रॉस, रोनाल्ड (१३ मे १८५७ – १९३२)
रोनाल्ड रॉस यांचा जन्म भारतात उत्तराखंडातील अल्मोरा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर कॅम्पबेल क्लेय ग्रॅन्ट रॉस व आईचे नाव मॅटिल्डा शार्लोट एल्डरटन असे होते. वयाच्या आठव्या वर्षी रोनाल्ड यांना इंग्लंडला त्यांच्या काका काकूंकडे पाठविण्यात आले. १८५७ साली त्यांनी लंडनमधील सेंट बार्थोलोम्यू मेडिकल हॉस्पिटल व कॉलेज (St Bartholomew’s Hospital Medical College) येथे प्रवेश घेतला. पुढील वर्षी इंग्लंड मधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथील परीक्षा ते उत्तीर्ण झाले. नंतर ते शिप सर्जन म्हणून अटलांटिक महासागरात फिरणाऱ्या जहाजावर रुजू झाले. त्याच वेळी सोसायटी ऑफ अँपोथीकॅरीस (Society of Apothecaries) चे लायसन्स त्यांना मिळाले आणि रोनाल्ड भारतात वैद्यकीय सेवेत रुजू झाले. पुढे १८८८-८९ या काळात त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशिअन्स आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथून पब्लिक हेल्थ या विषयातील पदविकेसाठी जीवाणूशास्त्र हा अभ्यासक्रम निवडला.
पुढे १८९४ साली त्यांनी डासांमुळे मलेरियाचा प्रसार कसा होतो याबाबत संशोधन सुरु केले, तेंव्हा ते महानंद गावातील प्रेसिडेंसी जनरल हॉस्पिटल येथे कार्यरत होते. वेळोवेळी ते खेड्यांमध्ये जाऊन डास गोळा करून आणत असत, याकामी किशोरी मोहन बंडोपाध्याय या भारतीय शास्त्रज्ञाची त्यांना मदत झाली. १८८३ मध्ये रॉस यांना बँगलोर येथील सैन्याचा प्रभारी सर्जन म्हणून नेमण्यात आले. तेथे त्यांना जाणीव झाली की डासांचे नियमन कसे करता येईल व मलेरियाचा प्रसार कसा रोखता येईल यावर संशोधन करायला हवे. रॉस यांना उटी जवळील सिगुरघाट येथे जाण्यास सांगण्यात आले. तेथे गेल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना मलेरिया झाला आणि त्यांनी बारकाईने भिंतीवरील एका विचित्र दिसणाऱ्या डासाचे निरीक्षण केले. या प्रकारच्या डासाला त्यांनी ठिपकेदार पंख असलेला डास असे म्हटले.
१८९२ साली चार्ल्स लाव्हेरन यांनी डासाच्या शरीरात अर्धचंद्राकृती परजीवी पेशी असल्याचे सूक्ष्मदर्शकाखाली बघितले होते. १८९४ साली पॅट्रिक मॅन्सन यांनी असे गृहीतक मांडले होते की डास चावल्यामुळे फायलेरीयाच्या जंतूप्रमाणेच मलेरियाच्या जंतूंचा मानवी शरीरात शिरकाव होतो. हे दोन शास्त्रज्ञ रॉस यांचे प्रेरणास्थान होते. ऑगस्ट १८९७ मध्ये रॉस सिकंदराबाद येथे बेगमपेठ रुग्णालयात कार्यरत होते. तेथे त्यांनी ठिपकेदार पंख असलेले डास एका बरणीत पकडून आणले आणि हुसेन खान या मलेरिया झालेल्या रुग्णाचे रक्त त्या डासांना शोषू दिले. त्यातील एका डासाच्या शरीर विच्छेदनात २४ तासानंतर काहीच आढळून आले नाही. परंतु पुढे तीन दिवसांनी डासाच्या पोटात १२ मायक्रोन व्यासाच्या गोलाकार पेशी स्पष्ट दिसू लागल्या. या प्रत्येक पेशीत काळ्या रंगाचा रंगद्रव दिसत होता. विशेष म्हणजे या तीन दिवसात दरदिवशी केलेल्या निरीक्षणात डासाच्या पोटातील पेशींचा आकार मोठा होत होता. ४ सप्टेंबर १८९७ रोजी त्यांनी आपली निरीक्षणे संशोधन पत्रिकेत नोंदवली. पुढे त्यांची बदली कोलकत्ता येथे झाली. येथे त्यांना असे आढळून आले की, करड्या रंगाच्या डासांनी चावल्यामुळे कावळा, कबुतर, चिमणी अशा पक्ष्यांना रक्तातून मलेरिया होतो. तर तपकिरी रंगाच्या ठिपकेदार पंख असलेल्या डासामुळे माणसात मलेरिया होतो, मात्र पक्ष्यांना होत नाही. जुलै १८९८ मध्ये त्यांनी डासाच्या मानेच्या भागाचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले. त्यांना तेथे धाग्यासारखे अनेक परजीवी दिसले. याचेच पुढे स्पोरोझोईटस (Sporozoites) असे नामकरण केले गेले. डासाच्या मानेच्या वरच्या भागात एका लाळेच्या ग्रंथीत ते सामावलेले होते. त्यावरून रॉस यांनी असा सिद्धांत मांडला की मलेरियाचे परजीवी जंतू हे डासाने पक्ष्याला चावा घेतल्यावर सोंडेतून लाळेवाटे त्या पक्ष्याच्या रक्तात प्रवेश करतात आणि मलेरियाच्या परजीवी जंतूचे दुहेरी जीवनचक्र (अर्धे डासाच्या रक्तात आणि अर्धे पक्षी/मानवी रक्तात) पूर्ण होते. याबद्दल त्यांनी सर्वप्रथम विषद केले.
रॉस यांनी एक नियंत्रित प्रयोगही केला. काही सुदृढ चिमण्या मच्छरदाणीच्या जाळीत ठेवल्या. त्यांना डास न चावल्याने त्यांना मलेरियाची लागण झाली नाही. अशा रितीने डास हा परजीवींचा वाहक असून त्याच्या चाव्यामुळे लाळेवाटे पक्षी/मानवी रक्तात गेलेल्या जंतूंमुळे मलेरिया होतो हे त्यांनी सिद्ध केले.
रॉस यांच्या प्रयोगाला तत्कालीन भारतीय वैद्यक सेवा विभागाने मान्यता न दिल्याने त्यांनी भारत देश सोडला. परंतु विशेष असे की त्यांनी सांगितलेल्या मच्छरदाणीच्या वापरामुळे जगभर विशेषतः युद्धकाळात मलेरिया बराच आटोक्यात आला. १८९८ पर्यंत रॉस भारतात राहिले, पुढे इंग्लंडला जाऊन लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथे रुजू झाले. तिथे त्यांनी अधिव्याख्याता म्हणून काम पाहिले. १९०१ मध्ये रॉस यांची फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंड तसेच फेलो ऑफ रॉयल सोसायटी म्हणून निवड झाली.
रॉस यांना मलेरियावरील संशोधनासाठी १९०२ सालचे शरीरशास्त्र व वैद्यक या विभागातले नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळविणारे ते पहिले ब्रिटिश नागरिक होते. मलेरियाला कारणीभूत असणाऱ्या परजीवींचे डासांच्या पोटामधील अस्तित्व तसेच डासांद्वारे त्या परजीवींचा होणारा प्रसार या शोधामुळे मलेरियावरील उपचार शोधण्यासाठीचा पाया त्यांनी रचला. १९०२ मध्ये त्यांच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक योगदानामुळे त्यांना प्रोफेसर आणि ट्रॉपिकल मेडिसिन ऑफ द लिव्हरपूल स्कूलचे प्रमुखपदी नेमण्यात आले. १९१२ पर्यंत ते या पदावर होते. १९११ मध्ये त्यांना सर या किताबाने गौरविण्यात आले. १९१२ साली त्यांना किंग्स कॉलेज हॉस्पिटल, लंडन येथे फिजिशियन फॉर ट्रॉपिकल मेडिसिन म्हणून नियुक्त करण्यात आले. याच काळात त्यांनी लिव्हरपूल येथील चेअर ऑफ ट्रॉपिकल सॅनिटेशन हे पदही भूषविले. १९११ ते १९१३ मध्ये ते रॉयल सोसायटीचे उपाध्यक्ष झाले. संशोधनाव्यतिरिक्त त्यांनी गणित विषयात निबंध, कविता आणि इतर ललित लेखन सुद्धा केले. प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया (१९१०) हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे.
दीर्घकाळ चाललेले आजारपण व अस्थमा यामुळे रोनाल्ड रॉस यांचे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.famousscientists.org/ronald-ross/
- https://www.malariasite.com/ronald-ross/
- http://www.who.int/bulletin/volumes/85/11/04-020735/en/
- https://www.lshtm.ac.uk/aboutus/introducing/history/frieze/sir-ronald-ross
समीक्षक : रंजन गर्गे