भारतीय तसेच जागतिक इतिहासात नाणकशास्त्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. गुप्तोत्तर काळामध्ये उत्तर भारतात साधारणपणे बाराव्या शतकापर्यंत म्हणजे मुस्लिम राजवटी भारतात पूर्णपणे स्थिरावेपर्यंतच्या काळामधील फारशी नाणी आढळत नाहीत, त्यामुळे हा काळ आर्थिकदृष्ट्या मंदीचा असावा असा समज होता. परंतु नवीन संशोधनानुसार अनेक नाणकशास्त्रज्ञ व इतिहास तज्ज्ञ यांनी या मताला आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते या काळातही विविध राजवंशांनी नाणी पाडली होती.

अल्लाउद्दीन खल्जी याची चांदीची नाणी.

गुप्तोत्तर काळात गुप्तकालीन नाण्यांचा प्रभाव असणारी सोन्याची नाणी बंगालमध्ये, तर चांदीची नाणी उत्तर भारतात व पश्चिम भारतात प्रचलित होती. सम्राट हर्षवर्धन (सातवे शतक) याचेही दर्शनी भागावर राजाचा चेहरा व मागील बाजूवर मोर असणारे चांदीचे नाणे उपलब्ध आहे. गुप्तोत्तर काळातील उपलब्ध नाण्यांचा अभ्यास केल्यावर असे आढळते की, या काळातील सोन्याच्या नाण्यांचे प्रमाण अतिशय नगण्य होते. या दरम्यान भारताच्या वायव्येकडील प्रदेशात हूणांनी इराणमधील सॅसॅनियन पद्धतीची नाणी (पाचवे-सहावे शतक) सुरू केली होती. हूणांनी सुरू केलेला हा नाणेप्रकार नंतरही काही बदलांसह सातव्या शतकात प्रचलित होता. त्याला इंडो-सॅसॅनियन नावाने ओळखले जाते. दर्शनी भागावर राजाचे शीर्ष व मागील बाजूवर यज्ञवेदी (अग्निकुंड) असे या नाण्यांचे मूळ स्वरूप होते. कालांतराने त्यांचे स्वरूप ओळखण्यापलीकडे बदलले. गधैया नाणी या नावाने ओळखली जाणारी ही नाणी मुख्यतः बिलनमध्ये  (चांदी व तांबे यांचा मिश्र धातू) आढळतात. या नाण्यांचा आवाका मोठा असून कोकणापर्यंत त्यांचा विस्तार झाल्याचे कळते. पंजाबमध्ये या काळात शिवाची प्रतिमा व लेख असणारी नाणी होती. काश्मीरमध्ये आठव्या ते तेराव्या शतकापर्यंत एखादा अपवाद वगळता एकसारखी तांब्याची नाणी काढली जात. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात गंधार (काबूल- ओहिंद) परिसरात राज्य करणाऱ्या शाही राजवंशाने चांदी व तांब्याची नाणी काढली. या नाण्यांच्या दर्शनी भागावर घोडेस्वार तर मागील बाजूस नंदी (बैल) होते. ही नाणी अतिशय लोकप्रिय झाली. जवळजवळ बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत अनेक राजवटींनी या प्रकारची नाणी काढली. मुहम्मद घोरीनेही या प्रकारची नाणी काढली होती. गुप्तांनंतर जवळ जवळ ३०० ते ४०० वर्षांनी गांगेयदेव या त्रिपुरीच्या कलचुरी नृपतीची  (१०१५–४०) सोन्याची नाणी आढळतात. या नाण्याच्या दर्शनी भागावर लक्ष्मीची प्रतिमा होती. त्यानंतरही राजस्थान व माळवा भागांतील अनेक राजवटींनी या प्रकारची नाणी काढली. मुहम्मद घोरीने लक्ष्मी प्रकारची नाणी काढली होती. थोडक्यात उत्तर भारतात या काळात गधैया, घोडेस्वार-बैल व लक्ष्मी या प्रकारची नाणी मोठ्या प्रमाणात चलनात होती. याला नाणकशास्त्रात प्रकारसातत्य (typological continuation) म्हटले जाते. नाण्यांमध्ये मिश्र धातूचा मोठ्या प्रमाणावर वापर हे या काळातील नाण्यांचे वैशिष्ट्य होय.

शेरशाह सूर याचे चांदीचा रुपया.

पूर्वमध्ययुगीन काळात दक्षिण भारतातील राष्ट्रकूट (आठवे-नववे शतक) राजवंशाची काही नाणी प्रकाशात आली आहेत. या काळातील दक्षिण भारतातील नाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे  प्रथमच काढण्यात आलेली एत्तद्देशीय सोन्याची नाणी. ती काढण्यासाठी या काळापर्यंत चांगलीच रूढ झालेली ठसा पद्धत (die struck technique) न वापरता प्राचीन आहत पद्धत (punching technique) वापरण्यात आली. वेंगीच्या चालुक्य राजांनी सुरू केलेली या पद्धतीची नाणी नंतर इतरही कल्याणी चालुक्य, यादव, काकतीय, शिलाहार यांसारख्या अनेक तत्कालीन राजघराण्यांनी अवलंबिली. वेगवेगळ्या चिन्हांसाठी वेगवेगळे ठसे हे या पद्धतीचे वैशिष्ट्य. या नाण्यांवर कमल, वराह, सिंह, गरुड, देऊळ, हत्ती अशी अनेक चिन्हे नाण्याच्या एकाच बाजूवर आढळतात. याशिवाय नोलंब, गोव्याचे कदंब व होयसळ या राजवंशांनी सोन्याच्या नाण्यांसाठी ठसा पद्धत वापरल्याचे निदर्शनास येते. यापेक्षा अतिदक्षिणेकडील चोल, पांड्य व चेर या घराण्यांची नाणी वेगळ्या पद्धतीची होती. दक्षिणेत या काळात चांदीची नाणी काढण्याचे श्रेय चोलांना जाते. चोल घराण्याची दर्शनी भागावर राजाची उभी प्रतिमा व मागील बाजूवर बसलेल्या राजाची प्रतिमा या प्रकारची नाणी अतिशय प्रसिद्ध होती. श्रीलंकेत ही नाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. उत्तरेत ज्याप्रमाणे गधैया, घोडेस्वार- नंदी किंवा लक्ष्मी प्रकारची नाणी चलनात होती, त्याप्रमाणे अतिदक्षिणेत उभा राजा/बसलेला राजा हा नाणेप्रकार मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होता. पांड्य राजवंशाने उभा राजा/बसलेला राजा या प्रकारची नाणी तर काढलीच; त्याचबरोबर काही नाण्यांवर बैल व मासा ही चिन्हेही वापरली.

मोगलकालीन नाणी.

मुहम्मद बिन कासीम (आठवे शतक) याच्या आक्रमणानंतर मुस्लिम राजवटीची नाणी भारतात (सिंध व मुलतान) पडण्यास सुरुवात झाली. दिल्लीमध्ये मुसलमान राजवटीने मूळ धरल्यानंतर तेथील नाण्यांचे स्वरूप पूर्णपणे पालटले. नवीन राजाच्या नावाने नाणी पाडणे व खुतबा पढणे (सार्वजनिक प्रार्थना) या दोन गोष्टी या राजवटीत अनिवार्य होत्या. यामुळे नवीन राजाची सत्ता अधिकृत होत असे. भारतात मुसलमान राजवटींनी काढलेल्या नाण्यांवर बहुतेक वेळा दोन्ही बाजूंस लेख असत. त्यामध्ये राजाचे नाव, पदवी, नाणे पाडण्याचे वर्ष व काही वेळा नाणे पाडण्यामागचे विशेष कारण यांचा उल्लेख असे. अकराव्या शतकात मुहंमद गझनीने काढलेल्या स्वाऱ्यांनंतर नाण्यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर बदल झाले. त्याच्या काही नाण्यांवर दर्शनी भागावर कलिमा तर मागील बाजूवर शारदा लिपीतील कलिमाचे संस्कृत भाषांतर आढळते. मुहम्मद घोरीची नाणी बिलनमध्ये होती. त्याच्यानंतर प्रस्थापित झालेल्या दिल्ली सुलतानांच्या राजवटीतही सुरुवातीच्या काळात घोडेस्वार-नंदी  प्रकारची नाणी काढली होती.  खल्जी घराण्यापैकी अलाउद्दीन खल्जी (तेरावे शतक) याने काढलेल्या चांदीच्या नाण्यांवरून त्याने खलिफाचे नाव हटवून स्वतःचे नाव कोरले. त्याच्या काळात रचलेला ठक्कर फेरू विरचित द्रव्यपरीक्षा हा ग्रंथ तत्कालीन भारतातील नाण्यांचे तपशील देतो. पुढे १४-१५ व्या शतकात आलेल्या तुघलक घराण्यातील मुहंमद बिन तुघलक याने टांकसाळ पद्धतीचा विस्तार केला. त्याने तांब्याची नाणी सांकेतिक नाणी (token currency) म्हणून चलनात आणली; तथापि त्याची ही योजना फसली. तुघलक घराण्यानंतर आलेल्या सय्यद व लोदी घराण्यांच्या नाण्यांमध्ये काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आढळत नाहीत.

म्हैसूर संस्थानची नाणी.

कालांतराने मध्यवर्ती दिल्ली सुलतान घराण्यांची सत्ता कमजोर होऊ लागली, तसे अनेक प्रांतांतील बलशाली सुभेदारांनी त्याचा फायदा घेऊन आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. त्यावेळी निर्माण झालेल्या बंगाल, गुजरात, माळवा, जौनपूर, काश्मीर या राज्यांमध्ये स्वतंत्र चलनव्यवस्था निर्माण झाली. दख्खनमध्ये बहमनी सत्ता स्थापन झाली. त्यांनी सुरुवातीला दिल्लीच्या नाण्यांप्रमाणे नाणी काढली. पुढे या सत्तेचे विभाजन होऊन निर्माण झालेल्या इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही व बरीदशाही यांनीही त्यांची स्वतंत्र नाणी पाडली.

लोदी घराण्याचा शेवट करून बाबरने (सोळावे शतक) भारतात मोगल राजवटीचा पाया घेतला. बाबर, हुमायून व अकबर यांनी मध्य आशियाप्रमाणे चांदीची शाहरुखी प्रचारात आणली. मधल्या काळात दिल्लीच्या तख्तावर आलेल्या शेरशाह सूरी याने चलनव्यवस्था सुधारली. त्याने बिलनची नाणी चलनव्यस्थेतून कायमची हद्दपार केली. त्यानेच प्रथम त्याच्या चांदीच्या नाण्यांना रुपया हा शब्द प्रचारात आणला. अकबराची नाणी सोने, चांदी व तांबे या तीनही धातूंची असून गोल व चौकोनी या दोन आकारांची होती. त्याच्या काळात नाण्यांवर फार्सी महिन्यांचा उल्लेख असे. जहांगीरने भेट म्हणून देण्यासाठी स्वतःचे चित्र असणारी, तसेच राशीचिन्ह असणारी नाणी काढली. शाहजहानने आपल्या नाण्यांवर स्वतःचे राज्यवर्ष हिजरी वर्षाप्रमाणे दर्शविण्यास सुरुवात केली, जो कित्ता पुढील मोगल राजांनी गिरवला. औरंगजेबाने त्याच्या धार्मिक धोरणामुळे नाण्यांवर कलिमा कोरणे बंद केले. औरंगजेबानंतर चलनव्यवस्थेत गोंधळ माजला. मोगल साम्राज्य कमकुवत झाल्यामुळे अनेक प्रांतिक सरदार मोगल सम्राटाच्या नावाने नाणी काढू लागले. त्यामुळे या काळात जवळ जवळ २०० प्रकारची नाणी चलनात होती.

शिवकालीन होन.

चौदाव्या ते सोळाव्या शतकांमध्ये भारतातील काही भागांमध्ये हिंदू राजवटी होत्या. कांग्रा, मध्य प्रांत, मिथिला, आसाम येथील हिंदू राजवटींनी आपली नाणी काढली होती. चौदाव्या शतकामध्ये दक्षिण भारतात विजयानगर साम्राज्याची स्थापना झाली. त्यांच्या नाण्यांवर नागरी, कन्नड तसेच तेलुगू भाषेतील लेख आढळतात. या साम्राज्याची नाणी प्रामुख्याने सोन्याची असून त्यांच्यावर विविध हिंदू देवतांचे अंकन केलेले दिसते.

मोगलांच्या अखेरच्या काळात मराठा साम्राज्य उदयास आले. त्याचे संस्थापक असलेल्या छ. शिवाजी महाराजांनी सोने (होन) व तांब्याची (शिवराई) नाणी काढली. पेशव्यांनी मोगल सम्राटाच्या नावाने स्वतःची नाणी व्यवहारात आणली. नादिरशाहच्या आक्रमणानंतर भारताच्या वायव्य प्रदेशावर राज्य करणाऱ्या दुर्राणी घराण्याची नाणी कलात्मक होती. याबरोबरच उत्तरेत शिखांनी व रोहिल्यांनी स्वतःची नाणी काढली. अवध संस्थानाचीही नाणी आढळतात.

दक्षिणमधील म्हैसूरच्या हैदर अलीच्या नाण्यांवर एका बाजूस ‘हैʼ हे फार्सी अक्षर व दुसऱ्या बाजूवर शिव-पार्वती किंवा विष्णू-लक्ष्मी यांच्या आकृत्या आहेत. त्याचा मुलगा टिपू सुलतान याने अनेक प्रकारची नाणी चलनात आणली. या बरोबरच भारतात व्यापारासाठी आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच, डॅनिश व इंग्लिश कंपन्यांनी (पंधरावे ते एकोणिसावे शतक) टांकसाळी काढून आपली नाणी व्यवहारात आणली होती.

संदर्भ :

  • Chattopadhyaya, B. D. Coins and Currency Systems in South India c. AD 225-1300, New Delhi, 1977.
  • Deyell, John, S. Living Without Silver, New Delhi, 1990.
  • Garg, Sanjay, Parmeshwari Lal Gupta’s Coins and History of Medieval India, Delhi,1997.
  • Gupta, Parmeshwari Lal, Coins, National Book Trust, New Delhi, 2000 (reprint).
  • Vaidehi Pujari-Bhagwat, History of Coinage in Deccan with Special Reference to Padmatankas (6th-13th Century A.D.), Karnataka Historical Research Society, Dharwad, 2017.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             समीक्षक : अभिजीत दांडेकर