साळुंकी (ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस)

पक्षिवर्गाच्या स्टर्निडी (Sturnidae) कुलातील पॅसेरिफॉर्मीस (Passeriformes) गणामध्ये या पक्ष्याचा समावेश होतो. हा पक्षी सामान्य मैना वा भारतीय मैना या नावानेही ओळखला जातो. निरनिराळे हवामान व अधिवासामध्ये जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे तिचा आढळ उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांत सर्वत्र आहे. तसेच मानवी वस्त्यांजवळ साळुंकी पक्षी आढळतो. हा पक्षी मध्यपूर्व भारतातील असून त्याचा प्रसार द. आफ्रिका, मध्यपूर्व ऑस्ट्रेलिया ई. अमेरिका व न्यूझीलंड येथेही आहे.

भारतीय उपखंडात असलेल्या साळुंकीचे शास्त्रीय नाव ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस (Acridotheres tristis) असे आहे. ॲ.  ट्रायस्टिस मेलॅनोस्टर्नस (A. tristis melanosternus), ॲ. ट्रायस्टिस ट्रायस्टिस (A. tristis tristis), ॲ.  ट्रायस्टिस नौमनी (A. tristis naumanni) व ॲ.  ट्रायस्टिस ट्रायस्टॉइड्स (A. tristis tristoides) अशा साळुंकीच्या पाच उपजाती आहेत. त्यातील ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस ट्रायस्टिस  ही उपउपजाती तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान, ताजिकिस्तान, इराण, अफगाणिस्तान, संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये दक्षिणेपासून हिमालयाच्या पायथ्याशी (श्रीलंका सोडून), म्यानमार, चीन, थायलंड, इंडोनेशिया, मलाया, पेनिनसुला व सिंगापूर येथे आढळते.

किनारी साळुंकी (ॲक्रिडोथिरिस गिंगीनिॲनस)

साळुंकी या मध्यम आकाराच्या पक्ष्याची लांबी २३—२७ सेंमी. असून नर व मादी दिसायला सारखेच असतात. वजन ८३—१४३ ग्रॅ. आणि पंखविस्तार १२०—१४२ मिमी. असतो. संपूर्ण डोके, मान आणि छातीचा वरचा भाग काळा, शरीराचा बाकी भाग गर्द तपकिरी, पोटाचा मागचा भाग पांढरा, शेपटीचे टोक व बाहेरील पिसे पांढरी असून उडताना ती दिसून येतात. चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात. डोळे तांबूस तपकिरी असून त्याच्या खालचा व मागचा भाग तकतकीत पिवळ्या रंगाचा असतो व त्यावर पिसे नसतात.

साळुंकी (ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस)

किनारी साळुंकी (Bank mayna) : हिचे शास्त्रीय नाव ॲक्रिडोथिरिस गिंगीनिॲनस (Acridotheres ginginianus) असे आहे. ती गुजरात, राजस्थान व पाकिस्तान या भागांत आढळते. ती ॲ. ट्रायस्टिस या प्रजातीपेक्षा आकाराने लहान असून लांबी सु. २२ सेंमी. व वजन ६४—७६ ग्रॅ. असते. तिचा रंग फिकट निळसर-राखाडी असतो. चोच नारिंगी असते. डोळ्याखालील व मागील भाग नारिंगी रंगाचा असून त्यावर पिसे नसतात.

साळुंक्या सहसा जोडीने वावरतात. प्रसंगानुरूप ती वेगवेगळे आवाज काढते. काही मंजूळ, तर काही कर्कश आवाज काढतात. हा पक्षी सर्वभक्षक असून फळे, धान्य, गांडुळे, टोळ तसेच सर्व प्रकारचे किडेही खातो. त्याच्या किडे व कीटक खाण्यामुळे शेतातील पिकांचे रक्षण होते. त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते.

 

साळुंकी : ऑस्ट्रेलियन शासनाने घोषित केलेला धोकादायक पक्षी.

ऑस्ट्रेलियामध्ये साळुंकीला सन १८०० मध्ये कीटकांच्या बंदोबस्तासाठी नेले गेले, परंतु ऑस्ट्रेलियामध्ये साळुंकीला नैसर्गिक शत्रू नसल्याने व तिथे त्यांचा प्रसार झपाट्याने झाल्याने अनेक ऑस्ट्रेलियन पक्ष्यांना धोका निर्माण झाला. ती इतर स्थानिक पक्ष्यांच्या घरट्यांतील अंडी व पिले नष्ट करून घरटी काबीज करू लागली. त्यामुळे तेथील स्थानिक प्राणी व पक्ष्यांमध्ये घट होऊ लागली. विशेषत: अंजीर फळांचा फडशा पाडत असल्यामुळे ऑस्ट्रेलियामधील हा त्रासदायक पक्षी ठरला आहे. त्यामुळे जगातील १४० आक्रमक प्रजातींपैकी ती एक धोक्याची जाती आहे असे ऑस्ट्रेलियन शासनाने घोषित केले आहे.

साळुंकी : घरट्यातील अंडी व पिले.

साळुंकीचा विणीचा हंगाम प्रदेशानुसार बदलतो. तो एप्रिल-ऑगस्ट असून तिची वीण वर्षातून २-३ वेळा होते. घरटे झाडाच्या ढोलीत, घराच्या वळचणीला किंवा भिंतीवरील भोकामध्ये असते. घरटे कागद, पिसे, चिंध्या, गवत इत्यादींपासून बनविलेले असते. नर व मादी मिळून घरटे बांधतात आणि वर्षानुवर्षे एकच घरटे डागडुजी करून वापरतात. घरट्यामध्ये मादी तकतकीत निळ्या रंगाची ४-५ अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम नर-मादी दोघेही करतात. १७-१८ दिवसांनी अंड्यातून पिले बाहेर येतात. २०—३२ दिवसांनी पिले उडू लागतात. ती तीन आठवड्याची झाली की घरटे सोडून जातात. ९—१२ महिन्यांनी पिलू प्रजननक्षम होते. साळुंकीची आयुर्मर्यादा ४-५ वर्षे असते.

पहा : डोंगरी मैना.

संदर्भ :

  • https://www.hbw.com/species/common-myna-acridotheres-tristis
  • https://www.daf.qld.gov.au/__data/assets/pdf_file/0020/62066/IPA-Indian-Myna-PA28.pdf
  • https://www.britannica.com/animal/mynah#ref73831

समीक्षक – कांचन एरंडे