‘फिलॉसफिकल कॅफे’च्या मानाने ‘फिलॉसफिकल पार्क’ ही संकल्पना नवी आहे. इ.स. २००० साली इटलीतील काप्री बेटावर स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ गुन्नर ॲडलर कार्लसन याने माउंट सोलॅरोवरील ॲनाकाप्री ह्या गावी जगातील पहिले तत्त्वज्ञानोद्यान उभारले. अर्थात जपानमधील क्योटोमध्येही अशा प्रकारचा प्रयत्न झाला. मात्र या दोन उद्यानांच्या रचनेत फरक आहे. काप्रीतील उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे असणारे हस्तचित्रित फलक. क्योटोमधील उद्यानात एकही फलक नाही; मात्र विविध प्रकारची दुकाने व खानपानसेवा उपलब्ध आहेत. काप्रीमध्ये प्रवेशद्वारापाशी एतद्देशीय चवीचे अन्न पुरविणारे एकमेव उपहारगृह (Restaurant) वगळता फलकाखेरीज काहीही नाही. सुमारे साठ तत्त्वविचारांच्या फलकांखेरीज अन्य काही ‘Parco Filosofico’ या ठिकाणी अपेक्षित नाही. मात्र दोन्ही उद्यानांमध्ये तत्त्वचिंतनास पोषक असे वातावरण निर्माण करण्याची क्षमता आहे. काप्रीमध्ये सभोवतालचा समुद्र, दीपगृह आणि अर्थातच झाडे, पाने, फुले आणि मुख्य म्हणजे कमालीचा एकांतपणा आहे (येथे रखवालदारही नसतो). म्हणूनच कलानिर्मितीसाठी येथे येणाऱ्या कलावंतांचे हे आश्रयस्थान आहे. विरुद्ध क्योटोमधील ‘दि फिलॉसफिकल पाथ’ म्हणजे चेरीवृक्षांच्या सावलीतील दगडी रस्ता होय.
क्योटो विद्यापीठातील निशिदा कितारो ह्या तत्त्वचिंतकाच्या पायाखालील रस्त्याला कालांतराने ‘दि फिलॉसफिकल पाथ’ (Tetsugaku-no-michi) हे नामाभिधान प्राप्त झाले. काप्रीतील उद्यानात मात्र ‘दि पाथ’ अधोरेखित न करता विविध तत्त्वविचार संकलित केलेले आढळतात. त्यांपैकी काही खालीलप्रमाणे :
- ‘जलतत्त्व हेच आदितत्त्व’ (Water is the element and this is the origin) : थेलीझ.
- ‘ज्ञान हेच शिव आणि अज्ञान अशिव’ (There is only one good knowledge and one evil ignorance) : सॉक्रेटिस.
- ‘मला काहीही ठाऊक नाही; एवढेच मला ठाऊक आहे’ (One thing I know that, I know nothing) : सॉक्रेटिस.
- ‘मी अथेन्सवासी नाही, ग्रीक नाही; परंतु विश्ववासी आहे’ (I am not an Athenian or a Greek but a citizen of the world) : सॉक्रेटिस.
- ‘शक्य तितक्या उत्कृष्ट जगात सर्वकाही उत्कृष्टतेसाठीच आहे’ (All is for the best in the best possible worlds) : व्हॉल्टेअर.
- ‘बुद्धी ही वासनाची दासी असते व असावी; वासनांबरहुकूम असण्याखेरीज अन्य स्थान मिळविल्याचे नाटक कदापि शक्य नाही’ (Reason is and ought only to be the slave of the passions, and can never pretend to any other office than to serve and obey them) : डेव्हिड ह्यूम.
- ‘तू कोण आहेस हे जाण’ (known Thyself) : डेल्फी.
- ‘आपल्या उदारनिर्वाहासाठी घाई-गडबड-गोंगाटात व्यापारकार्ये करणाऱ्या गर्दीला पाहा’ (Behold the bustling crowds thet work and trade in order to make living) : योझेफ शुंपेटर.
- ‘थोडक्यात, तीन बाबी शेवटी उरतात : श्रद्धा, आशा व प्रेम; आणि यांपैकी सर्वश्रेष्ठ आहे, ते प्रेम’ (In short, there are three things that last; Faith, Hope and Love; and the greatest of these is love).
जर्मनीतील हायडलबर्ग येथे ‘Philosophenweg’ किंवा तत्त्वज्ञपदभ्रमण व तत्त्वज्ञानोद्यानही आहे; पण नामसादृश्याहून अधिक काही नाही. तसेच कॅनडातील टोरोंटो विद्यापीठ परिसरात तत्त्वज्ञानाच्या पदभ्रमंतीचा रस्ता राखलेला आहे; पण काप्रीप्रमाणे तो अद्यापि विकसित केला गेला नाही.
संदर्भ :
- https://www.insidekyoto.com/the-path-of-philosophy-northern-higashiyama
- http://www.philosophicalpark.com/en/index
- https://www.tourism-heidelberg.com/explore/historical-sights/heiligenberg/philosophers-walk/index_eng.html
समीक्षक : संगीता पांडे