्रह्म शास्त्री यांनी अभ्यासली व प्रकाशित केली (Numismatic Digest, जून १९७८ व डिसेंबर १९७९). या नाण्यांचे महत्त्व लक्षात घेता तत्कालीन आंध्र प्रदेश राज्य पुरातत्त्व विभागाने कोटलिंगलच्या परिसरात सर्वेक्षण व उत्खनन केले. १९७९- १९८३ या कालावधीत करण्यात आलेल्या उत्खननात ४७० नाणी सापडली. या नाण्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे : आहत नाणी, लेखविरहित नाणी, गोभद, कमवायस, नरन, समगोप यांची  सातवाहनपूर्वकाळातील नाणी तर सातवाहन, सातकणीस, सिमुक, पुळुमावीस, महातलवार, महासेनापती या लेखांची सातवाहनकालीन नाणी.

आहत नाणी : चांदी व तांबे या दोन्ही धातूंमधील गोलाकार तसेच चौरसाकृती व आयताकृती नाणी सापडली. त्यांच्यावर सूर्य, षडरचक्र (six-armed symbol), वृषभ चिन्ह (taurine), तीन कमानी असलेला पर्वत, कुंपणात झाड व स्वस्तिक या प्रकारची चिन्हे आढळतात. या ठिकाणी आहत नाण्यांच्या शोधामुळे कोटलिंगल हे स्थान प्राचीन असल्याचे कळते.

लेखविरहित ओतीव नाणी : या ठिकाणी सापडलेली लेखविरहीत ओतीव नाणी ही शिसे, तांबे व पोटीन (तांबे व शिसे यांचा मिश्र धातू) या धातूंमध्ये आढळतात. यांमध्ये बैल व फुल, हत्ती, घोडा, सिंह आणि चक्र या प्रकारची नाणी आहेत.

सातवाहनपूर्वकाळातील  नाणी : 

गोभद लेखाची नाणी : ही नाणी तांबे,  पितळ व पोटीन या धातूंमध्ये चौकोनी व आयताकृती आकारात आहेत. या नाण्यांच्या दर्शनी भागावर धनुष्यबाण, वेदिकेसह वृक्ष, तीन कमानी असलेला पर्वत व ब्राह्मी लिपीतील गोभदस हा लेख आढळतो. मागील बाजू रिकामी. आंध्र प्रदेशात सापडलेली ही पहिली लेख असलेली नाणी असून ती ठसा पद्धतीने तयार केली आहेत. ही नाणी नक्की कोणत्या राजवंशाची आहेत, याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.

नरन लेखाची नाणी : तांबे व शिसे या धातूंमध्ये आढळणारी ही नाणी चौरसाकृती व आयताकृती आकारात सापडतात. त्यांच्या दर्शनी भागावर सिंह, त्रिकोणी शीर्ष चिन्ह (triangle headed standard), उज्जैन चिन्ह आणि वृक्ष चिन्ह ही चिन्हे व ब्राह्मी लिपीतील सिरी नरन  हा लेख तर मागील बाजूवर कमानींसह पर्वत, नंदीपाद किंवा त्रिरत्न आणि फुल ही चिन्हे आढळतात.

कामवायस लेखाची नाणी : ही नाणी तांबे, पितळ व शिसे या धातूंमध्ये आढळली आहेत. ती चौरस ते चौकोनी या आकारांमध्ये आढळतात. नाण्यांच्या दर्शनी भागावर धनुष्य-बाण, स्वस्तिक, बैल आणि कमानीचा पर्वत ही चिन्हे व कामवयसीस हा लेख सापडतो. मागील बाजूवर नंदीपाद हे चिन्ह दिसून येते.

सिरीवयस लेखाची नाणी : तांबे व शिसे या धातूंमध्ये आढळणारी ही नाणी चौरस, आयत अथवा गोलाकारात सापडतात. दर्शनी भागावर धनुष्यबाण, षडचक्र, हत्ती आणि वृक्ष ही चिन्हे व सिरीवयस  हा लेख, तर मागील बाजूवर नंदीपाद व कमानीचा पर्वत असे त्यांचे स्वरूप दिसून येते.

समगोप लेखाची नाणी : ही नाणी तांबे, शिसे व पोटीन या धातूंमध्ये व चौरस, चौकोनी अगर अनियमित आकारांमध्ये आढळतात. नाण्यांच्या दर्शनी भागावर बैल, धनुष्य-बाण, कुंपणातील झाड, ही चिन्हे आणि रञो समगोप  हा लेख दिसून येतो, तर मागील बाजूवर नंदीपाद हे चिन्ह सापडते. कोटलिंगल येथे सापडलेल्या या नाण्यांमुळे समगोप हा राजा प्रथम ज्ञात झाला. त्याच्या काही नाण्यांवर उज्जैन चिन्हाने पुनः अंकन (counter struck) केलेले दिसून येते.

या व्यतिरिक्त अजूनही काही सातवाहनपूर्व नाणी सापडली आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर बैल, तर मागील बाजूवर धनुष्य बाण आढळतो. ही नाणी नक्की कोणत्या राजाची अगर राजवंशाची आहेत, हे अद्यापि कळू शकलेले नाही.

सातवाहनकालीन नाणी :

चि(छि)मुकची नाणी : कोटलिंगल येथे सिरी छिमुक किंवा रञो सिरी छिमुक हा ब्राह्मी लिपीतील लेख असणारी काही नाणी आढळली. तांबे व पोटीन या धातूंमध्ये सापडणारी ही नाणी चौरस किंवा चौकोनाकृती असून नाण्यांच्या दर्शनी भागावर उज्जैन चिन्ह, पानांसह वृक्ष, हत्ती, बिंदुसह वर्तुळ, त्रिकोणी शीर्ष, श्रीवत्स आणि कमानींसह पर्वत ही चिन्हे आढळतात, तर मागील बाजूवर उज्जैन तसेच स्वस्तिक ही चिन्हे दिसून येतात. हा छिमुक म्हणजे सातवाहन घराण्याचा संस्थापक सिमुक किंवा चिमुक असावा, असा एक मतप्रवाह आहे; तथापि याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही.

सातकर्णीची नाणी : रञो सिरी सातकणीस  असा लेख असणारी काही चौकोनी व चौरसाकृती नाणी तांबे व पोटीन या धातूंमध्ये आढळली आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर हत्ती, स्वस्तिक, कुंपणातील वृक्ष, नागमोडी रेषा ही चिन्हे, तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह व स्वस्तिक दिसून येतात. तथापि पहिल्या किंवा दुसऱ्या यांपैकी नक्की कोणत्या सातकर्णीची ही नाणी असावीत, हे कळणे कठीण आहे.

सतस लेखाची नाणी : येथे रञो सिरी सतस, रञो सतस, रञो सिरी सतिस असे लेख असणारी तांबे व शिसे या धातूंची नाणी आढळली. यांतील बहुतांश नाणी गोलाकार असून क्वचित चौकोनाकृती आढळतात. नाण्यांच्या दर्शनी भागावर हत्ती, त्रिरत्न चिन्ह, बैल, कुंपणातील झाड, नागमोडी रेषा ही चिन्हे असून मागील बाजूवर उज्जैन व स्वस्तिक ही चिन्हे सापडतात. नाणेघाट येथील नागनिकेच्या लेखात ज्याचा उल्लेख आढळतो तो हा सती असावा, असे एक मत आहे.

वाशिष्ठिपुत्र पुळुमावीची नाणी : या उत्तर सातवाहनकालीन राजाची तांब्याची चौरस व चौकोनाकृती नाणी असून त्यांच्या दर्शनी भागावर हत्तीची प्रतिमा आणि श्रीवत्स चिन्हे सापडतात. नाण्यांवर रञो पुळुमाविस  हा लेख सापडतो. याबरोबरच वासिष्ठीपुत्र सातकर्णी या उत्तर सातवाहनकालीन राजाची अतिशय कमी नाणी कोटलिंगल येथे आढळून आली.

याशिवाय महातलवार, महासेनापती  व सेबक  या लेखाची नाणीही सापडली. महातलवारांची व महासेनापतींची  नाणी तांब्यामध्ये असून चौरसाकृती व आयताकृती आढळतात. महातलवारांच्या नाण्यांच्या दर्शनी भागावर घोड्याची प्रतिमा असून त्यावर महातलवरस  हा लेख, तर मागील बाजूवर झाड, तीन कमानींचा पर्वत व नागमोडी रेषा ही चिन्हे आढळतात. महासेनापतींच्या नाण्यावर दर्शनी भागावर स्वस्तिक, तर मागील बाजूवर तीन कमानींचा पर्वत, कुंपणातील झाड आणि स्वस्तिक दिसतात. सेबकांच्या नाण्यांच्या दर्शनी भागावर सेबकास  हा लेख, स्वस्तिक, चक्र, कुंपणात झाड व नंदीपाद ही चिन्हे असून मागील बाजूवर तीन कमानींचा पर्वत आढळतो.

कोटलिंगल येथील नाणी सातवाहनपूर्वकाळ ते सातवाहन काळ या कालावधीतील या प्रदेशातील नाण्यांमधील व पर्यायाने चलनव्यवस्थेमधील सातत्य अधोरेखित करतात. सातवाहनपूर्वकाळात कोणकोणते राजे किंवा  राजवंश होऊन गेले, त्याची प्रथम माहिती कोटलिंगल येथे झालेल्या नाण्यांच्या उपलब्धीमुळे ज्ञात होते.

संदर्भ :

  • Reddy, Raja Deme, Kotalingala Coins, Delhi, 2013.
  • Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980.
  • Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.

                                                                                                                                               समीक्षक : पद्माकर प्रभुणे