परसाई , हरिशंकर : (१२ ऑगस्ट १९३४ – १०ऑगस्ट १९९५). सुप्रसिद्ध हिंदी लेखक व विडंबनकार. हिंदी साहित्यामध्ये विडंबन हा साहित्यप्रकार लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यांचा जन्म मध्यप्रदेश मधील हौशंगाबाद जिल्ह्यातील जमानी या गावांमध्ये झाली.प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हरिशंकर यांनी गावीच पूर्ण केले. नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केली. त्यांनी विविध ठिकाणी नोकरी केली.अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी वनविभागामध्ये नोकरीस सुरुवात केली. त्यांनी खांडवा,जबलपूर अशा ठिकाणी १९५३ ते १९५७ दरम्यान अनेक खासगी शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य केले. यादरम्यान जबलपूर येथे स्पेस ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणाची पदवी प्राप्त केली. त्यांच्यातील सिद्धहस्त लेखक त्यांना सारखा खुणावत होता, प्रेरित करीत होता. कदाचित या कारणामुळे त्यांनी नोकरी सोडली व लेखन कार्यात स्वत:ला वाहून घेतले.

हरिशंकर परसाई यांची स्वर्ग से नरक जहाँ तक है ही पहिली रचना १९४८ मध्ये प्रहरी या नियतकालिकात प्रकाशित झाली. ज्यामध्ये त्यांनी कर्मकांड,अंधश्रद्धा यावर कठोर प्रहार केला होता.धर्मांमधील निरर्थक कर्मकांडावर ताशेरे ओढणे हे परसाई यांच्या लेखनाचे प्रमुख प्रयोजन मानले जाते.त्यांच्यावर कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव होता. लाचखोरीमागील, तिच्या देवाणघेवाणीमागील मनोविज्ञान चितारणारे हरिशंकर यांची सदाचार का ताबीज नावाची रचना उल्लेखनीय ठरली. हरिशंकर परसाई यांची साहित्यसंपदा : कथासंग्रह :   हसते है रोते है , जैसे उनके दिन फिरे, भोलाराम का जीव ; कादंबरी : रानी नागफनी की कहानी, तट की खोज, ज्वाला और जल; लेखसंग्रह : तब की बात और थी, भूत के पाँव पीछे, बेईमानी की परत, अपनी अपनी बिमारी, प्रेमचंद के फटे जूते, माती कहे कुम्हार से, काग भगोडा, आवारा भिड के खतरे, ऐसा भी सोचा जाता है, वैष्णव की फिसलन, पगडण्डियोका जमाना, शिकायत मुझे भी है, उखडे खंभे, सदाचार की ताबीज, विकलांग श्रद्धा का दौर, तुलसीदास चंदन घिसें, हम एक उम्र से वाकिफ है इत्यादी.

हरिशंकर परसाई जबलपूर-रायपूर येथून प्रकाशित होणाऱ्या देशबंधू  वर्तमानपत्राद्वारे वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे देत असत. त्यासाठी “पुछिये परसाईसे” हे सदर ते चालवत असत. हलक्याफुलक्या प्रश्नोत्तरांपासून सुरुवात झालेल्या या सदरामध्ये नंतर धीरगंभीर व सामाजिक समस्यांशी संबंधित प्रश्न येऊ लागले. त्या प्रश्नांची तितकीच मार्मिक उत्तरे हरिशंकर परसाई देऊ लागले. हे सदर इतके लोकप्रिय ठरले की वाचक आतुरतेने वर्तमानपत्राची वाट पाहत असत. हरिशंकर परसाई यांच्या विडंबनपर रचना वाचकांना केवळ हसवत नाहीत, तर अंतर्मुख देखील करतात. विनोदांमधून सामाजिक वास्तवाची जाणीव करून देण्याची हातोटी हरिशंकर यांच्याकडे होती. समाजव्यवस्था आणि धूर्त राजकारण्यांचे डावपेच यांमुळे त्रस्त झालेल्या मध्यमवर्गीयांची मनस्थिती परसाई आपल्या रचनांमधून ते अचूकपणाने मांडतात. हरिशंकर परसाई यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे ते उर्दू इंग्रजी शब्दांचाही वापर लेखनामध्ये करीत असत. रचनेमध्ये भाषा, भावना यांची प्रसंगानुरूप पेरणी करण्याचे कौशल्य त्यांना अवगत होते. नादानुकारी शब्दांचा ते लेखनात वापर करीत असत. जिवंतपणा व गतिशीलता हे भाषिक कौशल्यदेखील त्यांच्या रचनांमध्ये दिसून येते.

हरिशंकर परसाई यांच्या विकलांग श्रद्धा का दौर या पुस्तकास  साहित्य अकादमी पुरस्काराने (१९८२) सन्मानित करण्यात आले. मध्यप्रदेश सरकार द्वारा त्यांना शिक्षा सन्मान प्रदान करण्यात आला. साहित्यातील योगदानाची दखल घेऊन जबलपूर विश्वविद्यालयाने त्यांना डी. लिट. ही मानद पदवी बहाल केली.

विडंबनाच्या माध्यमातून समाजातील कुप्रवृत्तीवर टीका करणाऱ्या या प्रसिद्ध लेखकाचा जबलपूर येथे मृत्यू झाला.

संदर्भ :

  • दोमडिया,डी.एम.,हिंदी साहित्य का विश्वकोश,नई दिल्ली,२०१७.