एक तात्त्विक सिद्धांत. ‘निसर्ग’ ह्या शब्दाचा अर्थ संदिग्ध आहे. ‘निसर्ग’ ह्याच्या एका अर्थात निसर्ग आणि माणूस ह्यांच्यामधील भेद अभिप्रेत असतो. उदा., लाकडाची तुळई ही मानवनिर्मित वस्तू आहे, नैसर्गिक वस्तू नव्हे; पण झाड ही एक नैसर्गिक, निसर्गातील वस्तू आहे. दुसऱ्या अर्थाने निसर्ग म्हणजे जे जे काही आहे, ते सर्व, त्या सर्वांचा समुदाय किंवा व्यवस्था. ह्या अर्थाने पाहता निसर्ग म्हणजे विश्व ठरते आणि निसर्गापलीकडे काहीच असू शकत नाही, हे एक तार्किक सत्य ठरते. स्पिनोझाने ‘निसर्ग’ ह्या अर्थाने वापरलेला आहे. आणखी एका वेगळ्या अर्थाने निसर्ग आणि निसर्गातीत अस्तित्व ह्यांच्यात भेद करण्यात येतो. उदा., ईश्वर किंवा आत्मा (ह्यांना अस्तित्व असले तर) निसर्गातीत पदार्थ ठरतील आणि ‘विश्व’ ह्याचा ‘जे सर्व आहे ते’ असा अर्थ घेतला, तर निसर्ग आणि निसर्गातीत पदार्थ ह्यांचे मिळून विश्व बनते, असे म्हणावे लागेल. तत्त्वमीमांसेतील एक दृष्टिकोन, एक तात्त्विक दर्शन म्हणून निसर्गवादाचा मूलभूत सिद्धांत असा की, निसर्गातीत असे पदार्थ नसतात, असे पदार्थ आहेत असे मानायला काही आधार नाही आणि असे पदार्थ आहेत असे मानल्याने काही साधले जात नाही; विश्व हा नैसर्गिक पदार्थाचा एक समुदाय किंवा व्यवस्था आहे.
‘निसर्गातीत पदार्थ नसतात’ असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा नेमके काय नाकारण्यात येत आहे, हे स्पष्ट करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचे स्वरूप काय असते, ज्या स्वरूपाच्या पदार्थांचा संपूर्ण समुदाय (किंवा निसर्ग) म्हणजेच विश्व असते असे म्हणण्यात येत आहे ते स्वरूप कोणते, हे स्पष्ट करावे लागते. निसर्गवादाचे ह्याविषयीचे म्हणणे असे आहे की, प्रत्यक्षानुभव आणि तर्क−प्रत्यक्षानुभवाने ज्यांचे निष्कर्ष पारखण्यात येतात अशी अनुमाने−ह्या प्रमाणांनी ज्या वस्तूंच्या अस्तित्वाचे व स्वरूपाचे ज्ञान आपल्याला होते, त्या वस्तू म्हणजे नैसर्गिक वस्तू. ज्ञान प्राप्त करून घेण्याची हीच एकमेव प्रमाण अशी पद्धती आहे आणि विज्ञानात ह्या पद्धतीच्या वापराचा आदर्श नमुना आपल्याला आढळतो. ह्या पद्धतीने प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानाचे विषय असलेल्या वस्तू म्हणजे नैसर्गिक वस्तू आणि अशा वस्तूंचा निःशेष समुदाय किंवा व्यवस्था म्हणजे निसर्ग. ह्या प्रकारच्या ज्ञानाशिवाय अन्य प्रकारचे ज्ञान, उदा., अतींद्रिय ज्ञान नसते आणि म्हणून अशा अतींद्रिय ज्ञानाचे विषय असलेले असे निसर्गातीत पदार्थ नसतात. निसर्गवादाचे म्हणणे असे आहे की, विश्वात जे काही आहे त्याचे स्वरूप एकजिनसी आहे आणि हा एकजिनसीपणा ज्ञानाच्या एकमेव प्रमाण रीतीवर आधारलेला आहे.
ह्यामुळे निसर्गवाद आणि जडवाद यांच्यात भेद केला पाहिजे. जडवादाच्या सिद्धांताप्रमाणे विश्वात केवळ जड किंवा भौतिक वस्तूंनाच अस्तित्व असते, घडणाऱ्या सर्व घटना केवळ भौतिक स्वरूपाच्या असतात आणि वेगळ्या स्वरूपाच्या भासणाऱ्या घटना, प्रक्रिया, उदा., जैव किंवा मानसिक प्रक्रिया, ही भौतिक प्रक्रियांचीच अधिक गुंतागुंतीची रूपे असतात. अस्तित्वाचे स्वरूप ह्या प्रकारे एकजिनसी असते, असे निसर्गवादाला मानायचे कारण नाही (अर्थात असे मानायला त्याची आडकाठीही नाही). उदा., मानसिक तत्त्व हे जडतत्त्वाहून भिन्न आणि स्वतंत्र असते, असे एखादा निसर्गवादी मानू शकेल. मात्र ह्या तत्त्वाचे आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने ज्ञान होत असले पाहिजे आणि त्याचे अस्तित्व व कार्य हे पूर्णपणे निसर्गाच्या व्यवस्थेत समाविष्ट असले पाहिजे.
निसर्गवादाची भूमिका काहीशी विस्तृतपणे अशी मांडता येईल : विश्व ही नैसर्गिक वस्तूंची व्यवस्था आहे. नैसर्गिक वस्तू, उदा., दगड, ग्रहगोल, झाड, माणूस इ. नैसर्गिक कारणांनी अस्तित्वात येतात, टिकून राहतात आणि नाश पावतात. नैसर्गिक कारण म्हणजे नैसर्गिक वस्तूमध्ये किंवा वस्तूंच्या समुदायामध्ये घडलेली अशा स्वरूपाची घटना की, तिच्यामुळे दुसऱ्या कोणत्यातरी नैसर्गिक वस्तूमध्ये बदल घडून येतो. कोणत्याही नैसर्गिक वस्तूमध्ये झालेल्या बदलाचे स्पष्टीकरण त्या वस्तूमध्ये आणि इतर नैसर्गिक वस्तूमध्ये घडलेल्या घटनांच्या साहाय्याने पूर्णपणे करता येते. ही कारणपरंपरा आपण कितीही दूरवर रेखीत नेली, तरी ह्या कारणांचे स्वरूप नैसर्गिक वस्तूमध्ये घडलेल्या घटना असेच असते. निसर्गव्यवस्थेच्या बाहेर असलेल्या कोणत्याही कारणाचा कधी आधार घ्यावा लागत नाही आणि असा आधार कुणी घेतला, तर तो फोल असतो, त्याने कशाचेच स्पष्टीकरण होत नाही. विश्वात केवळ नैसर्गिक घटना घडतात आणि इतर नैसर्गिक घटना ही त्यांची संपूर्ण कारणे असतात. निसर्गातीत घटना नसतात आणि निसर्गातीत कारणेही नसतात.
एखाद्या नैसर्गिक घटनेचा उलगडा करायचा म्हणजे कोणत्या नैसर्गिक कारणांनी ती घडून आली आहे, हे स्पष्ट करायचे. असे स्पष्टीकरण करणे जर शक्य असायचे असेल, तर ह्या कारणांनी नियमितपणे, नियमांना अनुसरून आपापले परिणाम घडवून आणले पाहिजेत. तेव्हा निसर्ग हा नैसर्गिक वस्तूंचा केवळ समुदाय नसतो, निसर्गनियमांना अनुसरून परस्परांवर कार्ये करणाऱ्या नैसर्गिक वस्तूंची ती एक व्यवस्था असते. माणूस आणि मानवी समाज हाही ह्या निसर्गव्यवस्थेचा एक भाग आहे आणि म्हणून सर्व मानवी वर्तनाचे व सामाजिक प्रक्रियांचे वैज्ञानिक पद्धतीला अनुसरून स्पष्टीकरण करता येते, ज्या नियमांना अनुसरून ह्या घटना घडतात, ते शोधून काढता येतात.
आपल्या नेहमीच्या जीवनात, सर्वसामान्य व्यवहारात वस्तूंचे, घटनांचे ज्ञान आपण ज्या रीतीचा अवलंब करून मिळवितो, त्याच रीतीला अधिक सुव्यवस्थित आकार देऊन व तिचा पद्धतशीरपणे वापर करून आपण वैज्ञानिक ज्ञान कमावतो. तेव्हा एकतर व्यवहारज्ञान आणि विज्ञान यांच्यामध्ये सातत्य असते आणि दुसरी गोष्ट अशी की, आपल्या व्यवहारातील समजुती आणि वैज्ञानिक उपपत्ती यांच्यात जेव्हा संघर्ष येतो, तेव्हा वैज्ञानिक उपपत्ती पसंत करणे योग्य असते; पण कोणत्याही क्षणीचे वैज्ञानिक ज्ञान अंतिम नसते. वैज्ञानिक उपपत्तींची अनुभवाच्या कसोटीवर सतत पारख होत असते. विशिष्ट वैज्ञानिक उपपत्ती कितीही सुस्थिरपणे प्रस्थापित झाली आहे असे आपल्याला वाटत असले, तरीही तिच्याशी विसंवादी असे अनुभव प्राप्त होऊ शकतात आणि ती दुरुस्त करावी, सुधारावी लागते. स्वतःला सदैव सुधारित राहण्याची क्षमता आणि प्रवृत्ती हे वैज्ञानिक ज्ञानाचे लक्षण असते आणि वैज्ञानिक विचारपद्धतीवर ते आधारलेले असते. तेव्हा कोणताही काळ घेतला, तर त्या काळाचे वैज्ञानिक ज्ञान हेच त्या वेळी उपलब्ध असलेले सर्वोत्कृष्ट ज्ञान असते; पण ते अंतिम दृष्टीने सत्य असते असा कुणाचा दावा असत नाही.
वैज्ञानिक ज्ञान हेच निसर्गाचे प्रमाण ज्ञान असले, तरी माणसाचा व निसर्गाचा संबंध केवळ ज्ञानापुरता मर्यादित असतो, असे मानायचे कारण नाही. ज्ञानाशिवाय अन्य प्रकारेही माणसाला निसर्गाचा अनुभव येऊ शकतो. माणसाचे सर्व व्यवहार, मानवी व्यक्तींचे शारीरिक, मानसिक व्यवहार, व्यक्तींच्या गटांचे सामाजिक व्यवहार, मानवी संस्था इ. सर्व निसर्गव्यवस्थेचा एक भाग आहे. मानवी व्यवहाराची इतर प्रकारच्या नैसर्गिक व्यवहाराशी तुलना केली असता त्याचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आढळून येते; हे जितके खरे, तितकेच हा व्यवहार निसर्गव्यवस्थेचा भाग असतो, हेही खरे आहे. मानवी मूल्ये, नीती कोणत्याही निसर्गातीत अस्तित्वावर आधारलेली नसते, तर आपल्या प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला जे अनुभव येतात त्यांच्यावर आपली मूल्ये आधारलेली असतात आणि ह्या अनुभवाच्या कसोटीवर आवश्यक तेव्हा त्यांच्यात परिवर्तन करणे योग्य ठरते.
सारांश, एका व्यापक स्वरूपातील वैज्ञानिक विचारपद्धती हीच एकमेव प्रमाण ज्ञानपद्धती आहे. असे असल्यामुळे निसर्गवाद्यांच्या मते भौतिकीसारख्या विशिष्ट विज्ञानांचे जसे एक बरेचसे सुस्पष्ट असे ज्ञानक्षेत्र असते, तसे तत्त्वज्ञानाचे नसते. मानवी ज्ञानाच्या व विशेषतः व्यवहाराच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत ज्या समस्या निर्माण होतात त्यांच्या स्वरूपावर प्रकाश टाकणे, त्यांची सोडवणूक करण्यासाठी विचार पुढे नेणे, हे तत्त्वज्ञानाचे कार्य असते व विवेकाच्या पद्धतीचा म्हणजेच प्रमाण ज्ञानपद्धतीचा वापर करून तत्त्वज्ञानाने हे कार्य पार पाडायचे असते.
ऐतिहासिक दृष्ट्या पाहता निसर्ग आणि निसर्गातील पदार्थ असे द्वंद्व निर्माण होईपर्यंत तत्त्वज्ञान स्वाभाविकपणे निसर्गवादी असते आणि हे द्वंद्व मुख्यतः धार्मिक व आध्यात्मिक प्रेरणेच्या प्रभावामुळे निर्माण होते. ग्रीक तत्त्वज्ञानाच्या इतिहासात पायथॅगोरस, पार्मेनिडीझ आणि प्लेटो ह्यांच्या परंपरेतील तत्त्वज्ञान सोडले, तर उरलेले तत्त्वज्ञान निसर्गवादीच होते, असे म्हटले पाहिजे. हे द्वंद्व स्पष्टपणे आणि प्रभावीपणे प्लेटोच्या तत्त्वज्ञानात आढळते आणि त्याचा काहीसा अनुवाद ॲरिस्टॉटलने केला आहे; पण ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाला एक भक्कम निसर्गवादी बाजू आहे. आधुनिक काळात प्रबोधनकाळापासून निसर्गवादाला चालना मिळाली. जोर्दानो ब्रूनो (१५४८–१६००) आणि बारुक स्पिनोझा (१६३२–७७) ह्यांच्या तत्त्वज्ञानात निसर्गवादाचे सूत्र आढळते. पण वैज्ञानिक ज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती यांना स्थिरता आणि प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर निसर्गवाद परत प्रभावी ठरणे स्वाभाविक झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एल. बूख्नर (१८२४–९९) व एर्न्स्ट हेकेल (१८३४–१९१९) ह्या जर्मन वैज्ञानिकांमुळे तत्त्ववेत्त्यांची निसर्गवादी शिकवण बरीच प्रभावी ठरली. १९३० आणि १९४० या दशकांत अमेरिकन विद्यापीठांतही निसर्गवाद मान्यता पावला होता. कार्ल मार्क्स (१८१८–८३) याचे ऐतिहासिक, भौतिकवादाचे तत्त्वज्ञान आणि प्रसिद्ध भारतीय विचारवंत एम. एन. रॉय (१८८७–१९५४) यांचा नवमानवतावाद ही निसर्गवादी तत्त्वज्ञानाची दोन प्रसिद्ध उदाहरणे होत.
संदर्भ :
- Hook, Sidney, The Quest for Being, New York, 1961.
- Kallen, Horace; Hook, Sidney, Ed. American Philosophy Today and Tomorrow, New York, 1935.
- https://plato.stanford.edu/entries/naturalism/
- https://www.iep.utm.edu/naturali/
- https://www.allaboutphilosophy.org/naturalism.htm
- https://www.philosophybasics.com/branch_naturalism.html