मिलर, मर्टन एच. : (१६ मे १९२३ – ३ जून २०००). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मिलर यांना वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनाबद्दल अर्थतज्ज्ञ हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ (Harry Max Markowitz)विल्यम एफ. शार्पे (William F. Sharpe) यांच्या बरोबरीने १९९० मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार विभागून देण्यात आला. मिलर हे सुप्रसिद्ध अशा मोदीग्लीयानी-मिलर प्रमेयाचा सहसंशोधक आहे.

मिलर यांचा जन्म बॉस्टनमधील मॅसॅच्यूसेट्स येथे झाला. त्यांनी १९४४ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठातून बी. ए. पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमेरिकेच्या ट्रेझरी विभागात त्यांनी नोकरी पत्करली. पुढे १९५२ मध्ये बाल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. पदवी मिळविली. नंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया-पिट्सबर्गमधील त्या वेळेच्या Carnegie Institute Of Technology (सध्याचे Carnegie Mellon University) येथे १९६१ अखेर अध्यापनकार्य केले. त्याच वर्षी शिकागो विद्यापीठाच्या Graduate School Of Business Administration (बूथ स्कूल) या संस्थेत अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेथेच निवृत्तीपर्यंत (१९९३) व त्यानंतरही काही वर्षे अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनकार्य चालू ठेवले होते.

मिलर यांनी आपल्या व्यापारी पेढीचे (Company) वित्तीय संरचना व तिचे वास्तव मूल्य या गोष्टी बहुतांशी स्वतंत्र असल्याचे मोदीग्लीयानी-मिलर प्रमेयाद्वारे सिद्ध केले. फ्रँको मोदीग्लीयानी (Franco Modigliani) हे त्यांचे कार्नेगी इन्स्टिट्यूटमधील सहकारी प्राध्यापक होते. तत्पूर्वी मार्कोव्हिट्झ व शार्पे यांनी अंतर्भूत जोखीम व संभाव्य लाभ तसेच मालमत्ता मूल्यनिर्धारण प्रणालीच्या आधारे गुंतवणूक करणे फायद्याचे असते, या प्रकारची मांडणी केली होती. मिलर यांची गुंतवणूक प्रणाली ही या दोघांच्या संशोधनकार्याचा विस्तार असून त्यामध्ये कंपनीची मालमत्ता संरचना व लाभांश धोरण, तसेच बाजारमूल्य व भांडवल खर्च यांमधील परस्परसंबंधांची मांडणी करणारे आहे. एखादी उत्पादन करणारी कंपनी भांडवल कशा रीतीने उभे करते, यापेक्षा त्यापासून किती नफा मिळतो हे जास्त महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. निगम (Corporation) वित्तव्यवस्थापन या क्षेत्रासंबंधीचे सैद्धांतिक व अनुभवजन्य (Empirical) विश्लेषण करणारी गुंतवणूक प्रणाली हे या संदर्भातील त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

मिलर यांनी सहकारी प्राध्यापक फ्रँको मोदीग्लीयानी यांच्या सहकार्याने ‘The Cost Of Capital, Corporation Finance And The Theory Of Investmentʼ हा शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यात निगम वित्तव्यवस्थापनाबाबतच्या पारंपरिक मतप्रवाहाबद्दल त्यांनी काही मूलभूत आक्षेप नोंदविले. कंपनी, कर्जे (ऋण) व साधारण भाग-भांडवल यांत योग्य गुणोत्तर प्रमाण (Ratio)  ठेवून भांडवल खर्च कमी करू शकते, हे गृहीत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वत: विकसित केलेल्या गुंतवणूक प्रणालीनुसार त्यांनी असे दाखवून दिले की, कर्जे व स्वकीय भांडवल (Debt-Equity Ratio) यांत विशिष्ट प्रमाण असणे आवश्यक नाही. ते कितीही असले, तरी कंपनी व्यवस्थापनाने कंपनीच्या निव्वळ संपत्तीत जास्तीत जास्त भर कशी पडेल व करदायित्व कमीत कमी कसे राहील, याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. भाग व कर्जरोख्यांचे बाजारमूल्य भांडवल बाजारातील घटकांना व मध्यस्थांना ठरवू द्यावे. कंपनीने त्यात न पडता आपली भांडवल संरचना (Capital Structure) करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. तसेच देशाच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थनही त्यांनी केले.

मिलर यांनी स्वतंत्रपणे तसेच सहलेखक म्हणून लिहिलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : दि थिअरी ऑफ फायनान्स (१९७२ – सहलेखक), मॅक्रोइकॉनॉमिक्स : निओक्लासिकल इंट्रोडक्शन (१९७४ – सहलेखक), एसेज इन अप्लाइड प्राइस थिअरी (१९८० – सहलेखक), मॅक्रोइकॉनॉमिक्स (१९८६ – सहलेखक), फायनान्सिअल इनोव्हेशन्स ॲण्ड मार्केट व्हॉलटिलिटी (१९९१), मर्टन मिलर ऑन डेरिव्हेटिव्ह्ज (१९९१) इत्यादी.

मिलर यांना नोबेल स्मृती पुरस्काराव्यतिरिक्त त्यांच्या संशोधनकार्याबद्दल पुढील सन्मानही लाभले : इकॉनॉमेट्रिक सोसायटी – छात्रवृत्ती (१९७५), अमेरिकन फायनान्स असोसिएशन – अध्यक्ष (१९७६), शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड – संचालक (१९८३ – १९८५), शिकागो मर्कंटाइल एक्चेंज-पब्लिक गव्हर्नर (१९९०).

मिलर यांचे इलिनॉय (Chicago) येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा