पर्लमन, पीटर : (१८ मार्च १९१९ – १९ एप्रिल २००५) पीटर पर्लमन हे मूळचे झेकोस्लोवाकीयाचे. सुदेतांलंड इथे त्यांचा जन्म झाला. ते ज्युईश होते. त्यामुळे हिटलरने जेव्हा झेकोस्लोवाकीयावर हल्ला केला तेव्हा पर्लमन स्वदेश सोडून स्वीडनला रवाना झाले. स्वीडनच्या वैज्ञानिक प्रगतीला त्यांनी मोलाचा हातभार लावला. स्वीडनमध्ये आल्यानंतर पर्लमन यांनी लुंड येथे जीवशास्त्राचे आणि स्टोकहोम येथे रसायनशास्त्राचे धडे गिरवले. पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळाल्यावर त्यांनी जेव्हा जॉन रनस्त्रोम यांच्याकडे पीएच.डी.साठी प्रवेश घेतला तेव्हा त्यांची वैज्ञानिक कारकीर्द खर्‍या अर्थाने चालू झाली. त्यांचे गुरु रनस्त्रोम हे तेव्हा स्वीडनमध्ये प्रायोगिक जीवशास्त्र विषयाच्या अभ्यासात आघाडीवर होते आणि स्टोकहोममधल्या वेनेर ग्रेन प्रायोगिक जीवशास्त्र संस्थेचे संचालक होते. त्यांच्या हाताखाली त्यांनी सी अर्चीन या प्राण्याचा नमुना व प्रतिकारक्षमतेची वेगवेगळी तंत्रे वापरून सी अर्चीनच्या अंड्यांच्या पृष्ठभागावरील रेणूंचा अभ्यास केला आणि हे रेणू शुक्राणूच्या आकर्षणाला व सी अर्चीनच्या गर्भधारणेला कारणीभूत असतात किंवा कसे हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी सी अर्चीनची अंडी सशांमध्ये टोचून प्रतिपिंडे बनवली व आउक्टरलोनीचे द्विप्रसार तंत्र (Auchterlony’s Double diffusion test) वापरून सी अर्चीनच्या अंड्यांच्या पृष्ठभागावर चार वेगवेगळ्या संरचनेची व वेगवेगळी कार्ये घडवून आणणारी प्रथिने किंवा प्रतिजन असतात हे सिद्ध केले. ह्या कामावर  त्यांना पीएच्.डी. प्रदान करण्यात आली. हेच प्रतिद्रव्य वापरून जॉन अझेलीअस यांच्या साथीने सी अर्चीनच्या अंड्यांमधील सूक्ष्मतम संरचनेचा त्यांनी अभ्यास केला, अशी अभिक्रिया घडवून आणलेल्या अंड्यांचे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने फोटो काढले व त्यांचे विश्लेषण दोन संशोधन लेखात प्रसिद्ध केले.

याचवर्षी त्यांची वैज्ञानिक सहकारी आणि पत्नी हेडविग पर्लमन यांच्या सोबत त्यांचा पहिला लेख संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. पीटर पर्लमन हे विज्ञान विषयात साधारण बहात्तर वर्षे काम करत होते. त्यांचा पहिला संशोधनपर लेख प्रसिद्ध १९४८ साली तर शेवटचा लेख २००५ साली या त्यांच्या मृत्युवर्षी झाला. एवढ्या मोठ्या कालावधीत त्यांनी जवळपास चारशे संशोधनपर लेख प्रसिद्ध केले.

प्रतिकारक्षमतेचे तंत्रज्ञान वापरून उंदरांच्या यकृतातल्या पेशीपटलांमधील प्रतिजनांबद्धल त्यांनी माहिती मिळवली. सस्तन प्राण्यांच्या संरचनेची अशाप्रकारची माहिती प्रतिकार रसायनशास्त्रातील तंत्रज्ञान वापरून उघड करण्यात शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश मिळाले. ह्या कामात त्यांचे पहिले सहकारी होते वेन्नेर ग्रेन संस्थेचेच टोरे हुल्तीन आणि नंतरचे सहकारी त्यांचे स्वतःचे विद्यार्थी होते. यकृतातील पेरेंकायमा पेशी, म्हणजेच अवयवाच्या अत्यंत आवश्यक पेशीमधील पेशीद्रव्य त्यांनी केंद्रोत्सार पद्धतीचा वापर करून विघटीत केला आणि त्याचे आकार आणि रेण्वीय वजनाप्रमाणे झालेले वेगवेगळे भाग वेगवेगळ्या प्रयोगनलिकांत गोळा केले. या विघटीत भागांमध्ये त्यांनी प्रतिपिंडांची अभिक्रिया घडवून आणली व प्रयोगनलिकांच्या तळाशी साचलेल्या घन भागातले विकर ओळखायचा त्यांनी प्रयत्न केला. या अभ्यासासाठी त्यांनी नवजात उंदीर, प्रौढ उंदीर आणि यकृतात ट्युमर (हेपटोमा) झालेला उंदीर असे तीन प्रकारचे उंदीर वापरले आणि मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. ही पद्धत वापरून त्यांना यकृतातील बरीच विकरे ओळखता आली. यावरचे त्यांचे संशोधन दोन लेखांच्या स्वरूपात नेचर या प्रख्यात संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले. कोणतेही संशोधन पूर्णत्वाला न्यायचा त्यांचा खाक्या होता त्याप्रमाणे हे संशोधन आपल्या संशोधक विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी पुढे चालू ठेवले. परिणामी त्यांना पेशीपटलाला लागून असलेल्या बर्‍याच विकरांची एकत्रित संयुगे ओळखता आली.

पीटर पर्लमन यांनी आपले लक्ष मानवी रोग आणि प्रतिक्षमताशास्त्र यांकडे वळवले. सर्व प्रथम त्यांनी मोठ्या आतड्यातल्या व्रणाचा अभ्यास केला. हा व्रण अनेकवेळा आपल्याच पेशींनी चुकून आपल्यावर केलेल्या हल्ल्यामुळे होत असतो. अशा रोगांना इंग्रजीमध्ये autoimmune disorder असे म्हणतात. असे व्रण मोठ्या आतड्यावरच्या प्रतिजनांशी अभिक्रिया करणार्‍या व आपणच निर्माण केलेल्या प्रतिद्रव्यांमुळे होत असेल काय हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यात त्यांना म्हणावे तेवढे यश मिळाले नाही परंतु अशा स्वतःच स्वतःवर केलेल्या हल्ल्यांमध्ये पेशीमध्यस्थीमुळे प्रतिकारक्षमता कशी वाढीस लागते हे त्यांना कळून चुकले, रक्तामधील लिम्फोसाईटस् पेशींमध्ये विषबाधा (cytotxicity) कशी घडवून आणतात व प्रतिद्रव्यांचा अशा विषबाधेवर होणारा परिणाम यावरील त्यांनी केलेल्या संशोधनावर त्यांचे जवळपास शंभर लेख प्रसिद्ध झाले आहेत.

पर्लमन यांना अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये रस होता. त्यामुळे नवनवीन विषयांवर संशोधन करणे त्यांना आवडायचे. आपली प्रतिकारक्षमता आपल्या शरीराला ट्युमरमुक्त कशी ठेवते, त्या प्रतिकारात लिम्फोसाईट्सची भूमिका काय, टयूमर्सच्या पृष्ठभागावर कोणते प्रतिजन असतात यावरील त्यांच्या संशोधनाने कॅन्सरच्या प्रतिकाराच्या संशोधनाला गती प्राप्त झाली. वय सत्तरीवर गेल्यानंतरही प्रत्येक वेगळ्या लिम्फोसाईटचे प्रतिकारक्षमतेत नेमके कार्य काय हे शोधण्यासाठी त्यांनी लॅक्टीन्स वापरून लिम्फोसाईटस् वेगवेगळ्या करण्याची पद्धती शोधून काढली.

परंतु त्यांचे सर्वात महत्त्वाचे संशोधन म्हणजे प्रतिजन आणि प्रतिपिंडे यांचे मापन करण्यासाठी त्यांनी शोधलेले एलायझा (ELISA : enzyme linked Immunosorbant Assay) तंत्रज्ञान. त्यांची पीएच्.डी.ची विद्यार्थिनी इवा इंग्वाल हिच्या मदतीने त्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले. इवा इंग्वाल त्यांच्या प्रयोगशाळेत दाखल झाली तेव्हा रेडीयो इम्युनो मापनाची (Radio Immuno Assay) कार्यप्रणाली नुकतीच विकसित झाली होती. अशा पद्धतीमध्ये अणुकिरणोत्सर्जन वापरून रक्तामधल्या इन्सुलिनसारख्या हार्मोनची पातळी मोजता येते पण अशा किरणोत्सर्जक पद्धतींचे घातक परिणाम माहिती असल्यामुळे या किरणांऐवजी प्रतिजन मापनासाठी विकराचे लेबल वापरता येईल का हे शोधण्याचे काम त्यांनी इवावर सोपवले. सुरुवातीला त्यांनी प्रतिजनांचे पृष्ठशोषण (adsorption) करण्यासाठी सेल्युलोज  वापरले पण या पद्धतीमध्ये केंद्रोत्सार पद्धतीने प्रणाली परत परत धुण्याची आवश्यकता होती. हे काम कंटाळवाणे तर होतेच पण वर पैसा व वेळही वाया जायचा. म्हणून हे धुणे टाळण्यासाठी त्यांनी प्रतिजन किंवा प्रतिपिंडाने लेपन केलेल्या प्रयोग नलिका प्रथमच वापरल्या.

प्रतिजन आणि प्रतिपिंडे यांचे मापन करण्यासाठीचे एलायझा ( ELISA : enzyme linked Immunosorbant Assay) तंत्रज्ञान.

विकसित केलेले हे नवीन तंत्रज्ञान वापरायला अत्यंत सोपे, कमी खर्चिक आणि जास्त मजबूत म्हणून टिकाऊही होते. सशाच्या रक्तामधल्या प्रतिपिंडांच्या मापनासाठीचे हे तंत्रज्ञान प्रकाशित झाले. या चाचणीसाठी त्यांनी अल्कलाईनफॉस्फटेज हे विकर वापरून प्रतिद्रव्य लेबल केले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत साधारण दोन हजार वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनामध्ये या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. परजीवी सूक्ष्मजीव ओळखण्यासाठी प्रथम या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पण आता मात्र प्रेग्नन्सी टेस्टपासून विषाणू ओळखण्यापर्यंत सर्व प्रकारच्या प्रयोगांमध्ये एलायझा टेस्टचा सर्रास वापर होतो.

पर्लमन रॉकफेलर फाउंडेशनच्या ‘दुर्लक्षित मानवी रोगांच्या अभ्यासकांचे जाळे’ नावाच्या  गटात सामील झाले. यावेळी मलेरिया रोगाचे रोग प्रतिकार नियम अभ्यासण्यासाठी हान्स विग्झेल यांच्या साथीने पर्लमन यांच्याशी आठ वर्षांचा एक करार करण्यात आला. या मलेरियावरील संशोधनात त्यांना अनेक नवीन आणि खळबळजनक गोष्टी आढळल्या. जगभरातील प्रसिद्ध अशा प्रयोगशाळांशी त्यांनी मलेरियाच्या संशोधनासाठी सहकार्य केले. पर्लमन शेवटपर्यंत मलेरियावर संशोधन करत राहिले.

स्टॉकहोम विद्यापीठातील पीटर पर्लमन यांच्या विभागाने आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतल्या मलेरीयाग्रस्त देशांतील पीएच्.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी मलेरियाला आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून व्यापक असा कार्यक्रम राबविला. त्यांच्या या संशोधनामुळे जागतिक आरोग्य संघटनेने त्यांना आपल्या मलेरीया प्रतिबंधक लस निर्माण करण्याच्या प्रयत्नांत सामील करून घेतले.

पत्नी हेडविग पर्लमनच्या सहकार्याने पीटर पर्लमन यांनी स्टॉकहोम विद्यापीठात संशोधनासाठी उपयुक्त असे वातावरण तयार केले. इथे तरुण विद्यार्थी कायम नवनवीन गोष्टींवर संशोधन वा वैज्ञानिकांशी नवीन कल्पनांवर चर्चा वा ज्ञानसाधना करीत असत. अशा तरुणांसाठी पीटर पर्लमन यांचा दरवाजा नेहेमीच उघडा राही. स्वतःच्या आवडीच्या विषयांवर संशोधन करण्याचे स्वतःच्या कल्पना राबविण्याचे स्वातंत्र्य त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले होते. कित्येक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यांचे देहावसान होईपर्यंत त्यांनी पन्नास विद्यार्थ्यांना पीएच्.डी.साठी मार्गदर्शन केले होते.

एलायझा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी इवा इंग्वालसह पीटर पर्लमान यांना अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली. यामध्ये जर्मन इम्युनॉलॉजी परितोषिक हे क्लिनिकल रसायनशास्त्रावरील संशोधनासाठीचे बक्षीस, स्मिथ क्लाईन जैवविज्ञान पारितोषिक इत्यादींचा समावेश आहे. तर पर्लमन यांच्या विज्ञानविषयक योगदानासाठी त्यांना एमिल वोन बेहरिंग बक्षीस, अव्हरी लँडस्टाईनर पारितोषिक, कोलंबियाचे ओर्डेन डी सान कार्लोस वगैरे सन्मान मिळाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे