एक तात्त्विक संकल्पना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्रारंभापासून विश्वाच्या दोन वैशिष्ट्यांना तात्त्विक विचारात मध्यवर्ती स्थान लाभले आहे. वस्तूंमध्ये होणारे परिवर्तन किंवा बदल आणि वस्तूंची अनेकता, अनेक भिन्न वस्तूंचे अस्तित्व ही ती वैशिष्ट्ये होत. ही वैशिष्ट्ये परस्परांशी संबंधित आहेत. थेलीझ (इ.स.पू. सातवे-सहावे शतक) इ. मायलीशियन तत्त्ववेत्त्यांनी वस्तुजातामागे कोणतेतरी एक मूलतत्त्व आहे आणि त्याच्यापासून कोणत्यातरी प्रक्रियेने अनेक भिन्न वस्तू उद्भवतात, असे मानले आहे. ह्या विचारामागचे गृहीतकृत्य असे की, खरेखरे अस्तित्व हे स्थिरस्वरूप आणि एक आहे; परिवर्तन व अनेकता ही अस्तित्वाची दुय्यम व गौण वैशिष्ट्य आहेत आणि त्यांचा उलगडा करावा लागतो.

पार्मेनिडीझ (इ.स.पू. सहावे-पाचवे शतक) याच्या तत्त्वज्ञानात गृहीतकृत्य स्पष्ट झाले. पार्मेनिडीझच्या म्हणण्याप्रमाणे ‘जे आहे, ते आहे व जे नाही, ते नाही. परिवर्तन होणे, काही घडणे म्हणजे ‘जे नाही (नव्हते), ते आहे’ असे होणे आणि हा विचार आत्मव्याघाती असल्यामुळे परिवर्तन घडणे, हे तर्कतःच अशक्य आहे. पण परिवर्तन होते, घटना घडतात, असा आपला अनुभव आहे. तेव्हा परिवर्तन हा आभास आहे आणि जे आहे ते, खरीखुरी वास्तवता अचल, अपरिवर्तनीय असते, हे तिचे सम्यक स्वरूप आहे, असे पार्मेनिडीझ मानतो. बारूख स्पिनोझा (१६३२–७७), एफ. एच. ब्रॅड्ली (१८४६–१९२४) इ. केवलवादी तत्त्ववेत्त्यांनी भूमिका मूलतः अशीच आहे.

ह्याच्या पूर्णपणे विरोधी मत हेराक्लायटस (इ.स.पू.सु. ५३६–४७०) याने मांडले. ह्या मताप्रमाणे परिवर्तन, बदल, प्रक्रिया हेच अस्तित्वाचे अंतिम स्वरूप आहे. सामान्यपणे वस्तू बदलते, तिच्यामध्ये परिवर्तन होते, असे आपण म्हणतो. असे म्हणण्यात वस्तू स्थिरपणे टिकून राहते पण तिचे स्वरूप कधी असे, कधी वेगळे असते, असे अभिप्रेत असते; पण अशा टिकून राहणाऱ्या वस्तू असतात, हेच हेराक्लायटस नाकारतो. पार्मेनिडीझचा युक्तिवाद असा होता की, परिवर्तन आत्मव्याघाती आहे; कारण त्याच्यात जे आहे, ते नाही व जे नाही, ते आहे असे मानावे लागते. हेराक्लायटसचे उलट म्हणणे असे की, असे आत्मव्याघाती असणे हे वास्तवतेचे स्वरूप आहे. वास्तवतेतच परस्परविरोधी तत्त्वांचा ताण असतो; परस्परविरोधी तत्त्वांची गतिशील एकता असेच वास्तवतेचे स्वरूप आहे. स्थिरस्वरूप वस्तू नसतात. त्यांच्या स्वरूपातच विरोधी तत्त्वांचा ताण असतो आणि त्यामुळे त्या सतत बदलत असतात. त्यांचे एक स्वरूप असते आणि ते कधीकधी परिवर्तन पावते असे नसते; तर एक विशिष्ट परिवर्तन हेच वस्तूचे स्वरूप असते. आधुनिक तत्त्ववेत्त्यांमध्ये जी. डब्ल्यू. एफ. हेगेल (१७७०–१८३१) आणि आंरी बेर्गसाँ (१८५९–१९४१) ह्यांनी ह्या दृष्टिकोनाचे प्रतिपादन केले आहे.

अस्तित्व हे अपरिवर्तनीय असते आणि परिवर्तन हा आभास आहे, हे एक मत आणि परिवर्तन, प्रक्रिया हेच अस्तित्वाचे सम्यक स्वरूप आहे, हे विरुद्ध मत, यांच्यामधील मध्यममार्गी मत असे मांडता येईल : अनेक मूलतत्त्वे असतात आणि प्रत्येक मूलतत्त्व अपरिवर्तनीय असते. ही मूलतत्त्वे वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र येतात किंवा परस्परांपासून विभक्त होतात आणि वस्तूमध्ये दिसणारा व घडून येणारा बदल याच्यात सामावलेला असतो. उदा., अनेक परमाणू असतात, प्रत्येक परमाणू अपरिवर्तनीय असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे परमाणू वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र आल्याने किंवा विभक्त झाल्याने वस्तूमध्ये परिवर्तन घडते.

खरेखुरे अस्तित्व अपरिवर्तनीय असले पाहिजे हा सिद्धांत आणि परिवर्तन हे अनुभवाला येणारे वस्तूंचे वैशिष्ट्य, ह्यांच्यात सुसंवाद कसा साधायचा, त्यांची सुसंगत व्यवस्था कशी लावायची, हा तत्त्वज्ञानातील एक मध्यवर्ती आणि चिरंतन प्रश्न आहे. परिवर्तन हे कालात घडत असल्यामुळे कालाचे स्वरूप काय आहे आणि वास्तवतेमध्ये कालाचे स्थान काय आहे, हे प्रश्नही ह्या प्रश्नाशी संबंधित आहेत. ह्या प्रश्नांना तत्त्ववेत्त्यांनी जी उत्तरे दिली आहेत त्यांच्यावरून त्यांचे द्रव्यवादी तत्त्ववेत्ते–म्हणजे स्थिरस्वरूप द्रव्याला प्राधान्य देणारे–उदा., स्पिनोझा, ब्रॅड्ली; प्रक्रियावादी उदा., बेर्गसाँ आणि मध्यममार्गी उदा., जी. डब्ल्यू. लायप्निट्स (१६४६–१७१६), इमॅन्युएल कांट (१७२४–१८०४), हेगेल, ए. एन्. व्हाइटहेड (१८६१–१९४७) इ. असे वर्गीकरण करता येईल. ह्या संदर्भातील आणखी एक मुद्दा असा की, जर सर्व परिवर्तन निश्चित नियमांना अनुसरून घडते असे आपण मानले, तर एका अर्थाने परिवर्तनाला आपण गौण स्थान देत असतो. ह्यामुळे बेर्गसाँसारखे प्रक्रियावादी तत्त्ववेत्ते परिवर्तन हे अस्तित्वाचे मूलभूत स्वरूप आहे एवढेच म्हणत नाहीत, तर विश्वाची प्रगती सर्जनशील असते, भविष्यकाल नियमांनी जखडलेला नसतो, मुक्त असतो असे मानतात.

भारतीय परिवर्तन तत्त्व : विश्वात काहीही शाश्वत अपरिवर्तनशील नाही. विश्वाच्या उत्पत्ती-स्थिति-लयाचे चक्र निरंतर चालू राहते, असा विचार ऋग्वेदातील नासदीय सूक्तात स्पष्टपणे प्रथम व्यक्त झाला. याच्या उलट श्वेताश्वतरोपनिषदात विश्व हे क्षर आणि अक्षर यांचा संगम होय, असा विचार मांडला आहे. क्षर म्हणजे परिवर्तनशील असे हे दृश्य विश्व; हे ज्या जड द्रव्याचे बनले आहे, ते प्रकृतिरूप द्रव्य होय; हे क्षर नित्य बदलणारे आहे. अक्षर म्हणजे अमर असा परमेश्वर होय. त्यानंतर सांख्यदर्शनात आणि भगवद्गीतेत विश्वामध्ये परिणामी नित्य आणि कूटस्थ नित्य अशी दोन तत्त्वे असून त्या दोन तत्त्वांचे मिळून विश्व बनले आहे, असा सिद्धांत मांडला आहे. परिणामी नित्य म्हणजे सतत प्रतिक्षणी परिवर्तन पावणारे, बदलणारे प्रकृतितत्त्व होय आणि कूटस्थ नित्य म्हणजे जे तत्त्व विकार पावत नाही, असे शुद्ध स्वरूपात राहणारे तत्त्व होय. कूटस्थ म्हणजे निर्विकार. जीवात्मे म्हणजे पुरुष आणि परमेश्वर म्हणजे परम पुरुष ही कूटस्थ नित्य होत. जीवात्मे आणि परमेश्वर हे शाश्वत निरंतर साक्षी म्हणजे द्रष्टे आहेत आणि सतत परिणामी नित्य प्रकृतीचेच दृश्य विश्व हे रूप होय.

सांख्यदर्शनाप्रमाणे परिणामी नित्य व कूटस्थ नित्य ही दोन सत् तत्त्वे होत. सत् तत्त्व कधीही असत् होत नाही, म्हणजे त्याचा अभाव नसतोच आणि जे असत् असते, ते कधीही सत् बनत नाही. आकाश, वायू, तेज, प्रकाश, जल, पृथ्वी, अंतःकरण त्याचे कामक्रोधादी विकार, जाणीव, विचार इ. सगळे कार्यरूप अंतर्विश्व आणि बहिर्विश्व हे सारखे परिवर्तन पावत असते. यावर आक्षेप असा की, ते सत् कार्य आहे, ते उत्पन्न होऊन विनाश पावते, उत्पत्ति-स्थिति-लयाचे चक्र सारखे सुरू असते, अशा स्थितीत सत् कार्य हे असत् होत नाही व जे असत् असते ते कधीही सत् कार्य बनत नाही, हा सिद्धांत अनुभवाने बाधित होतो. या आक्षेपाला सांख्यदर्शनाचे उत्तर असे आहे की, उत्पत्तीपूर्वी घटपटादी दृश्य कार्यपदार्थ असतातच; परंतु ते कार्यपदार्थ तिरोभूत म्हणजे लपलेले असतात आणि कारणसामग्रीने ते उत्पन्न होतात, म्हणजे आविर्भूत अथवा प्रकट होतात. त्यांचा विनाश होतो म्हणजे, ते पुन्हा तिरोभूत किंवा अदृश्य होतात. तात्पर्य असे की, उत्पत्तीपूर्वी आणि विनाशानंतर कार्ये असताततच; उदा., चित्रपटामध्ये क्रमाने, ओळीने चित्रे रेखाटलेली असतात. चित्रपट गुंडाळून ठेवला तरी ती नष्ट होत नाहीत आणि चित्रपट उघडला म्हणजे ती उत्पन्न होत नाहीत; तसे हे सर्व कार्यरूप विश्व सतत कायम राहतेच; यास सांख्यदर्शनात ‘सत्कार्यवाद’ ही संज्ञा आहे.

वैशेषिक दर्शनामध्ये आरंभवाद सांगितला आहे. आरंभापूर्वी म्हणजे उत्पत्तीपूर्वी कार्ये नसतात. त्यांना असत् म्हणतात. म्हणजे कार्यांचा प्रागभाव असतो. कारणसामग्री जुळल्यावर ती सत् बनतात. नंतर कार्याचा नाश होतो; म्हणजे कार्याचा अभाव होतो. यास प्रंध्वसाभाव म्हणतात.

बौद्ध दर्शनाप्रमाणे अक्षर किंवा नित्य असे काहीच नाही; जे जे सत् आहे, ते ते उत्पत्तीपूर्वी असत् असते. सगळे अस्तित्व हे परिवर्तनशील आहे. परिवर्तनरहित असे द्रव्य, असा आत्मा किंवा परमेश्वर नाही. ज्याला द्रष्टा किंवा आत्मा म्हणून म्हणतात, तोही जाणीव किंवा ज्ञानरूपच आहे. ज्ञानाचा अखंड प्रवाह वाहत असतो. प्रत्येक ज्ञान किंवा जाणीव ही क्षणिक असते. म्हणून तात्पर्य असे, जे जे सत् ते क्षणिक असते. सतत परिवर्तनशीलता हाच सत्चा स्वभाव आहे, असे बौद्ध दर्शन मानते.

संदर्भ :

  • https://plato.stanford.edu/entries/change/
  • https://science.jrank.org/pages/8572/Change-Antiquity.html
  • https://www.jstor.org/stable/27743793?seq=1
  • https://faculty.washington.edu/smcohen/320/archange.htm
  • https://philosophyforchange.wordpress.com/2008/04/07/heraclitus-on-change/