आधुनिक तत्त्वज्ञानाला, विचारसरणीला, मूल्यांना नाकारणे हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मान्यता पावलेल्या आधुनिकोत्तरवादाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आधुनिक काळी बुद्धीला, तर्काला, विज्ञानाला, तंत्रज्ञानाला दिले गेलेले महत्त्व आधुनिकोत्तरवादास मान्य नाही. ज्ञानशास्त्रीय अधिष्ठानवादास त्यांचा विरोध आहे. तंत्रज्ञानाच्या बेफाम वारूला लगाम घालायचा प्रयत्न आहे. समाज, सामाजिक संस्था, त्यांचा इतिहास साचेबद्ध, कप्पेबंद आणि वस्तुनिष्ठ मानला गेला, तरी वास्तविक तो तसा नसतो; प्रवाही असतो. समाजात अनेक बदल होत जातात आणि त्यानुसार तो वळणे घेतो. मुळात माणसे, त्यांचे वर्तन, समाज, स्त्री-पुरुष, मुले, रूढी यांसारख्या सर्व संकल्पना ही सामाजिक रचिते होत. त्यामुळे त्याची सत्यासत्यता आपण एरवी मानतो तशी वस्तुनिष्ठ नसते. मुळात सत्य वस्तुनिष्ठ, त्रिकालाबाधित, शाश्वत, चिरंतन, अढळ असे नसते, असे सर्व आधुनिकोत्तरवादी मानतात. वेगवान युगात तेही बदलत राहते. मानव व मानवेतर सृष्टी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्यास आधुनिकवाद प्रगतीची गुरुकिल्ली वैज्ञानिक प्रगती मानतो; तर आधुनिकोत्तरवाद त्यातील धोका जाणतो. तंत्रज्ञानाचा गैरवापर झाल्याने जो संहार होतो, त्याकडे आधुनिकोत्तरवाद आपले लक्ष वेधतो. माणसाच्या अफाट बुद्धिसामर्थ्याची त्याला जाणीव आहे; पण दुष्ट हेतूंमुळे, सत्तालालसेमुळे, सत्तापिपासू वृत्तींमुळे विनाश संभवतो, तो आधुनिकोत्तरवाद अधोरेखित करतो. स्वभाव जन्मजात नसतो, तर परिस्थितीनुसार घडतो, बिघडतो नि घडविता येतो, त्यात आनुवंशिकता फारशी नसते, असा आधुनिकोत्तरवादाचा विश्वास आहे. भाषा, भाषेतील शब्द स्थितिशील नसतात. त्यांना एक आणि एकच अर्थ नसतो. वेगवेगळी माणसे तेच शब्द वेगवेगळ्या अर्थी वापरू शकतात. शब्दांची लवचिकता ससूर, देरिदा यांना अभिप्रेत आहे. व्यक्तिविशेषांकडे दुर्लक्ष करून सरसकट सर्वांना एकाच मोळीत बांधायचा खटाटोप आधुनिकोत्तरवादास अमान्य आहे. ल्योटार्ड, इरिगरे, क्रिस्तेवा, फुको या सर्वांनी आपापल्या रीतीने आधुनिकोत्तरवाद विकसित केला. ज्ञान, सत्य, ज्ञान, ज्ञानोदय, बुद्धी, नीती, प्रगती, स्वातंत्र्य आदी सर्व भव्योदात्त संकल्पना येथे गळून पडतात. मेटा-नरेटिव्हसचे गळून पडणे सर्व आधुनिकोत्तरवाद्यांस मान्य आहे. केवळ तत्त्वज्ञानातच नव्हे, तर कला, स्थापत्यशास्त्र, साहित्य विविध क्षेत्रांत आधुनिकोत्तरवादाचे पडसाद उमटले. आधुनिकोत्तरवादाची भूमिका बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, बहुप्रांतिक समाजघटकांना समाविष्ट करणारी; परंतु व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच न करणारी अशी सर्वसमावेशक आहे व म्हणून महत्त्वपूर्ण आहे.
संदर्भ :
- Cahoone, Lawrence, Ed. From Modernism to Postmodernism : An Anthology, London, 2003.
- Lyotard, J. F.; Bennington, Geoff; Massumi, Brian, Trans. The Postmodern Condition : A Report on Knowledge, Minneapolis, 1984.
- Taylor, Victor E.; Winquist, Charles E. Encyclopedia of Postmodernism, London, 2001.
- देगांवकर, अर्चना; गोखले, प्रदीप, संपा. ‘आधुनिकोत्तर सौंदर्यशास्त्राची रूपरेषा’, परामर्श, खंड २५, मे-जुलै, २००३.
- https://plato.stanford.edu/archives/spr2015/entries/postmodernism
समीक्षक : लता छत्रे