लस म्हणजे विशिष्ट रोगाचे मृत किंवा जिवंत अवस्थेतील जंतूंचा अंश असतो. ही लस दिल्यास मानवी शरीरात त्या रोगाचा प्रतिकार करण्याची पूर्वतयारी होते. लसीमधील जंतू दुर्बल असल्याने रोग तर होत नाही, परंतु शरीराला रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव येतो. त्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती प्रोत्साहित करण्याच्या या प्रक्रियेस लसीकरण (Vaccination) म्हणतात.
पार्श्वभूमी : अठराव्या शतकामध्ये सर्वप्रथम एडवर्ड जेन्नर यांनी लसीकरण पद्धतीचा वापर केला. त्यांनी देवी या रोगासाठी लसीकरणाचा पहिला यशस्वी प्रयोग केला. प्राण्यांना होणाऱ्या विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी देखील लसीकरण पद्धतीचा अवलंब केला जातो. मानवाला विषाणू (Virus) व जीवाणू (Bacteria) यांपासून अनेक सामान्य तसेच गंभीर स्वरूपाचे रोग होतात. लसीकरणामुळे संभाव्य रोगापासून आपले संरक्षण होते. लसीकरणामुळे देवी (Smallpox), गालगुंड (Mumps), घटसर्प (Diphtheria) इत्यादी रोगांचे जगभरातून समूळ उच्चाटन करण्यात यश आले आहे. तथापि हिवताप (Malaria), क्षय (TB), एड्स (AIDS) या रोगांपासून बचाव करण्यासाठी अद्याप पूर्णत: खात्रीलायक अशा लसी विकसित झालेल्या नाहीत.
अब्जांश लसनिर्मिती : अब्जांश तंत्रज्ञानाच्या वापरातून आता मोठ्या प्रमाणावर लस निर्मिती केली जाते. याकरिता लसनिर्मिती प्रक्रियेमध्ये अब्जांश कण सामान्यत: प्रतिजनाच्या (Antigen) पृष्ठभागावर स्थापित करतात. अब्जांश कणांच्या आवरणामध्ये प्रतिजन बंदिस्त करूनदेखील लसनिर्मिती केली जाते. अशा स्वरूपात तयार केलेल्या लसीचे विघटन न होता ती शरीरात जास्त काळ राहते. परिणामी तिची कार्यक्षमता वाढते. तसेच लस इच्छित अवयवापर्यंत पोहोचवता येते. त्यामुळे प्रतिकारशक्तीचा कालावधी वाढतो.
लसनिर्मितीमध्ये कार्बनी आणि जैविक पदार्थांपासून तयार केलेले तसेच जैविक विघटन होणारे व जैवसंगत (Biocompatible) असलेले अब्जांश कण मुख्यत: वापरले जातात. सोने, सिलिका, लोह, कार्बन इत्यादी अजैविक पदार्थांचे अब्जांश कणही लसनिर्मितीत वापरले जातात. मात्र, या अब्जांश कणांचे शरीरात विघटन होत नसल्याने ते शरीरात साठून राहतात. त्यामुळे त्याचे आनुषंगिक असे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
अब्जांश लसनिर्मितीमधील कणप्रकार :
(१) जैविक : जैविक पदार्थामंध्ये मोडणाऱ्या पॉलिलॅक्टिक अम्ल (Polylactic acid) आणि पॉलिगॅलॅक्टिक अम्ल (Polygalactic acid) यांचा वापर करून तयार केलेल्या अब्जांश कणांचे सजीवांमध्ये सहजपणे विघटन होते. मेदाम्ल व पाणी वापरून तयार केलेले अब्जांश कण (Liposomes) हे अविद्राव्य व विद्राव्य अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिजनांसाठी उपयुक्त आहेत.
(२) विषाणूसदृश : विषाणूसदृश कण (Virus like particles) हे विषाणूंच्या बाह्य आवरणातील प्रथिनापासून तयार करतात. त्यांच्या पृष्ठभागावर प्रतिजन आणि शरीरातील प्रतिकारशक्ती यंत्रणा कार्यान्वित करण्यास आवश्यक असे पेशीतील अन्य घटकसुद्धा रासायनिक प्रक्रियेने समाविष्ट करता येतात.
अब्जांश कणांचा आकार व आकारमान, त्यांच्या पृष्ठभागावरील विद्युतभार, त्यांचे स्थैर्य इत्यादी गोष्टी लसनिर्मितीत महत्त्वाच्या ठरतात. अब्जांश कणांचा वापरून तयार केलेल्या लसीचा काविळ या रोगावरील प्रतिबंधक लस म्हणून १९८१ मध्ये सर्वप्रथम वापर करण्यात आला.
अब्जांश कण आणि पेशीतील घटक पदार्थ यांमधील परस्परक्रिया तसेच अब्जांश कणसंचयाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम यासंदर्भात अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
मर्यादा : लसीकरणानंतर होणारे दुष्परिणाम, निर्माण होणारी मर्यादित व अल्पकालिक प्रतिकारशक्ती तसेच मानवी शरीरातील विकरांमुळे (Enzymes) लसीतील घटकांचे होणारे विघटन यांमुळे लसीकरणाच्या उपयुक्ततेवर मर्यादा येतात.
संदर्भ :
- Liang Zhao, ArjunSethetal, Vaccine 32(2014),327 -337.
- ShafiyaImtiazRafiqi, Saroj Kumar et al, Journal of Entomology and Zoology Studies5 (2), (2017), p 795-802.
समीक्षक : वसंत वाघ