सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे एक विशिष्ट लक्षण असते ज्यामुळे आपल्याला त्या वस्तूच्या स्वरूपाचे किंवा त्याच्या कामाचे ज्ञान होते. वस्तूच्या या विशिष्ट लक्षणाला गुण असे म्हणतात. प्रत्येक वस्तूचा गुण हा त्या वस्तूसोबत एकरूप झालेला असतो. जोपर्यंत वस्तू आहे तोपर्यंत त्यामध्ये गुण असतात. वस्तूचा नाश झाल्यावर गुणांचाही नाश होतो. वस्तूवाचून गुणांचे वेगळे अस्तित्व नाही म्हणूनच वस्तूपुढे गुण गौण असतात.
रोगाचे निदान करताना व त्यावर औषधोपचार करताना गुणांची प्रामुख्याने मदत घेतली जाते. जसे एखाद्या रोगात तीन दोषांपैकी एखादा दोष विकृत झाल्यास त्या दोषाचा नेमका कोणता गुण बरोबर काम करत नाही याचा विचार करून त्या दोषाला चालना देणाऱ्या औषधींची निवड केली जाते. यासाठी गुणांच्या बाबतीतला एक महत्वाचा नियम ज्याला सिद्धांत म्हणतात, त्याचा आधार घेतला जातो. या सिद्धांतानुसार शरीरातील वेगवेगळ्या घटकांचे जे जे विशिष्ट गुण आहेत तसेच गुण असणाऱ्या औषधी किंवा आहार यांमुळे त्या त्या शरीरघटकांची वाढ होते. याउलट शरीरघटकांच्या गुणांच्या विरूद्ध गुण असणाऱ्या आहार किंवा औषधींमुळे त्या त्या शरीर घटकांचा ऱ्हास होतो. याला सामान्य-विशेष सिद्धांत म्हणतात. उदा., शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पाणी पिण्यामुळे त्याची पुर्तता होते; तर शरीराचे तापमान वाढल्यास थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने ताप कमी होण्यास मदत होते. या सिद्धांताच्या उपयोगाने गुणांचा रोगनिदान व औषधोपचार यांत मोठा उपयोग होतो.
वेगवेगळ्या दर्शनशास्त्रातही गुणांचा अभ्यास केला आहे. त्यात शास्त्रकारांनी आपापल्या व्याप्तीनुसार व आवश्यकतेनुसार गुणांची संख्या निश्चित केली आहे. आयुर्वेदात गुणांची संख्या ४१ सांगितली आहे व प्रत्येक गुणाचा विचार शरीराच्या पार्श्वभूमीवर केला आहे. या गुणांचे पुढील तीन गटांत वर्गीकरण केले आहे — (१) सामान्य गुण, (२) विशेष गुण व (३) आत्म गुण. सर्व भौतिक गोष्टींची निर्मिती पंचमहाभूतांच्या एकत्र येण्याने होते असे आयुर्वेदशास्त्र मानते. वरील वर्गीकरणापैकी सामान्य गुण हे एकाहून अधिक महाभूतात आढळतात, परंतु विशेष गुण हा केवळ विशिष्ट एकाच महाभूतात आढळतो; तर तिसऱ्या गटातील आत्म गुण हे केवळ आत्म्याच्या ठिकाणी आढळतात.
(१) सामान्य गुण : याचे दोन गट पडतात — (अ) गुर्वादि गुण व (आ) परादि गुण. पहिल्या गटातील गुणांची सुरूवात गुरू या गुणापासून होते म्हणून त्याचे नाव गुर्वादि गुण, तर दुसऱ्या गटातील गुणांची सुरूवात पर या गुणापासून होते म्हणून त्याचे नाव परादि गुण होय.
(अ) गुर्वादि गुण : या गुणांची संख्या २० आहे. त्याच्या एकूण दहा जोड्या बनतात. प्रत्येक जोडी परस्पर विरोधी असलेल्या दोन गुणांपासून बनते. या दहा जोड्या खालीलप्रमाणे आहेत.
(१) गुरू, (२) लघू : गुरू म्हणजे पचायला जड पण शरीराला पुष्ट करणारा गुण. यामुळे शरीरात जडपणा येतो. तर लघू म्हणजे पचायला हलका व शरीरधातूंना कमी करणारा, शरीर हलके करणारा गुण.
(३) मंद, (४) तीक्ष्ण : मंद गुणामुळे शरीरातील पित्त दोषाचा जोर कमी होतो व अग्निचे कार्य मंदावते. तीक्ष्ण गुणामुळे शरीरातील पित्ताची शक्ती वाढते व शरीरात क्षोभ निर्माण होतो. उदा., मीरे खाल्ल्यावर शरीरावर जो परिणाम होतो, तो त्याच्या तीक्ष्ण गुणामुळे होतो.
(५) हिम, (६) उष्ण : हिम म्हणजे थंड ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते व शरीरातील अवयव घटकांचा संकोच होतो. गतिरोध होतो. जसे आघाताने होणारा रक्तस्त्राव थंड बर्फाने थांबतो; तर उष्ण गुणामुळे शरीरातील दाह वाढतो. शरीरधातूंतील उष्णता वाढते.
(७) स्निग्ध, (८) रूक्ष : स्निग्ध म्हणजे ज्याला व्यवहारात आपण ‘ओशट’ म्हणतो तो गुण, ज्यामुळे घटकात एकप्रकारची आर्द्रता, स्निग्धता येते. या उलट शरीरात शुष्कता, कोरडेपणा आणणारा गुण म्हणजे रूक्ष.
(९) श्लक्ष्ण, (१०) खर : श्लक्ष्ण म्हणजे स्पर्शाला चोपड (तेलकट किंवा गुळगुळीत). याचे कार्य शरीराच्या झिजलेल्या, तुटलेल्या भागाची झीज भरून काढणे हे होय. खर म्हणजे खरखरीत. शरीरघटकांना खरवडण्याची शक्ती या गुणात आहे.
(११) सांद्र, (१२) द्रव : सांद्र म्हणजे घट्ट, दाट. यामुळे शरीर घटकांचे प्रसादन म्हणजेच पोषण होते, तर द्रव म्हणजे पातळ यामुळे शरीरात आर्द्रता निर्माण होते. हा गुण असलेल्या आहार औषधी शरीरात लवकर पसरतात. शरीर व्यापून टाकतात.
(१३) मृदू, (१४) कठिण : मृदू म्हणजे मुलायम. या गुणामुळे शरीरात शिथीलता निर्माण होते, तर कठिण म्हणजे कडक ज्यामुळे शरीरात बळकटी व काठिण्य निर्माण होते.
(१५) स्थिर, (१६) सर : सर म्हणजे जे स्थिर नाही ते. यामुळे शरीरघटकांत गतिमानता निर्माण होते. शरीरदोष व मलांना सरकण्याची प्रेरणा मिळते; तर स्थिर या गुणामुळे धातूंमध्ये टिकाऊपणा येतो.
(१७) सूक्ष्म, (१८) स्थूल : शरीराच्या आत शिरण्याची क्षमता अधिक असणे म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे शरीरघटकांत सुटेपणा मोकळेपणा येतो. हा गुण असलेले औषध किंवा आहार शरीरात लवकर पसरतात. स्थूल म्हणजे ढोबळ. ज्या आहार किंवा औषधीत हा गुण आहे, त्या गोष्टी शरीरात सावकाश पसरतात किंवा विरघळतात. या गुणामुळे शरीरात संवरणाची क्रिया घडते म्हणजे त्यांच्यात सुटेपणा, मोकळेपणा न येता ते बांधून राहतात.
(१९) विशद, (२०) पिच्छिल : ज्यामुळे शरीरघटक स्वच्छ होण्याची क्रिया होते तो गुण म्हणजे विशद. पिच्छिल हा गुण बुळबुळीतपणा दर्शवितो. परंतु, याबरोबरच यामध्ये तंतूमयता असते व दोन गोष्टींना जोडण्याचे किंवा त्यावर पातळ आवरण चढविण्याचे काम हा गुण करतो.
(आ) परादि गुण : पर, अपर, युक्ति, संख्या, संयोग, विभाग, पृथक्त्व, परिमाण, संस्कार आणि अभ्यास असे मिळून एकूण दहा परादि गुण आहेत. या गुणांचा मुख्य उपयोग पदार्थाचे म्हणजे एखाद्या वस्तूचे अथवा क्रियेचे तरतमत्व (सरसनिरसता) ठरविणे, मोजमाप करणे, शरीरात घडणाऱ्या घटनांची तार्किकता समजावून घेणे यासाठी होतो.
(२) विशेष गुण : विशिष्ट त्याच महाभूताच्या आश्रयाने राहणारा गुण हा त्या त्या महाभूताचा विशेष गुण होय. असे पाच विशेष गुण आहेत. (१) शब्द — आकाश महाभूताचा विशेष गुण, (२) स्पर्श — वायू महाभूताचा विशेष गुण, (३) रूप — तेज महाभूताचा विशेष गुण, (४) रस — जल महाभूताचा विशेष गुण, (५) गंध — पृथ्वी महाभूताचा विशेष गुण. आपल्या पंचज्ञानेंद्रियांना जाणवणारे हे पाच गुण आहेत.
(३) आत्म गुण : बुद्धी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न असे एकूण सहा आत्म गुण आहेत. आयुर्वेदात जीवंत शरीराचा विचार केला असल्याने, आत्म्याचा विचार क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आत्म्याशी संबंधीत गुणांचाही विचार स्वाभाविकपणे येथे केला आहे.
या ४१ गुणांचे वर्णन शरीरातील विविध व्यापार, त्यात होणारे रोग व त्यांचे उपचार या अनुषंगानेच आढळते.
संदर्भ :
- चरकसंहिता—सूत्रस्थान, अध्याय १, श्लोक ४४, ४९, ५१, ७२; अध्याय २६, श्लोक २९, ३०, ३५.
- चरकसंहिता—विमानस्थान, अध्याय १, श्लोक २६.
- सुश्रुतसंहिता—सूत्रस्थान, अध्याय ४६, श्लोक ५१३.
- अष्टांगहृदय—अध्याय १, श्लोक १८ हेमाद्रि टिका.
समीक्षक – जयंत देवपूजारी