अर्थशास्त्रातील नव-अभिजातवादी विचारवंताचा एक समूह. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील अभ्यासकांच्या विचारप्रवाहातून हा संप्रदाय निर्माण झाला. हा केन्सविरोधी आर्थिक विचारवादी अर्थतज्ज्ञांचा संप्रदाय असल्याचे दिसून येते.

सन १९३० च्या दशकात अर्थतज्ज्ञ फ्रँक हाइनमन नाइट, जेकब विनर, हेन्री सायमन, जॉन्सन गेल, शुल्झ थिओडोर यांच्यापासून शिकागो संप्रदायाची सुरुवात झाल्याचे मानण्यात येते; परंतु खऱ्या अर्थाने या संप्रदायातील प्रभावी अर्थतज्ज्ञ म्हणून मिल्टन फ्रिडमन यांचे नाव घ्यावे लागेल. या संप्रदायातील तेरा अर्थतज्ज्ञांना आत्तापर्यंत नोबेल स्मृती पारितोषिके मिळाली आहेत. त्यात मिल्टन फ्रिडमन, जॉर्ज जोसेफ स्टिग्लर, मर्टन एच. मिलर, रोनाल्ड कोझ, गॅरी बेकर, रॉबर्ट एमर्सन लूकास इत्यादींचा समावेश आहे. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील हा एक प्रभावी अर्थविचार मुद्रावादी म्हणूनही ओळखला जातो. मुद्रावादी आर्थिक विचारप्रणालीत देशाचे फक्त मौद्रिक धोरण सर्वाधिक महत्त्वाचे असून त्याचा वापर अर्थव्यवस्थेतील सर्व समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावीपणे केला जातो, असे मानले आहे. १९७० च्या दशकात अमेरिका व इतर विकसित देशांतील बेरोजगारी व किंमतवाढ रोखण्यासाठी अमेरिकन फेडरल बँकेचे अध्यक्ष ग्रिन स्पॅन यांनीदेखील अमेरिकेच्या आर्थिक धोरणात याचाच आधार घेतल्याचे लक्षात येते. मुद्रावादाने केन्सवादी आर्थिक विचारांना विरोध करून पर्यायी विचार प्रस्तुत केले. फ्रीडमन यांनी फिशर यांच्या चलन संख्यामान सिद्धांताची पुनर्मांडणी केलेली आढळते.

शिकागो संप्रदायातील अर्थतज्ज्ञांनी १९८० व १९९० च्या दशकात अनेक कठीण, अप्रिय आणि मतभेदजन्य विषयांचे तर्कसंगत व बुद्धीप्रामाण्यवादाने विश्लेषण करून त्यासाठी व्यवहार्य उपाय सुचविल्याचे दिसते. शिकागो संप्रदायी अभ्यासकांचे अभ्यासविषय सत्य जगतातील असून अर्थशास्त्राबरोबरच इतिहास, विधीशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विविध शाखांमधील अनेक समस्यांची सोडवणूक करणारे आहेत.

शिकागो संप्रदायाच्या दुसऱ्या फळीत फ्रीडमन, स्टिगलर व कोझ यांची नावे घेतली जातात; तर तिसऱ्या फळीमध्ये गॅरी बेकर, लुकास फामा, रॉबर्ट फोगेल, यूजीन एफ. फॅमा, जेम्स जोसेफ हेकमन आणि लार्स पीटर हॅन्सेन यांचा समावेश होतो.

शिकागो संप्रदायानुसार अर्थव्यवस्थेतील कार्यक्षम संसाधन वाटपासाठी मुक्त बाजार यंत्रणा, मुक्त निवड, कमीतकमी शासन हस्तक्षेप आणि अल्प व स्थिर दराने मौद्रिक वाढ हे महत्त्वाचे आधार आहेत. वैयक्तिक आणि आर्थिक स्वातंत्र्याला या संप्रदायात सर्वोच्च मूल्य आहे.

शिकागो संप्रदायातील विश्लेषणात संख्याशास्त्र, गणिती तंत्रे आणि गटचर्चा यांचा प्रामुख्याने वापर झाल्याचे दिसते. त्यातूनच तर्कसंगत मांडणीने उपाययोजना सुचविलेल्या आहेत व दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील समस्यांना प्रात्यक्षिक परिमाण दिल्याचे दिसते.

याच काळातील ऑस्ट्रियन संप्रदायी विचारसरणी लुडविग फ्रॉम मॉयसेस आणि फ्रिड्रिक ऑगस्ट फोन हायेक यांच्या आर्थिक विश्लेषणातून निर्माण झालेली आहे. शिकागो संप्रदायी व ऑस्ट्रियन संप्रदायही मुक्त बाजारव्यवस्थेचे पुरस्कर्ते असले, तरी त्यांची विचारधारा इतर बाबतीत विरोधी आहे.

संदर्भ :

  •  Ebestein, Lanny, Chicagonomics, London, 2015.
  •  Emmett, Ross B., The Elgar Companion to the Chicago School of Economics, Michigan, 2010.
  •  Mokhiber, Russel, How Milton Friedman & Chicago Economics Undermined, America, New York, 2011.
  •  Stigler, J. George, Chicago Studies in Political economy, Chicago, 1988.

समीक्षक : राजस परचुरे