एक आसनप्रकार. मयूरासनात शरीररचनेचा आकृतिबंध मोरासारखा दिसतो म्हणून त्याला मयूरासन हे नाव आहे. हठप्रदीपिका व घेरण्डसंहिता या दोन्ही ग्रंथांमध्ये या आसनाचे वर्णन आढळते व या वर्णनात साम्य दिसून येते. शारीरिक क्षमता उच्चतम ठेवण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे.
कृती : जमिनीवर अंथरलेल्या आसनावर टाचा व गुडघे यांच्या सहाय्याने बसावे. समोर झुकून दोन्ही तळहात एकमेकांजवळ बोटे आपल्या दिशेने करून गुडघ्यांच्या पुढे जमिनीवर ठेवावेत. दोन्ही हातांची कोपरे नाभीच्या किंचित खाली पोटाला टेकतील अशा रितीने ओणवे होऊन शरीराचा भार समोरच्या बाजूस टाकावा. याचवेळी दोन्ही पाय मागे, सरळ व एकत्र ठेवून जमिनीपासून ९-१० इंच वर उचलावेत. आता शरीराचा संपूर्ण भार हातांवर येतो. त्यामुळे शरीराचे वजन पेलत दोन्ही हातांवर शरीर तोलून धरायचे असते. समोर बघावे व धड आणि पाय एका सरळ रेषेत, जमिनीला समांतर राहतील असे स्थिर राहावे. श्वास रोखून ठेवला तर तोल सांभाळणे सोपे जाते. गुदद्वार व नितंब आंकुचित अवस्थेत ठेवल्यास पाय ताठ ठेवण्यास मदत होते. प्रारंभी ५–१० सेकंद व नंतर पुढे अर्धा मिनिट देखील या आसनात राहता येईल.
आसन सोडताना आधी पाय जमिनीला टेकवावेत किंवा गुडघे वाकवून जमिनीला टेकवावेत व हात मागे घेऊन गुडघ्यांवर बसावे. विश्रांती घ्यावी.
घेरण्डसंहितेत या आसनाची कृती पुढील प्रमाणे दिलेली आहे — “जमिनीवर हातांचे तळवे उलटे ठेवून दोन्ही कोपरे जुळवून त्यावर नाभी टेकवावी. त्यानंतर दोन्ही पाय ताठ करून ते वर उचलून धरावेत” (घेरण्डसंहिता २:२९, हठप्रदीपिका १.३०).
हे आसन करायला खूप शक्ती खर्च होते. श्वास व हृदयगती वाढते. परंतु, नंतर सरावाने त्यांत सहजता येते व तेवढी शक्ती खर्च होत नाही.
लाभ : या आसनाचा अभ्यास केल्यामुळे पोटातील प्लीहा वगैरेंचे सर्व रोग लवकर नाहीसे होतात आणि अन्य दोष निर्माण होत नाहीत. जास्त खाल्लेले, न पचलेले अन्न तसेच अतिविषसुध्दा पचविण्याची क्षमता या आसनात आहे असे हठप्रदीपिकेत म्हटले आहे (१.३१). या आसनाने शरीरातील गाठ (गुल्म, टयुमर), नेहेमी येणारा ज्वर अशा प्रकारचे विकार बरे होतात तसेच कफ, वात, पित्त या तिन्ही दोषांचे योग्य संतुलन राखले जाते. मयूरासनात नाभीजवळ प्रचंड दाब पडतो. त्यामुळे रक्त छाती व डोक्याकडे वळते. आसन सोडले की पचनसंस्थेच्या अवयवांना वाढीव रक्ताभिसरणाचा फायदा होतो. जठराग्नी प्रदीप्त होतो. बध्दकोष्ठता दूर होते. पोटाचे स्नायू ढिले पडत नाहीत. तेथे मेद साठू शकत नसल्याने पोट सुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उत्साह दिवसभर टिकून राहतो. मनगटे, दंड, पाय व कंबर सशक्त होतात, प्रमाणशीर राहतात, आत्मविश्वास वाढतो.
विधिनिषेध : तरुण वयात हे आसन जितके चांगले व सहजतेने जमू शकते तसे ते प्रौढ वयात जमणे कठिण आहे. एकदम पूर्ण आसन करण्याच्या प्रयत्नात समोर तोंडावर आपटणे, पोटात दुखणे इत्यादी गोष्टी घडून दुखापत होण्याचा संभव असतो. त्यासाठी आधी कोपरांची टोके नाभिप्रदेशाला लावून दोन्ही पाय सरळ जमिनीवर तिरपे ठेवावेत म्हणजे पोटावर भार पडेल. आपली क्षमता लक्षात येईल. काही दिवस असा सराव केल्यावर मग पाय वर उचलून तोल सांभाळावा. लठ्ठपणा किंवा मोठे पोट असणाऱ्यांनी हे आसन शक्यतोवर टाळावे. पोटदुखी, वारंवार वायु धरणे, अंतर्गळ (Hernia), उच्च रक्तदाब इत्यादी तक्रारी असल्यास हे आसन करू नये. स्त्रियांनी हे आसन करताना विशेष काळजी घ्यावी. कारण या आसनात गर्भाशय, अंडकोष याठिकाणी खूप दाब पडू शकतो.
संदर्भ :
- देवकुळे, व. ग., घेरण्डसंहिता, मे. शारदा साहित्य, पुणे, १९८५.
- देवकुळे, व. ग., हठप्रदीपिका, मे. शारदा साहित्य, पुणे.
समीक्षक : दीपक बगडिया