प्राचीन ईजिप्शियन मृतात्म्यांशी संबंधित देवता. आकेन ह्या देवाची ती पत्नी असून आमेन्त, आमेन्तित, इमेन्तित किंवा इमेन्तेत अशा अन्य नावांनीही ती ओळखली जाते. ह्या नावांचा अर्थ ती पश्चिमेकडील देवता असा होतो. पश्चिम दिशेचे हे मानवी रूपातील प्रतीक म्हणावे लागेल. काही तज्ज्ञांच्या मते तिची उत्पत्ती लिबियातून झाली असावी. ती मावळत्या सूर्याचे प्रतीक असून मृत्यू आणि अधोलोकाशी संबंधित आहे. आमेनतेतच्या नावाचा संबंध नाईल नदीच्या पश्चिम किनार्याशीही जोडण्यात येतो.
प्रथम आमेनतेत ही मावळतीची दिशा समजली जात होती, पण नंतरच्या काळात तिचा संबंध ईजिप्तभरातील दफनभूमी व थडग्यांशी जोडला गेला. तिचे मृतात्म्यांना संरक्षण देणारे चित्रण अनेकदा थडग्यांवर आणि शवपेटिकांवर केलेले आढळते. मृत्यूदेवता म्हणून तिचे चित्रण सर्वप्रथम पाचव्या घराण्याच्या राजांच्या थडग्यांत आढळते. ती वाळवंटाच्या टोकावरील एका वृक्षावर राहून अधोलोकाच्या द्वारांवर नजर ठेवते असा समज आहे. मृतात्म्यांनी मृतांच्या प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी ती त्यांना अन्नपाणी देते, ह्याच अन्नपाण्याच्या आधारावर हे मृतात्मे पुनर्जन्मासाठी तयार होतात व स्वर्गाच्या वाटेवरील परीक्षांना तोंड देतात. त्यामुळे तिला पुनर्जन्माचीही देवता मानले जाते. तिचा ईआबेत ह्या पूर्व दिशेच्या देवतेशी जवळचा संबंध आहे.
आमेनतेत एक सुफलनाची देवता मानली जाते. त्यामुळे तिचा संबंध हॅथोर, इसिस, नीथ, मूट, नूट इत्यादी देवतांत एकवटलेली आढळते. काही मिथककथांनुसार ती हॅथोर आणि होरुसची मुलगी होती. तिचे चित्रण राणीप्रमाणे केलेले असून प्रसंगोपात तिच्या हातात राजदंड आणि जीवनदर्शक चिन्ह (अँख) धारण केलेले असते. तिने पश्चिम दिशा प्रतिरूपक शिरस्त्राण (ते वरच्या बाजूस अर्धवर्तुळाकार एक लांब व दुसरा आखूड स्तंभांकित) घातले असून त्यामध्ये पंख खोचले आहे. दफन पेट्यांवरील चित्रणात ती नेहमी पंखधारी आणि इसिस व नेपथीसच्या सहवासात ती घार-पक्षी असते.
मेंफिस, आबिदोस, लुक्सॉर, कार्नाक वगैरे तिच्या उपासनेची मुख्य केंद्रे आहेत. परंतु तिची स्वतंत्र मंदिरे आढळत नाहीत. नंतरच्या काळात हॅथोरच्या उपासनेतच हिची उपासना मिसळून गेली.
ही देवता क्वचितप्रसंगी रा-होराख्तीबरोबर चित्रित केलेली आढळते. रा-होराख्ती हा उगवत्या सूर्याचे प्रतिनिधित्व करतो, तर आमेनतेत मावळत्या सूर्याचे प्रतिनिधित्व करते. इन द बुक ऑफ अर्थमध्ये ती लॅबेटबरोबरसुद्धा दिसते. लॅबेट ही देवता पूर्वेकडील वाळवंटातील आहे. मेम्फिस, आबायडस, लक्सॉर, कारनॅक आणि पश्चिम त्रिभूजप्रदेश ही तिच्या पूजा-अर्चेची प्रमुख केंद्रे होत.
संदर्भ :
- Remler, Pat, Egyptian Mythology A to Z, New York, 2010.
समीक्षक – सिंधू डांगे