शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. एकूण सात धातूंपैकी रक्त हा दुसऱ्या क्रमांकाचा धातू आहे. शुध्द रक्ताचा रंग लाल असतो. येथे शुध्द रक्त म्हणजे वात, पित्त, कफ यांनी दूषित न झालेले रक्त होय. असे रक्त खूप पातळ किंवा खूप घट्ट नसते व ते शरीरात असताना गोठत नाही. शुद्ध रक्त कापडावर सांडले असता कापड धुतल्यावर ते स्वच्छ होते व त्यावर रक्ताचा डाग राहत नाही. याचा रंग तापविलेल्या धातूप्रमाणे (लोखंड/सोने) किंवा इंद्रगोप किड्याप्रमाणे असतो; तर वात, पित्त, कफ यांनी दूषित झालेल्या रक्ताचा रंग रक्तचंदन, लाक्षारस (लाखेचा रस) व गुंजेच्या रंगाप्रमाणे असतो. रक्तधातू स्निग्ध, अशीतोष्ण, मधुर-लवण चवीचा असतो. आहाररसापासून तयार झालेल्या रसधातूवर रक्ताग्नीची प्रक्रिया होते. या पाचित रसापासून रक्ताचे पोषण होते. तसेच त्यावर रंजक पित्ताची प्रक्रिया झाल्याने रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. रंजनाची ही प्रक्रिया चरकाचार्य व सुश्रुताचार्य यांच्या मते यकृत व प्लीहा यांत होते. पित्ताला रक्तधातूचा मल मानलेले आहे.

सर्व धातूंचा क्षय व वृध्दी रक्तामुळे होते. याशिवाय मांसधातूचे पोषण करणे, शरीराच्या रंगाचे प्राकृतत्त्व कायम ठेवणे व बल, सुख, आयुष्य प्रदान करणे ही रक्तधातूची कार्ये आहेत. रक्तधातू त्याच्या प्राकृत प्रमाणापेक्षा कमी झाल्यास भूक मंदावते, शरीरातील वायूचा कोप होतो, त्वचा रुक्ष, कोमेजलेली व स्फुटिर दिसते, रक्तवाहिन्या क्षीण व शिथिल होतात. अशावेळी आंबट व थंड पदार्थ खावेसे वाटतात. रक्तधातू त्याच्या प्राकृत प्रमाणापेक्षा वाढल्यास डोळे, त्वचा व रक्तवाहिन्या आरक्त दिसू लागतात.

ज्यांचा रक्तधातू उत्कृष्ट प्रतीचा असतो, त्यांना रक्तसार म्हणतात. अशा व्यक्तीचे कान, डोळे, जीभ, नासिका, ओठ, तळपाय, तळहात, नखे, कपाळ व शिश्न हे सर्व भाग स्निग्ध, आरक्त व उजळ असतात. अशी व्यक्ती सुखी, बुध्दीमान, अल्पबलयुक्त, सुकुमार, उष्णता व श्रम सहन न करू शकणारी असते.

पहा : धातु-२, दोषधातुमलविज्ञान.

संदर्भ :

  • सुश्रुत संहिता — सूत्रस्थान, अध्याय १४ श्लोक ४-५, १०, २१, २२ व ३७, अध्याय १५ श्लोक ७ व ९, अध्याय ३५ श्लोक १७.
  • चरक संहिता — सूत्रस्थान, अध्याय १७ श्लोक ६५, अध्याय २४ श्लोक २२
  • चरक संहिता — चिकित्सास्थान, अध्याय १५ श्लोक २८.
  • चरक संहिता — विमानस्थान, अध्याय ८ श्लोक १०४.

समीक्षक – जयंत देवपुजारी