अठराव्या शतकात टॉमस रीड (१७१०–९६) आणि अन्य काही स्कॉटिश तत्त्वज्ञांनी उदयास आणलेला एक तत्त्वज्ञानीय पंथ. जग आणि माणूस ह्यांच्या स्वरूपासंबंधीचे ज्ञान आपल्या नेहमीच्या व्यवहारबुद्धीमध्येच सामावलेले असून ते प्रमाण आहे, हा व्यवहारवादाच्या तत्त्वज्ञानाला आधारभूत असलेला सिद्धांत होय. उदा., खुर्ची, टेबल, डोंगर ह्यांसारख्या बाह्य वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञानात आपल्याला साक्षात ज्ञान होते, असे आपली व्यवहारबुद्धी आपल्याला सांगते आणि ते सत्य असते. आपल्या व्यवहारबुद्धीत अनुस्यूत असलेले इतरही काही सिद्धांत आणि संकल्पना असतात. उदा., अवकाश ही संकल्पना; घटना कार्यकारणभावाला अनुसरून घडतात; ज्ञाता व ज्ञात वस्तू ह्यांचे अस्तित्व स्वतंत्र असते; आपल्याला जसे एक मन आहे, तशी इतरांनाही मने आहेत; आपल्या इंद्रियांना गुणांचे ज्ञान होते, त्यांना काहीएक विषय असतो इत्यादी. असे सिद्धांत स्वयंप्रकाशी असतात; ते आपल्या व्यवहारबुद्धीला वा सर्वसामान्य प्रज्ञेला त्वरित प्रतीत झाले, तरी तर्कशास्त्रीय पद्धतीने सिद्ध करून दाखविता येत नाहीत. ह्याचे कारण त्यांचा मूलभूतपणा, हे होय. हे सिद्धांत इतके मूलभूत असतात की, ज्यांच्यापासून त्यांना निष्पन्न करून ते सिद्ध करावेत, अशी अधिक मूलभूत तत्त्वे उपलब्ध नसतात. ही भूमिका नाकारणारे तत्त्वज्ञही त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनात इतर चार माणसांप्रमाणे व्यवहारबुद्धीचाच आश्रय घेत असतात. जगाविषयी आणि परस्परांविषयी बोलताना माणसे वापरीत असलेली भाषा आणि माणसाची वैचारिक प्रकृती ह्यांची घडण व्यवहारबुद्धीत अनुस्यूत असलेल्या सिद्धांतांनीच घडविलेली असते. माणसाची व्यवहारी बुद्धी ही जीवमूल्यांचा आणि नीतितत्त्वांचाही अचूक वेध घेते, तसेच आपण कोणती कृती करावी, ह्याचा विचार करून निर्णय घेण्याचे व त्यानुसार कृती करण्याचे सामर्थ्य माणसात असते, अशी रीडची भूमिका आहे.
पाच ज्ञानेंद्रियांहून निराळे, पण त्या सर्वांशी संपर्क साधणारे असे एक सामान्य ज्ञानेंद्रिय आपल्या ठिकाणी असते; रंग, गंध, रस, स्पर्शादी विशिष्ट इंद्रियवेदनांचे संकलन करून गुणधर्मयुक्त पदार्थ ओळखण्याची ज्ञानप्रक्रिया ह्या सामान्य ज्ञानेंद्रियाकडून घडते; ज्या गोष्टी एकेंद्रियगोचर नसून अनेकेंद्रियगोचर असतात, त्यांचीही जाणीव ह्याच ज्ञानेंद्रियाकडून घडते, असे मत ॲरिस्टॉटलने मांडले होते. त्याने मांडलेल्या ह्या ज्ञानशक्तीचे स्वरूप अस्पष्ट पण कार्य मात्र व्यापक होते. एकंदर इंद्रियजन्य अनुभवांची जाणीव, स्मृती आणि कल्पकता ही कार्येही ह्याच ज्ञानशक्तीची असल्याचे त्याने नमूद करून ठेवले आहे. व्यवहारवादाच्या बाबतीत हा प्राचीन संदर्भ लक्षणीय ठरतो.
टॉमस रीड आदींचा व्यवहारवाद हा मात्र पश्चिमी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील एका विशिष्ट परिस्थितीला विरोधी प्रतिक्रिया देण्याच्या उद्देशाने उदयाला आला. अनुभववादी तत्त्वज्ञ जॉन लॉक ह्याने असा दृष्टिकोन मांडला होता की, बाह्य जगातील वस्तूंचे आपल्याला होणारे ज्ञान साक्षात नसते; एकेका बाह्य वस्तूची प्रतिनिधी म्हणता येईल, अशी कोणती तरी वस्तू आपल्या मनात असते आणि तिच्या मार्फत आपल्याला संबंधित बाह्य वस्तूचे ज्ञान होत असते. उदा., आपण जर एखादे लाल फळ पाहात असलो, तर आपल्या मनात असलेल्या लाल रंगाच्या एका संवेदनेमार्फत आपल्याला त्या फळाचे, त्याच्या लाल रंगाचे ज्ञान होत असते. आपल्या मनातल्या ह्या लाल रंगाच्या संवेदनेचे मात्र आपल्याला साक्षात ज्ञान असते; ही संवेदना म्हणजे ‘लाल फळ’ ह्या बाह्य वस्तूची मानसिक प्रतिनिधी असते. बाह्य वस्तूंच्या अशा मानसिक प्रतिनिधी म्हणजेच लॉकच्या भाषेत ‘कल्पना’ (Ideas) होत; परंतु बाह्य वस्तूंचे ज्ञान आपल्याला साक्षात नव्हे, तर मनातील कल्पनांद्वारेच होते, अशी भूमिका घेतल्यास कोणत्याही बाह्य वस्तूचे आपल्याला खरे ज्ञानच होत नाही, असे मानावे लागते. लॉकचा अनुयायी जॉर्ज बर्क्ली ह्याने हे दाखवून दिले आणि बाह्य वस्तूंचे अस्तित्व नाकारले. पुढे अनुभववादाची व्यवस्थित मांडणी करणारा तत्त्वज्ञ डेव्हिड ह्यूम ह्याने अनुभववादाच्या सिद्धांतांतून जे निष्कर्ष काढले, त्यांतून ज्ञानमीमांसेच्या क्षेत्रात कोंडी होऊन संशयवादाला बळकटी येऊ लागली. ह्यूमने द्रव्य आणि कार्यकारणभाव ह्या संकल्पनांचे प्रामाण्य नाकारले अनुभववादी भूमिकेनुसार ‘आत्मा’ ह्या संकल्पनेलाही काही आधार नाही, हे दाखवून दिले. ह्या संशयवादातून इमॅन्युएल कांटने वाट काढली; तथापि व्यवहारवाद्यांनीही आपल्या तत्त्वज्ञानाने ह्या परिस्थितीबाबत आपली प्रतिक्रिया दिली. मानवी व्यवहारांच्या मुळाशी असलेल्या श्रद्धा तत्त्वज्ञानाने उधळून लावू नयेत, अशी त्यांची शिकवण होती. खरे तत्त्वज्ञान सामान्य बुद्धीशी कधीच प्रतारणा करीत नाही, असे रीड म्हणत असे.
विख्यात ब्रिटिश तत्त्वज्ञ जॉर्ज एडवर्ड मुर ह्यांनी व्यवहारबुद्धीची सूत्रे तर्कदृष्ट्या सिद्ध करण्यास जितकी कठीण, तितकीच खोडून टाकावयासही कठीण असतात, अशी भूमिका घेतली आहे.
संदर्भ :
- Ardley, Gavin W. R. The Common Sense Philosophy of James Oswald, Aberdeen, 1908.
- Boulter, Stephen, The Rediscovery of Common Sense Philosophy, London, 2007.
- Fieser, James, Ed. Scottish Common Sense Philosophy : Sources and Origins (Scottish Thought and Culture, 1750-1850), London, 2000.
- Lemos, Noah, Common Sense : A Contemporary Defense, Cambridge, 2004.
- Pullias, Earl V. Common Sense Philosophy for Modern Man, London, 1975.
- https://www.jstor.org/stable/3750412?seq=1
- https://www.jstor.org/stable/pdf/2179361.pdf
- https://www.newworldencyclopedia.org/entry/Philosophy_of_Common_Sense
- https://onlinelibrary.wiley.com/doi/abs/10.1002/9781118474396.wbept0180