आयुर्वेदात विविध धातूंचा उपयोग औषधी स्वरूपात केला जातो. हे धातू वेगवेगळ्या पद्धतींनी शुद्ध करून ते शरीरात कुठल्याही प्रकारची हानी उत्पन्न करणार नाहीत अशा स्थितीत आणले जातात. नंतर त्यांचा वापर औषधांमध्ये केला जातो. पारद किंवा पारा हा अशुद्ध स्वरूपात विषासमान असला तरीही त्यावर संस्कार (प्रक्रिया) करून त्याचा वापर केल्यास तो अमृतासमान गुणकारी होतो. पाऱ्याची रोगनाशक शक्ती वाढविण्यासाठी त्यात विविध औषधे, धातू, रत्नेदेखील मिसळली जातात, एकरूप केली जातात. त्यामुळे पाऱ्यातील गुणधर्म शंभर पटींनी वाढतात. पाऱ्यावर केल्या जाणाऱ्या या संस्कारांना जारण असे म्हणतात. मुख्यत: यामध्ये पाऱ्यात गंधक विलीन केला जाऊन पाऱ्याची कार्यक्षमता वाढवता येते. थोडक्यात विविध यंत्रांच्या मदतीने पाऱ्यामध्ये गंधक इत्यादी घटकांना क्षीण करणे किंवा जीर्ण करणे अथवा विलीन करणे, अन्यथा जाळणे याला जारण असे म्हणतात.

पारा अष्टसंस्कारित असो अथवा हिंगुळ स्वरूपात प्राप्त होणारा शुद्ध स्वरूपातील असो जर तो सहा पट गंधकात मिश्रित केला नसेल तर त्यात रोगनाशक शक्ती पूर्ण रूपात येत नाही. म्हणून पाऱ्यामध्ये रोगनाशक शक्ती तसेच रसायन गुण उत्पन्न करण्यासाठी सहा पट गंधक जारण करणे आवश्यक असते. जारण प्रक्रियेत शुद्ध पाऱ्यामध्ये विविध धातूंना विलीन करण्याच्या शक्तीला प्रोत्साहन दिले जाते किंवा ती शक्ती निर्माण केली जाते. उदा., विभिन्न प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांनी पाऱ्यामध्ये सुवर्ण, चांदी, अभ्रक, माक्षिक (एक विशिष्ट खनिज पदार्थ) यांना सामावून घेण्याची क्षमता उत्पन्न केली जाते.

पाऱ्यामध्ये गाळण-पातन (पदार्थाला उष्णतेच्या साहाय्याने द्रवरूप अवस्थेचे रूप देणे) इत्यादी क्रिया न करताही अभ्रक, सुवर्ण इत्यादी घटकांना स्वत:मध्ये सामावून घेऊन तो आपल्या मूळ रूपात राहतो व त्याच्या मात्रेत तसेच वजनातही फरक होत नाही. तसेच पाऱ्यामध्ये लोहादी धातू पटकन विलीन होतात.

जारणाचे भुचरी आणि खेचरी असे दोन प्रकार पडतात. भूचरी जारणाचे बाल जारण, युवा जारण आणि वृद्ध जारण असे तीन प्रकार पडतात; तर बाल जारणाचे अभ्रक जारण, सर्व सत्त्व जारण, माक्षिक सत्त्व जारण, सुवर्ण जारण, दिव्य औषधी जारण हे प्रकार पडतात. अभ्रक जारणाचे अभ्रक पत्र आणि अभ्रक सत्त्व जारण असे प्रकार आहेत. तसेच समुख जारण, निर्मुख जारण आणि वासानामुख जारण असेही याचे प्रकार पडतात. वृद्ध जारणाचे प्रकार म्हणजे गंधक जारण, स्वर्णमाक्षिक जारण, सुवर्ण जारण, रत्न जारण हे होय.

जारण क्रम : सर्वप्रथम कच्छप यंत्रांच्या साहाय्याने गंधकाचे जारण केले जाते. त्यानंतर अभ्रक, स्वर्णमाक्षिक सत्त्व इत्यादी द्रव्यांचे, तद्पश्चात नाग (शिसे), वंग/कथिल (टिन) आणि रत्नांचे जारण करावे. हाच जारणाचा क्रम आहे. गंधकाचे जारण करण्यापूर्वी धातूंचे जारण केल्यास त्यात धातूंचे विलीनीकरण चांगल्या प्रकारे होत नाही, म्हणून सर्वप्रथम गंधक जारणच केली पाहिजे.

प्रक्रिया भेदाने गंधकाचे जारण दोन प्रकारे केले जाते – (१) बहिर्धुम : वालुका यंत्रांच्या साहाय्याने उघड्या भांड्यात जे गंधक जारण केले जाते, त्याला बहिर्धुमगंधक जारण असे म्हणतात. या प्रक्रियेने जारणाची क्रिया जलदपणे करता येते. (२) अंतर्धुम : कच्छप यंत्र अथवा भुधर यंत्राद्वारे बंद कुपी, मुषा अथवा भांड्यामध्ये गंधक जारण करण्याला अंतर्धुम जारणा म्हणतात. या प्रक्रियेने जरणाची क्रिया मंद गतीने होते.

गंधक जारण विधी  : (१) बहिर्धूमविधी : वालूका यंत्रांच्या वर एक माती किंवा लोखंडाचे पात्र ठेवून त्यात प्रथम पाऱ्याच्या समभाग शुद्ध गंधक घेणे. गंधक वितळल्यावर शुद्ध पारा त्यात मिसळणे आणि अग्नी देत राहणे. जेव्हा अर्धा गंधक जळून जाईल तेव्हा पुन्हा एकदा पाऱ्याच्या समभाग गंधक घालणे. अशा प्रकारे ही प्रक्रिया सहा वेळा करणे.

(२) अंतर्धूमविधी : कच्छप यंत्राच्या पात्रात प्रथम पाऱ्याचा अर्धा भाग गंधक घेऊन त्यात खड्डा करून त्यात पारा घेणे. त्यावर पुन्हा उरलेला अर्धा भाग गंधक टाकून भांद्याचे मुख योग्य प्रकारे बंद करून घेणे व अग्नी देणे. याच क्रमाने षड्गुण गंधकाचे जारण करून घेणे.

गंधक जीर्ण पाऱ्याचे गुण : पाऱ्यामध्ये त्याच्या समान भाग गंधकाचे जारण केल्यास तो पारा शुद्ध पाऱ्याच्या अपेक्षेने १०० पट अधिक बलवान तसेच फलदायी होतो. द्विगुण गंधक जीर्ण असेल तर सर्व प्रकारच्या कुष्ठ म्हणजेच त्वचा विकारांचा नाश करण्यासाठी समर्थ होतो. त्रिगुण गंधक जीर्ण असल्यास सगळ्या प्रकारच्या शरीर गत जडत्वाचा नाश करतो. चातुर्गुण गंधक जीर्ण असल्यास त्वचेच्या सुरकुत्या तसेच केसांच्या पांढरेपणाचा नाश करतो. पंचगुण गंधक जीर्ण असल्यास पारा क्षयरोगाचा नाश करतो. षड्गुण गंधक जीर्ण असणारा पारा सगळ्याच व्याधी दूर करण्यासाठी समर्थ होतो, असे वर्णन आयुर्वेद प्रकाशमध्ये आले आहे.

अन्य मतानुसार समगुण गंधक जीर्ण असणारा पारा सामान्य रोगांना नष्ट करतो. द्विगुण गंधक जीर्ण पारा महारोगांना नष्ट करतो. त्रिगुण गंधक जीर्ण पारा पुंसत्व वाढवतो. चातुर्गुण गंधक जीर्ण पारा शरीरात उत्साह, धारणा शक्ती तसेच स्मृती यांची वाढ करतो. पंचगुण गंधक जीर्ण असलेला पारा रोग तसेच दु:ख दूर करतो. षड्गुण गंधक जीर्ण पारा अनेक प्रकारची अद्भुत कामे करण्यास लायक होतो, असे वर्णन रसशास्त्रातील रस तरंगिणी या ग्रंथात आले आहे.

अशा प्रकारे षड्गुण गंधक जीर्ण पारद हा अतिशय श्रेष्ठ असतो. त्याचा वापर पुढे इतर अनेक औषधे तयार करण्यासाठी केल्यास त्या औषधांची कार्यक्षमता देखील अनेक पटींनी वाढते. वेगवेगळ्या रोगांवरील औषधे तयार करताना त्या त्या रोगांच्या विरुद्ध गुणांनी युक्त असे धातू अथवा द्रव्य यांनी जारण केलेला पारा वापरल्यास त्या औषधांची कार्मुकता देखील तितकीच वाढते. जारण करतानाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाऱ्याचे वजन किंवा प्रमाण यांची वाढ होत नाही. अन्न घेतल्याप्रमाणे पारा गंधकाला अथवा इतर धातूंना स्वत:मध्ये सामावून घेतो आणि आपल्या गुणांची वृद्धी करतो.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे