वेंगी चालुक्य घराणे ही मूळच्या बदामी चालुक्य राजवंशाची (सहावे ते आठवे शतक) शाखा. चालुक्य नृपती दुसरा पुलकेशी (इ. स.६१०–६४२) याचा भाऊ कुब्ज विष्णूवर्धन हा (इ. स. ६१६– ६३३) हा शाखेचा संस्थापक. वेंगी या राजधानीतून त्यांनी साधारणतः सातवे ते बारावे शतक यांमधील काही राजकीय (इ. स. ९७३–९९९) अनागोंदीचा कालावधी वगळता राज्य केले. अति प्राचीनकाळी वापरात असणाऱ्या आहत पद्धतीचे पुनरुज्जीवन हे या घराण्याच्या नाण्यांचे वैशिष्ट्य होय.

वेंगी राजघराण्याच्या नाण्यांचे काळानुरूप दोन वर्ग पडतात. सुरुवातीच्या नृपतींची नाणी व नंतरच्या नृपतींची नाणी.

पूर्व कालखंडातील नाणी : वेंगी चालुक्य राजवंशाची सुरुवातीची नाणी तांबे या धातूमध्ये तयार केलेली असून त्यांच्यावर विष्णूकुंडिन नाण्यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. नाण्यांच्या दर्शनी भागावर बिंदूंच्या वर्तुळामधील नक्षीदार सिंह प्रतिमा आढळते. सिंहाचा पुढचा पंजा उचललेला दिसतो. मागील बाजूवर किरणांच्या वर्तुळामध्ये दोन दीपस्तंभांमधील दुहेरी त्रिशूळ ही चिन्हे दिसून येतात. दर्शनी भागावर विषमसिद्धी हा सुरुवातीच्या तेलुगू-कानडी लिपीतील लेख आढळतो. कुब्ज विष्णूवर्धन म्हणजेच विष्णूवर्धन (पहिला) व त्याचा नातू असलेल्या विष्णूवर्धन (दुसरा) या दोन्ही नृपतींनी ‘विषमसिद्धी‘ हे बिरुद धारण केले होते. याशिवाय काही नाण्यांवर श्री सत्य  हा लेख आढळतो. बदामी चालुक्य नृपती दुसरा पुलकेशी याचे एक बिरुद ‘श्री सत्याश्रय’ होते, ही बाब येथे महत्त्वाची आहे. या प्रकारची नाणी तेलंगणातील नळगोंडा व आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण या भागांत आढळतात.

या अगदी सुरुवातीच्या काळातील नाण्यांनंतर पुढे अनेक काळ या घराण्याची नाणी सापडत नाही. पुढे जवळ जवळ ३०० वर्षांनी दहाव्या शतकाच्या शेवटी बदललेल्या स्वरूपात वेंगी चालुक्यांची नाणी आढळतात.

उत्तर कालखंडातील नाणी : इ.स. ९९९ मध्ये शक्तिवर्मनने काही काळ निर्माण झालेली राजकीय अस्थिरता संपवून वेंगीवर पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित केली. त्याने पाडलेली सोन्याची नाणी ही भारतीय नाणकशास्त्रातील महत्त्वाचा टप्पा ठरतात. आहत पद्धतीचे पुनरुज्जीवन हे या काळातील नाण्यांचे वैशिष्ट्य. ही नाणी तयार करताना सोन्याच्या मोठ्या पातळ पत्र्यावर विविध ठशांच्या साहाय्याने ठोकून चिन्हे उमटवली जात. प्रत्येक चिन्हासाठी स्वतंत्र ठसा वापरला जाई.

शक्तिवर्मन : शक्तिवर्मनची (इ. स. ९९९–१०११) नाणी ६६ ते ६६.५ ग्रॅम वजनाची असून त्यावर एकूण ८ ठसे आढळतात. मधल्या ठशामध्ये, दोन दीपस्तंभांमध्ये उभा असलेला, चालुक्यांचे राजचिन्ह असणारा, उजवीकडे तोंड केलेला वराह आहे. त्याच्या वरती हत्तीचा अंकुश व छत्र, तसेच त्याच्या दोन्ही बाजूला चवऱ्या दिसून येतात. वर्तुळाकार कडांवर ७ वेगवेगळ्या ठशांमध्ये श्री- चा- लु- क्य-चं-द्र-स (संवत) असा तेलुगू- कानडी लिपीतील लेख दिसतो. ‘श्री चालुक्यचंद्र’ हे शक्तिवर्मन याने धारण केलेले एक बिरुद होते. या अक्षरापुढे राज्यारोहणाच्या ज्या वर्षी ते नाणे पाडले होते, ते वर्ष अंकांमध्ये नोंदवलेले दिसते. वराहाच्या मानेखाली एखादे तेलुगू-कानडी लिपीतील अक्षर दिसून येते. मागील बाजू कोरी आहे.

शक्तिवर्मन नंतर त्याचा भाऊ विमलादित्य गादीवर आला (इ. स. १०११–१०१८). त्याची नाणी सापडलेली नाहीत. त्यानंतर विमलादित्यचा मुलगा राजराज नरेंद्र गादीवर आला.

राजराज नरेंद्रची (राजराज पहिला) : राजराजची (इ. स. १०२२–१०६१) नाणी शक्तिवर्मनने काढलेल्या नाण्यांसारखीच असून एकूण ७ ठसे दिसून येतात. मध्यभागी असलेल्या ठशामध्ये दोन दीपस्तंभांमध्ये उभा असलेला व उजवीकडे तोंड केलेला वराह; त्याच्या वरती हत्तीचा अंकुश व छत्र, तसेच त्याच्या दोन्ही बाजूला चवऱ्या दिसून येतात. श्री -रा-ज- रा- ज -स  हा तेलुगू-कानडी लेख आढळतो. प्रत्येक अक्षर स्वतंत्र ठशात दिसते. स या अक्षरापुढे राज्यारोहणाच्या ज्या वर्षी ते नाणे पाडले होते, ते वर्ष अंकांमध्ये नोंदवलेले दिसते. राजराजची नाणी राज्यारोहण वर्ष ३ ते ३७ या वर्षांची आढळली आहेत. मागील बाजू कोरी आहे.

राजराज नरेंद्रची पत्नी, कुंदवई चोळ घराण्यातील राजकन्या होती. ती राजराज चोळ या चोळ नृपतीची कन्या होती. त्यांचा मुलगा राजेंद्र याचा विवाह चोळ राजा राजेंद्र पहिला याच्या कन्येशी अम्मंगादेवी हिच्याशी झाला होता. तो राजेंद्र चोळ दुसरा (कुलोत्तुंग पहिला) (इ. स. १०७०–१११८) या नावाने इतिहासात प्रसिद्ध झाला. त्याने वेंगी चालुक्य साम्राज्याचे चोळ साम्राज्यामध्ये विलीनीकरण केले. त्याने वेंगी चालुक्यांच्या अधिपत्याखालील प्रदेशासाठी आहत पद्धतीने, तर चोळ साम्राज्यासाठी ठसा पद्धतीने (विविध चिन्हे एकाच छापावर उमटवून तो छाप धातूच्या पत्र्यावर उमटवणे.) नाणी काढली.

कुलोत्तुंग (पहिला) : कुलोत्तुंगची नाणी वेंगीच्या या पूर्वीच्या नाण्यांच्या धाटणीची असून मध्यभागी असलेल्या मुख्य ठशाभोवती लेखाचे ठसे असे त्यांचे स्वरूप दिसून येते. कुलोत्तुंगच्या काही नाण्यांवर चोळ नारायण  किंवा चालुक्य नारायण हे तेलुगू- कानडी लिपीतील लेख (प्रत्येक अक्षर स्वतंत्र ठशात) आढळतात. मधल्या ठशामध्ये चोळ साम्राज्याचे प्रतीक असलेली व्याघ्र प्रतिमा, त्यावर सूर्य, चवरी व चंद्रकोर दिसून येतात. काही वेळा वाघाऐवजी वराह चिन्ह दिसून येते. मागील बाजू कोरी दिसते.

या शिवाय कुलोत्तुंगाची कटईकोंडचोळन किंवा मलईनाडूकोंडचोळन हे तमिळ ग्रंथ लिपीतील लेख असणारी नाणीही सापडली आहेत. या नाण्यांच्या मधल्या ठशावर दोन दीपस्तंभांमध्ये चोळ नाण्यांवर असलेली चिन्हे म्हणजे मीनद्वय, बसलेला वाघ व धनुष्य दिसतात. वरती छत्र दिसून येते. नाण्याच्या गोलाकार कडांवर स्वतंत्र ठशांमध्ये एक अक्षर या प्रमाणे लेख आढळतो.  मागील बाजू कोरी आहे.

या नाण्यांच्या व्यतिरिक्त मूळच्या नाण्यांच्या एक दशमांश वजन (साधारणपणे ६ ग्रॅम) असणारी सोन्याची नाणी सापडली आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर मोठ्या नाण्यांवर असणाऱ्या वराहाप्रमाणे वराह चिन्ह, त्यावर सूर्य व चंद्रकोर, तर मागील बाजूवर राज्यवर्ष दिसून येते. काही विद्वानांच्या मते ही फणम नाणी काढण्याचे श्रेयही वेंगी चालुक्यांना जाते.

वेंगी चालुक्यांची नाणी मोठ्या प्रमाणावर सध्याच्या आंध्र प्रदेश व तेलंगण राज्यांच्या किनारपट्टीवर सापडली आहेत. तसेच शक्तिवर्मन व राजराज यांची नाणी बंगाल उपसागरातील बेटांवरही आढळली आहेत. दावलेश्वरम (पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश) या ठिकाणी वेंगी चालुक्यकालीन नाण्यांचा मोठा संचय सापडला होता.

वेंगी चालुक्य घराण्यानंतर त्यांना अनुसरून पूर्व मध्ययुगीन काळातील कल्याणी चालुक्य, यादव, शिलाहार, काकतीय या व इतर काही राजवंशांनी आहत पद्धतीने सोन्याची नाणी काढली.

संकेत शब्द: वेंगी चालुक्य, बदामी चालुक्य, शक्तिवर्मन, राजराज, पुलकेशीन दुसरा, कुब्ज विष्णूवर्धन, राजेंद्र चोळ दुसरा (कुलोत्तुंग पहिला), दावलेश्वरम नाणे निधी, कल्याणी चालुक्य, यादव, शिलाहार, काकतीय

संदर्भ : 

  • Bhagwat, Vaidehi, History of Coinage in Deccan with Special Reference to Padmatankas (6th- 13th Century A.D.), Karnataka Historical Research Society, Dharwad, 2017.
  • Chattopadhyay, B. D., Coins and Currency Systems in South India c. AD 225- 1300, Delhi, 1997.
  • Hultzsch, E, ‘Miscellaneous South Indian Coinsʼ, Indian Antiquary, Vol. XXV, Delhi, 1985.
  • Krishna, M. H. ‘Coins of the Eastern Chalukyas (615- 1070 AD)ʼ, Annual Report of Mysore Archaeological Department, Archaeological Survey of Mysore, Banglore, 1941.
  • Mitchiner, Michale, The Coinage and History of South India, Karnataka Andhra, Part I, London, 1998.

समीक्षक : अभिजित दांडेकर