हेटनर, ॲल्फ्रेड (Hettner, Alfred) : (६ ऑगस्ट १८५९ – ३१ ऑगस्ट १९४१). भूगोलाला तात्विक व शास्त्रीय बैठक प्राप्त करून देणारे आधुनिक जर्मन भूगोलज्ञ. त्यांचा जन्म जर्मनीच्या सॅक्सनी राज्यातील ड्रेझ्डेन येथे बुद्धिमान व कलेची आवड असणाऱ्या एका मोठ्या कुटुंबात झाला. माध्यमिक शिक्षणात आवडलेला भूगोल विषय त्यांनी विद्यापीठात विशेष अभ्यासास घेतला. त्यांनी चार वेगवेगळ्या विद्यापीठांत शिक्षण घेतले आणि काही वर्षे दक्षिण अमेरिकेत फिरून तेथे क्षेत्रकाम केले. फ्रान्समधील स्ट्रॅसबर्ग विद्यापीठात पीएच्. डी. करीत असताना तत्त्वज्ञान विषयाकडे ते आकर्षित झाले. १८८२ पासून प्रथम चिली, पॅटागोनिया या प्रदेशांचा अभ्यास करून नंतर ते कोलंबियाला गेले. १८८८ मध्ये जर्मनीला परत आल्यानंतर त्यांनी कोलंबियातील अँडीज पर्वताविषयी केलेल्या निरीक्षणाचा आणि अनुमानाचा तपशील प्रकाशित केला. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष जर्मनीतील सॅक्सनी या उच्चभूमीच्या भू-आकृतिविज्ञानावर केंद्रित केले; परंतु १८८८ मध्येच हेटनर पुन्हा दक्षिण अमेरिकेकडे निघाले. त्यांना वर्षाहून अधिक काळ प्रवास करावा लागला. या धाडशी प्रवासात त्यांना दु:ख व आजारपणाचा खूप त्रास सहन करावा लागला. त्यात त्यांना कायमस्वरूपी इतकी दुर्बलता आली की, त्यांना चालणेही अशक्य होऊन बसले.

दक्षिण अमेरिकेतून परत आल्यानंतर १८९४ – १८९७ या कालावधीत हेटनर यांनी लाइपसिक येथे अध्यापनाचे काम केले. त्यानंतर १८९७ मध्ये ट्यूबिंगन येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भूगोल विभागात त्यांची नेमणूक झाली. दोन वर्षांच्या आतच १८९९ मध्ये त्यांची हायड्लबर्ग विद्यापीठात (जर्मनी) नेमणूक झाली. सेवानिवृत्तीपर्यंत (१९२८) त्यांनी येथेच सेवा केली. या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना ते विद्यार्थीप्रिय तसेच विद्यार्थ्यांचा समुपदेशक होते. याच काळात एक भूगोलज्ञ म्हणून त्यांना नावलौकिक मिळाला. त्यांचे प्रशिक्षण व सुरुवातीचे काम प्रामुख्याने भू-आकृतिविज्ञान शाखेविषयी असले, तरी रिटर आणि फ्रीड्रिख राट्सेल या भूगोलतज्ञांप्रमाणेच त्यांचाही विशेष कल मानवी भूगोलाकडे होता. भूगोलाचे पद्धतिशास्त्र निश्‍चित करण्यात त्यांनी विशेष रस घेतला. हेच त्यांचे भावी आयुष्यातील महत्त्वाचे कार्य ठरले. क्षेत्र संशोधनाच्या निमित्ताने ते रशिया (१८९७), उत्तर आफ्रिका (१९११) व आशिया (१९१३-१४) या भागांत फिरले.

हेटनर यांनी १८९९ मध्ये जिऑग्रफीकल जर्नल ही ज्ञानपत्रिका काढण्यास सुरुवात केली. यूरोपमध्ये तसेच चिली, कोलंबिया यांसारख्या इतर खंडांतील देशांत व प्रदेशांत जे क्षेत्रकार्य केले, त्या कार्यातील निष्कर्षांचा प्रसार करण्यासाठी या ज्ञानपत्रिकेचा वापर केला. या ज्ञानपत्रिकेमुळे त्यांना सुमारे चाळीस वर्षे भूगोलाची व्याप्ती व पद्धतिशास्त्रासंबंधीची आपली कल्पना मांडण्यास व तिचा प्रसार करण्यास फार मोठी संधी मिळाली. त्यांनी आपल्या प्रास्ताविक लेखात भूगोल म्हणजे काय? भूगोलातून आपल्याला नेमके काय प्राप्त करून घ्यावयाचे आहे आणि ते प्राप्त करण्याची भूगोलाची कितपत क्षमता आहे? हे प्रश्‍न उपस्थित करून आपल्या लेखमालिकेतून या प्रश्‍नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. भौगोलिक पद्धतिशास्त्रातील हे एक अभिजात वाङ्मय ठरले. त्याशिवाय त्यांनी फाउंडेशन्स ऑफ रिजनल जिऑग्रफी हा यूरोपविषयीचा पहिला खंड १९०७ मध्ये प्रकाशित केला; परंतु इतर प्रदेशांविषयीचे त्यांचे पुढील खंड १९२४ पर्यंत प्रकाशित झाले नव्हते. कम्पॅरेटिव्ह रिजनल जिऑग्रफी याचे त्यांनी चार खंड काढले (१९३३ – १९३५). भौगोलिक साहित्यामधील सर्वाधिक महत्त्वाच्या साहित्यांपैकी एक मौलिक साहित्य म्हणजे त्यांनी काढलेले हँडबुक ऑफ जिऑग्रफीकल सायन्सचे अकरा खंड होत. हे खंड १९४० मध्ये पूर्ण झाले. त्यांमधून त्यांनी भूगोलशास्त्रासंबंधीचे आपले विचार स्पष्ट केले आहेत.

हेटनर यांनी भूगोल विषयास तत्त्वज्ञान व विज्ञानाच्या भक्कम पायावरील दर्जा प्राप्त करून दिला. जर्मनीतील आधुनिक भूगोलाच्या विकासावर हेटनर यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव पडला. हेटनर यांनी वर्णन केलेल्या भूगोलाच्या स्वरूपाचे मूळ जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांट यांच्या विचारांत आढळते. कांटशिवाय जर्मनीतील इतर श्रेष्ठ भूगोलवेत्त्यांच्या विचारांचाही हेटनर यांच्यावर प्रभाव पडला होता. आधुनिक प्रादेशिक भूगोलाच्या विकासास रिख्थोफेन व हेटनर यांनी विशेष चालना दिली. यालाच ‘कोरोलॉजिकल संज्ञा’ असे संबोधले जाते. हेटनर यांच्या मते, ‘भूगोल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जैविक घटकांच्या भौगोलिक वितरणाचा अभ्यास आहे’. त्यासाठी त्यांनी ‘जिऑग्रफी’ऐवजी ‘कोरोलॉजी’ ही संज्ञा वापरली. त्यांच्या मते, भूगोल मूलतः कोरोलॉजीच आहे. मानवाचे परस्परसंबंध आणि त्याच्या नैसर्गिक पर्यावरणाशी होणाऱ्या आंतरक्रिया यांचा अभ्यास भूगोलात केला जातो. विशेषतः त्यामध्ये पृथ्वीवरील प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकांची प्रदेशानुसार असणारी रचना विचारात घेतली जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक घटकांच्या स्थानिक भिन्नतेचा अभ्यास हे त्यांच्या संकल्पनेचे मूळ तत्त्व आहे. देशातील बहुतेक विद्यापीठांत त्यांनी भूगोल विभागांची स्थापना केली. त्यांच्या काळात मानचित्रकलेलाही महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले.

हेटनर यांचे हायड्लबर्ग येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम