पितृबंधमोचन  : अनंत नरायण भागवत लिखित कादंबरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या प्राथमिक प्रयत्नावर आधारित ऐतिहासिक स्वरुपाची कादंबरी. पां. ब. देवल व श्री भागवत (पुणे) यांनी सन १८९८ साली ही कादंबरी प्रकाशीत केली. शिवाजी महाराजांच्या काळातील सामाजिक व राजकीय परिस्थिती हे या कादंबरीचे मुख्य आशसूत्र. शिवाजी महाराजांच्या काळात मुसलमानी आमदानीतल्या किल्लेदारांकडून तसेच अधिकाऱ्याकडून प्रजेवर अत्याचार होत होते. या अत्याचाराला त्यावेळचे तरुण मावळे व शिवाजी महाराज कसे प्रतिकार करत होते याचे चित्रण प्रस्तुत कादंबरीत केले आहे. रायरी किल्याच्या किल्लेदाराचा मेव्हणा महम्मदखां यांच्याशी येसाजी देशमुख व बाजी देशपांडे यांची मारामारी होते. त्यामधून येसाजी देशमुख शिताफीने सुटतो पण बाजी किल्ल्यात कैदेत सापडतो. ही घटना घडल्यापासून येसाजी बेभान होतो.त्यामुळेच एकदा शिकारीला गेल्यावर आपल्या एका मित्राचा जीव वाचवण्यासाठी स्वत: जखमी होतो. दरम्यान मानाजी शिर्के आपल्या वडिलांच्या वधाचा बदला घेण्यासाठी रायरी किल्ल्याच्या किल्लेदांराकडे चाललेला असतो. तेव्हा वाटेत येसाजी जखमी अवस्थेत दिसल्यानंतर त्याला सुखरुप घरी पोहोचवतो. दुसरीकडे कैदेत असलेल्या बाजी देशपांडेला मानाजी शिर्के व त्याचे साथीदार सोडवितात. किल्लेदार महम्मदखांलाही मारतात. यादरम्यान शिवाजी महाराज अनेक किल्ले, कोट, गढ्या आपल्या ताब्यात घेतात. चाकणचा किल्ला ताब्यात घेऊन वृध्द गडकऱ्याला आपले म्हणणे मान्य केल्यामुळे गडाची किल्लेदारी देतात. शिवाजी महाराजांचा सावत्र मामा बाजीराव मोहिते हा दृष्ट प्रवृत्तीचा असतो, त्याला कट रचून पकडतात व त्याच्या सुप्यातील लोकांची अन्यायापासून सुटका करतात. दुसरीकडे पुरंदर किल्यांचे किल्लेदार नाईक हे आपल्या दोन लहान भावांना अन्यायाने वागवत असतात ही तक्रार घेऊन हे दोन लहान भाऊ शिवाजी महाराजांकडे येतात. या दुहीचा फायदा घेऊन बादशहाच्या ताब्यातील पुरंदर किल्यावर ताबा मिळवतात. पण जिजाबाईंच्या सांगण्यावरुन तिन्ही नाईक बंधूंच्या पत्नींना एकेक गाव इनाम देऊन धाकट्या दोन बंधूना आपल्या सैन्यात भरती करुन थोरल्या भावाकडे पुरंदर गडाची व्यवस्था सोपवितात. पुढे दरवर्षी दिवाळीला शिवाजी महाराज नाईकांच्या पत्नींना न विसरता भाऊबीज पाठवितात. कादंबरीचे हे सदर कथानक पहिल्या भागात प्रकाशित झाले आहे. पुढील भाग प्रकाशित झाला नाही.‘पितृबंधमोचन या शीर्षकाप्रमाणे कादंबरीतील पहिल्या भागाच्या पूर्वार्धात मानाजी शिर्के आपल्या वडिलांच्या वधाचा बदला घेतो, यासंबंधीचे कथासूत्र साकारते पण पुढील कथानकाचा रोख शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर केंद्रीत झाला आहे.

संदर्भ : गणोरकर, प्रभा, डहाके, वसंत, आबाजी आणि अन्य (संपा),संक्षिप्त मराठी वाङमयकोश , मुंबई, १९९८.