एखाद्या पदार्थाच्या एकक आकारमानात असणाऱ्या वस्तुमानास (mass) त्याची घनता म्हणतात. सर्व अवस्थांतील द्रव्याच्या बाबतीत सहज मोजता येण्यासारखी ही एक राशी आहे. घनता सामान्यपणे ग्रॅम प्रती घनसेंमी. (किंवा मिलिलिटर), पौंड प्रती घनफूट किंवा पौंड प्रती गॅलन या एककात मोजतात. अभियांत्रिकीमध्ये बऱ्याच वेळा पदार्थाच्या एकक आकारमानातील द्रव्याचे वजन (वस्तुमान नव्हे, वजन’) अशी घनतेची व्याख्या करतात व ती पौंड प्रती घनफूट, किलोग्रॅम प्रती लिटर किंवा किलोग्रॅम प्रती घनमीटर या एककात लिहितात.

सर्व द्रव्यांची घनता तापमानावर अवलंबून असते. मिश्रणाची घनता त्याच्या संघटनेवर (त्यातील घटकांवर) अवलंबून असते, तर वायूंची दाबावर अवलंबून असते. घनता मोजताना सामान्यपणे पदार्थाचे हवेत (घनता ०·००१२ ग्रॅ./घ. सेंमी.) वजन करतात. यामुळे पदार्थाच्या वजनात उत्प्रणोदनाने (upthrust) वा उत्पलावनाने  किंवा उद्धरण-बलाने (पदार्थावर खालून वर लागू होणाऱ्या बलाने) तूट येते म्हणून पदार्थाच्या घनतेच्या निश्चित मापनात यासाठी जरूर ती दुरुस्ती करावी लागते. वायूंच्या घनतामापनाखेरीज इतर पदार्थांच्या बाबतीत यामुळे करावी लागणारी दुरुस्ती नगण्य असते.

पदार्थाची घनता व एका विशिष्ट तापमानास (याला संदर्भ तापमान म्हणू) असणारी पाण्याची घनता यांच्या गुणोत्तरास पदार्थांचे विशिष्ट गुरुत्व (वि. गु.; Specific Gravity) किंवा विशिष्ट घनता असे म्हणतात. शास्त्रीय कामात ४ से. तापमानाच्या पाण्याची घनता तुलनेसाठी घेतात, तर अभियांत्रिकीमध्ये ६० फॅ. तापमानाच्या पाण्याची घनता वापरतात. मेट्रिक पद्धतीत घनता व वि. गु. यांचे आकडे सारखेच येतात. ४ से. संदर्भ तापमानाचे वि. गु. आणि ६० फॅ. संदर्भ तापमानाचे वि. गु. यात केवळ ०·१% एवढा फरक असतो. उद्योगधंद्यांमध्ये व प्रयोगशाळेत घनतेपेक्षा वि. गु. चे मापन जास्त प्रमाणात केले जाते. तसेच द्रव्यांच्या घनतेवरून त्यांची संघटना, गुणवत्ता किंवा प्रबलता ठरविता येत असल्यामुळे वायू किंवा घन पदार्थांपेक्षाही द्रवांचे वि. गु. जास्त प्रमाणात मोजतात.

कळीचे शब्द : #घनतामापन

समीक्षक : माधव राजवाडे