एक प्राचीन ईजिप्शियन देव. इ.स.पू. ६०००–३१५० हा त्याचा काळ मानला जातो. सुरुवातीला तो उत्पादकतेशी, धान्यांच्या वाढीशी, काळ्या सुपीक मातीशी संबंधित निर्मितीचा देव म्हणून पूजला जाई. पण कालौघात तो मार्गांचा आणि नाईल नदीच्या पूर्वेकडील वाळवंटी खाणीच्या प्रदेशात राहणाऱ्या जमातींचा संरक्षक देव म्हणून मान्यता पावला. मोहीम सुरू करण्याआधी प्रवासी मीन देवाची पूजा करीत असत.
डोक्यावर दोन पिसांचे उंच शिरोभूषण, डाव्या हातात ताठरलेले शिश्न आणि उजव्या हातात धान्य झोडपण्याची काठी असलेला आणि ममीकरणाची अर्धवट प्रक्रिया (Semi-Mummified) झालेला पुरुष, असे त्याचे मानवी स्वरूप आहे. हा पौरुषयुक्त उत्पादकतेचाही देव मानला जातो. त्याचे अनुयायी त्याच्या सन्मानार्थ स्तंभारोहण नावाचा एक विशिष्ट विधी करीत. त्याचा पंथ कॉप्टोस आणि आख्मीम येथे होता. आख्मीम प्रदेशाला ग्रीक लोक पॅनोपलीस म्हणत; कारण ते त्याला आपल्या पॅननामक देवाचे रूप मानत असत. या पंथाचे चिन्ह लेट्युस, दरवाजाचा अडसर, काटेरी बाण किंवा विजेची लाट यांसारखा कोणतातरी एक आकार असल्याचे मानले जाते.
काही ठिकाणी मीनला इसिसचा पुत्र मानले आहे, तर काही ठिकाणी तो तिचा सहचर असून होरसला त्या दोघांचा पुत्र म्हटले आहे. काही प्राचीन लेखांमध्ये मीनला ओसायरिस देवतेशीही संबंधित असल्याचे दाखविले आहे. न्यू किंग्डमच्या काळात (इ.स.पू. १५५०–१०६९) जेव्हा ईजिप्तमध्ये एकदेवतावाद आला, तेव्हा मीन देवाचे थिबन देव आमूनबरोबर एकत्रीकरण झाले.
मीन देवाचा मुख्य उत्सव ‘फिस्ट ऑफ स्टेप्स’ म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या उत्सवाच्या वेळी राजाने स्वत: कापणी करून अर्पण केलेल्या धान्याच्या पहिल्या पेंढीचा स्वीकार मीन देव पायरीवर बसून करतो.
संदर्भ :
- Oakes, Lorna; Gahlin, Lucia, Ancient Egypt, Pennsylvania, 2007.
- Willis, Roy, World Mythology : The Illustrated Guide, London, 1993.
- https://www.ancient.eu/article/885/egyptian-gods—the-complete-list/
समीक्षक − शकुंतला गावडे