काँदीयाक, एत्येन बॉनो दे : (३० सप्टेंबर १७१५—३ ऑगस्ट १७८०). प्रबोधनकालीन फ्रेंच तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म फ्रान्समधील ग्रनॉबल येथे एका कायदेपंडित घराण्यात झाला. सुरुवातीस त्याने धर्मोपदेशकाचा पेश पत्करला; पण त्याला धर्मशास्त्रापेक्षा तत्त्वज्ञानाचे व विज्ञानाचेच आकर्षण अधिक होते. रूसो, व्हॉल्तेअर, दीद्रो इ. तत्कालीन अग्रगण्य फ्रेंच विचारवंतांशी त्याचा चांगलाच परिचय होता. १७५८ ते १७६७ ह्या काळात तो इटलीमध्ये ड्यूक ऑफ पार्माचा मुलगा फर्डिनॅंड याचा शिक्षक म्हणून होता. १७६८ मध्ये तो फ्रान्सला परत आला. याच वर्षी त्याची ‘फ्रेंच अकादमी’वर निवड झाली. ‘रॉयल अकादमी ऑफ बर्लिन’चेही त्याला सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले.

काँदीयाकरवर लॉक (१६३२—१७०४) आणि न्यूटन (१६४२—१७२७) या इंग्रज विचारवंतांच्या अनुभववादी व वैज्ञानिक विचारसरणीचा प्रभाव पडला. त्याने देकार्तच्या (१५९६—१६५०) उपजत कल्पना, मालब्रांशचे (१६३८—१७१५) मनःशक्तीचे मानसशास्त्र, लायप्निट्सचा (१६४६—१७१६) पूर्णैकवाद (Monadism) आणि स्पिनोझाचे (१६३२—१६७७) द्रव्य ह्या तत्कालीन तत्त्वमीमांसेत मान्यता पावलेल्या तत्त्वांवर विदारक टीका केली. ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेचे सखोल विश्लेषण करून त्याने सारे मानवी ज्ञान केवळ इंद्रियदत्त वेदनांपासून उत्पन्न होते, असा आपला नवा सिद्धांत प्रतिपादन केला. आपल्या सिद्धांताचे स्पष्टीकरण व समर्थन करण्यासाठी त्याने एका मानवाकार पुतळ्याची कल्पना केली. समजा, ह्या पुतळ्याच्या ठिकाणी सर्व मानवी ज्ञानेंद्रिये आहेत व एक आत्माही ह्या पुतळ्यात प्रविष्ट आहे. सुरुवातीला ही सर्व ज्ञानेंद्रिये निद्रिस्त आहेत असेही समजूया. ह्या स्थितीत त्याच्या आत्म्याला ज्ञानाचा लवलेशही असणार नाही. मग हळूहळू ह्या पुतळ्याची ज्ञानेंद्रिये एकामागून एक या क्रमाने जागृत होताता अशी कल्पना केली, तर त्याला प्राप्त होणाऱ्या इंद्रियवेदनांपासून अवधान, चिंतन, स्मृती, सुखदुःखभाव, तुलना, निर्णय, कल्पनांचे साहचर्य, इच्छा, कल्पकता इ. आपल्या परिचयाचे मानवी मनोव्यापार व अनुभव कसे प्रतीत होतील, हे काँदीयाकने विस्ताराने विशद करून सांगितले. मानवी व्यक्तीच्या मनाचा विकास ह्याच पद्धतीने होतो, असे त्याचे मत होते; तथापि त्याच्या ह्या अनुभवनिष्ठ वेदनवादाची परिणती जडवाद, निरीश्वरवाद आणि नियतिवाद यांत झाली नाही, हे विशेष होय.

काँदीयाकचा वेदनवाद फ्रेंच तत्त्वज्ञानात क्रांतिकारक ठरला. त्याने देकार्तप्रणीत चैतन्यवादाची सद्दी संपुष्टात आणली. त्याच्या मीमांसेचे लॉकच्या मीमांसेशी बरेच साम्य आहे. दोघांचीही मीमांसा वरवर पाहून जाता मानसशास्त्रीय स्वरूपाची वाटली, तरी वस्तुतः तिचे स्वरूप ज्ञानमीमांसात्मक आणि तत्त्वमीमांसात्मक आहे. त्याच्या तत्त्वप्रणालीत विश्लेषणाचा भरपूर तपशील असला, तरी अतिसूक्ष्म घटकांची अमूर्तता, अभ्युपगमांचा स्वैर वापर, संकलनातील सुसूत्रतेचा अभाव आणि मनाच्या क्रियाशीलतेकडे त्याने केलेले दुर्लक्ष, ही वैगुण्ये तीत ठळकपणे आढळतात.

त्याचे सर्वच ग्रंथलेखन फ्रेंच भाषेत असून त्यातील काही ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. त्याच्या सुबोध व रेखीव शैलीतील महत्त्वपूर्ण ग्रंथांमुळे त्याला एक थोर विचारवंत म्हणून कीर्ती मिळाली. त्याचे महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : Essai sur l’origine des Connaissances Humaines (१७४६), Traite des Systemes (१७४९), Traite des Sensations (१७५४),  Traite des Animaux (१७५५), La Logique (१७८०), La Langue des Calculs (१७९८). त्याचे समग्र ग्रंथ १७९८ मध्ये पॅरिस येथून Oeuvres Completes de Condillac या नावाने २३ खंडात प्रसिद्ध झाले.

फ्लक्स येथे तो निधन पावला.