प्राचीन ईजिप्तमधील सर्वश्रेष्ठ देव. तो असर, असीर, ओसीर किंवा उसीर (अर्थबलशाली) ह्या नावांनी ओळखला जात असे.

ईजिप्शियन देवता : ओसायरिस.

विश्वोत्पत्तिशास्त्रात ‘गेब’ (पृथ्वी) व ‘नट’ (स्वर्ग व आकाश) यांच्यापासून झालेल्या चार देवांतील ओसायरिस हा एक मानला जातो. तो इसिसचा बंधू व पती आणि होरस व अनुबिस यांचा पिता आणि सेत (थ) याचा जुळा भाऊ होता. होरस, इसिस आणि ओसायरिस अशा देवत्रयी रूपातही त्याची उपासना होत असे. तो प्रामुख्याने मृतांचा तसेच पाताळाचा देव मानला गेला असला, तरी त्याच्याबाबत इतर कल्पनाही आढळतात. उदा., विश्वशक्तीशी निगडित, मृतांचा निवाडा करणारा व त्यांना नवजीवन देणारा; मानवाचा निर्माता व माता-पिता, सुफलता तसेच धान्य-वनस्पतींचा देव, सूर्यदेव; नाईल नदीच्या परिसरातील जनतेला कृषिविद्या, कला व संस्कृती यांचा परिचय करून देणारा आद्य राजा इत्यादींवरून त्याच्या कर्तृत्वाची कल्पना येते.

तो मुळात अतिशय न्यायी व दयाळू असा आद्य राजा होता. त्याने ईजिप्तमध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था आणली. नवी मंदिरे बांधली. नवी गावे वसवली आणि शेतीत सुधारणा केल्या. ओसायरिसचे स्थान सूर्यदेव आमूनरा ह्यांच्या तोडीचे होते.

ओसायरिस हा सुष्टतेचा व त्याचा जुळा भाऊ सेत हा दृष्टतेचा प्रतीक मानले जाई. त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याचा धाकटा भाऊ सेत ह्याला त्याच्याबद्दल असूया वाटू लागली होती. ओसायरिसने परदेशांत प्रवासासाठी जाताना सेतऐवजी इसिसला आपल्या गादीवर नेमल्याने त्याचा राग अजूनच वाढला. त्यातच सेतची पत्नी नेफ्टिसने आपली बहीण व ओसायरिसची पत्नी इसिस हिचे रूप घेऊन ओसायरिसला भुलवले व त्यातून अनुबिसचा जन्म झाला. ह्यामुळे अधिकच संतापलेल्या सेतने त्याला ठार करण्याचे ठरवले.

सेतने ओसायरिसच्या मापाची एक सुंदर शवपेटी तयार करवली व मोठ्या समारंभाचे आयोजन केले. त्यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांना ती पेटी दाखवून, जो त्यात मावेल, त्याला ती देऊन टाकण्याचा निर्णय जाहीर केला. इतर कोणीच त्या पेटीत मावू शकले नाही. अर्थातच ओसायरिस मात्र अचूक मावला. त्याबरोबर सेतने ती पेटी बंद करून ताबडतोब नाईल नदीत फेकली.

ओसायरिसचे मृतात्म्यांसाठीचे न्यायदान

पतिनिष्ठ इसिसने ती पेटी मिळविली व पतीस पुनर्जन्म दिला. परंतु, सेतने पुन्हा त्याचे शरीर मिळवले आणि त्याचे चौदा तुकडे करून ते इजिप्तभर फेकून दिले. या प्रक्रियेत इसिसने आपली बहीण आणि सेतची पत्नी नेफ्टिस हिच्या मदतीने ते तुकडे मिळवले होते आणि ओसायरिसला पुनर्जीवित केले होते. इसिसला त्याच्यापासून गर्भही राहिला; पण अंतिमत: त्याचा मृत्यू झाला.

प्रेत जोपर्यंत टिकून रहाते, तोपर्यंत मृतास पुन्हा जिवंत करता येते वा त्याला मरणोत्तर सद्गती मिळते, ह्या कल्पनेतून ईजिप्तमध्ये ममी करण्याची प्रथा सुरू झाली असावी, असे ईजिप्तविद्येचे अभ्यासक मानतात. त्यामुळे मृत्यूनंतर सूर्यदेव ‘रा’च्या कृपेमुळे आणि अनुबिस आणि थोथ ह्यांच्या मदतीने त्याची ‘ममी’ बनविण्यात आली. ‘ममी’ केला गेलेला तो पहिलाच मानव होता. तो मृतांचा आणि पाताळाचा अधिपती, तसेच मृतांचा न्यायाधीशही बनला. ओसायरिसचा संबंध फिनिक्सप्रमाणे राखेतून पुन्हा उठणाऱ्या बेनूनामक पक्षिदेवतेबरोबरही आहे. प्राचीन ईजिप्तच्या फेअरोंची ओसायरिसवर विशेष श्रद्धा होती. फेअरो हयात असताना तो होरसचा, तर मृत्युनंतर ओसायरिसचा अंश समजला जाई.

ओसायरिस, होरस आणि इसिस.

इसिस ही होरसची माता असल्याने ती ईजिप्तच्या फेअरोंचीही माता समजली जाई. दुष्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी ईजिप्तच्या फेअरोंच्या ममी ओसायरिसप्रमाणे करीत असत. म्हणूनच ओसायरिस ममी केलेल्या राजाच्या रूपात दाखवला जातो. त्याच्या विविध रूपांतील प्रतिमा आढळत असल्या तरी राजमुकूटधारी आणि हातात प्रतादे व वक्रदंड असलेल्या त्याच्या ममी-रूपातील प्रतिमा विशेष प्रचलित होत्या. त्यांत तो अत्यंत रुबाबदार असून त्याची दाढी लांब व टोकदार असते. डोक्यावर शहामृगाची दोन पिसे जडवलेला अतेफनामक उंच पांढरा मुकुट आढळतो आणि रंग हिरवा असतो. हातात राजत्वाचा सूचक आकडा आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून झोडपणी असतात. सामान्यतः हिरव्या रंगाची ही प्रतिमा असते.

वसंतात त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक समारंभ केले जात. आबायडॉस येथे त्याची दरवर्षी मोठी यात्रा भरते आणि दूरदूरच्या भागांतून ममी केलेले मृतदेह तेथे आणून पुरत असत. त्यामुळे आबायडॉस हे ओसायरिसच्या उपासनेचे प्रमुख केंद्र बनले होते; तथापि सर्व ईजिप्तभरही त्याची उपासना होत होती. त्यामुळे त्याच्या उपासकांची संख्या मोठी होती. त्याच्या उपासकांचा एक गूढ पंथही होता. पुनर्जन्म, मरणोत्तर जीवन, अमरत्व आदी साधना या पंथात प्रविष्ट होत्या. त्याची मंदिरे हिलीओपोलिस, बसिरिस, थीब्ज, मेंफिस इ. अनेक ठिकाणी होती. ग्रीकांच्या डायोनायसस या देवाशी ओसायरिसचे काही बाबतीत साम्य आहे.

हायरोग्लिफिक लिपीत ओसायरिसचे नाव पुनर्जन्म व स्थैर्यसूचक स्तंभात आढळते. त्याला ओसायरिसचा कणा म्हणून ओळखतात. त्यानंतर सूर्यसूचक नेत्र आणि अतेफ धारण केलेली देवता, अर्थात ओसायरिसचे चिन्ह काढलेले असते.

 

संदर्भ :

  •  Cooke, H. P. Osiris : A study in Myths, Mysteries and Religion, London, 1951.
  •  Remler, Pat, Egyptian Mythology : A to Z, New York, 2010.

समीक्षक – सिंधू डांगे