कदम, वसंत शंकर : (२७ डिसेंबर १९३८–१४ मे २०१९). मराठा इतिहासाचे ख्यातनाम अभ्यासक आणि साक्षेपी इतिहासकार. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे शंकर गणपतराव कदम व पार्वती या दांपत्यापोटी झाला. कदम यांचे शिक्षण बी. ए. (१९६०),  एम.ए. (१९६२) व पीएच.डी. (१९७९) तत्कालीन पुणे विद्यापीठातून झाले. त्यांनी १९६२ ते १९६८ दरम्यान राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर आणि पुढे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, इतिहास अधिविभागात अधिव्याख्याता काम केले (१९६८–९९). विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी धुरा वाहिली (१९९०-९९).

शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार हे मराठा इतिहास काळावर विशेष भाष्य करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव कदम यांच्यावर होता. त्यातूनच पुढे कदम यांनी वाटचाल केली. संशोधन हे केवळ फक्त विद्यापीठ पातळीवर न राहता महाविद्यालयीन स्तरावर देखील विस्तारले पाहिजे, या हेतूने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर येथील इतिहास विषयाच्या महाविद्यालयीन शिक्षकांसाठी त्यांनी ‘शिवाजी विद्यापीठ इतिहास प्राध्यापक परिषदʼ या संस्थेची स्थापना केली. कदम हे या परिषदेचे पहिले संस्थापक अध्यक्ष होते. या उपक्रमातून अनेकांनी प्रेरणा घेऊन पुढे आपले संशोधन पूर्ण केले होते. मराठा इतिहास काळावर अभ्यासपूर्ण संशोधन करणे, यात कदम यांचा अधिक रस होता. यासाठी त्यांनी पीएच.डी.च्या पदवीसाठी ‘मराठा कॉन्फेडरसीʼ या विषयाची निवड केली. पुढे तो प्रबंध मराठा कॉन्फेडरसी:अ स्टडी ऑफ इट्स ओरिजिन अँड डेव्हलपमेंट  या नावाने ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला (१९९३). कदम यांचे अधिकतर लेखन सतराव्या आणि अठराव्या शतकातील मराठ्यांचा राजकीय, सामाजिक व आर्थिक इतिहास यांवर आहे.

कदम यांनी संपादक म्हणून मराठा रियासतीच्या खंडामधील, पेशवा बाळाजीराव नानासाहेब व बाळाजीराव नानासाहेब या दोन खंडांचे (१९९०) व शिंदेशाही इतिहासाची साधने ही अस्सल मराठी आणि राजस्थानी पत्रे यांवर आधारित असलेला ग्रंथ (१९९४) अशी महत्त्वाची संपादने केली. कदम यांचे लेखन इंग्रजी भाषेतून झाले असले तरी काही महत्त्वाच्या ग्रंथांत त्यांनी मराठा कालखंडावर मराठीमधून लेखन केले. त्यामध्ये छ. संभाजी स्मारक ग्रंथात (संपा., जयसिंगराव पवार; १९९०) छ. संभाजी आणि कलश यांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारा लेख, तसेच मराठ्यांचा इतिहास (संपा., ग. ह खरे, अ. रा. कुलकर्णी; १९७६) यांतील तिसऱ्या खंडात ‘पटवर्धन’ यांच्यावरील लेख उल्लेखनीय आहेत. या बरोबरच राजर्षी छ. शाहू महाराज आणि कर्नल रे यांच्यातील आंतरसबंध दर्शविणारा त्यांचा लेख महत्त्वपूर्ण आहे.

कदम यांनी भारतातील अनेक राज्यांत आयोजित परिषदांत भाग घेतला आणि आपले शोधनिबंध सादर केले. यांमधून त्यांनी मराठा स्वराज संकल्पना, मराठ्यांचा धार्मिक राष्ट्रवाद, महात्मा फुलेंचा राष्ट्रवाद, गडकरी उठाव, शेजवलकर यांचे लेखन आदी या विषयांची चिकित्सा केली. कोल्हापूर संस्थानाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी, कागदपत्रे यांवरही त्यांनी लेखन केले. त्यांना अमेरिका, फ्रान्स, इटली येथील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांसाठी आमंत्रित करण्यात आले. मिशिगन विद्यापीठ, अमेरिका येथील प्राध्यापिका ॲन वॉटर्स यांना ‘प्रेडीकेमेंट ऑफ  वूमन ऑफ महाराष्ट्रʼ  या प्रबंधासाठी (१९९२-९३) व अनुपमा राव यांना ‘दलित वुमन ऑफ महाराष्ट्रʼ या प्रबंधासाठी (१९९५-९६) त्यांनी मूलभूत मार्गदर्शन केले. ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ महाराष्ट्र : कल्चरल अँड सोसायटीʼ या मान्यवर चर्चासत्रात त्यांनी  ‘डान्सिंग गर्ल्स ऑफ महाराष्ट्रʼ हा शोधनिबंध सादर केला (१९९३). पुढे ॲन फेल्डहाउस संपादित इमेज ऑफ वुमन इन महाराष्ट्र सोसायटी  या ग्रंथात त्यांचा हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला (१९९८).

कदम यांच्या कार्याची दाखल घेऊन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी गुणवंत शिक्षक सन्मान हा पुरस्कार दिला (१९९७). कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी येथील अधिवेशनाचे अध्यक्ष (१९९९), अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या कोल्हापूर येथील अधिवेशनाचे विभागीय अध्यक्ष (१९९४) असे सन्मान त्यांना मिळाले.

कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Feldhaus, Anne, Ed., Images of Women in Maharashtrian Society, State University of New York, 1998.
  • Kadam, Vasant S. Maratha Confederacy: A Study of Its Origin and Development, Munshiram Manoharlal Publishers, New Delhi, 1993.
  • गर्गे, स. मा. संपा., मराठी रियासत, मुंबई, १९८८.

समीक्षक : अवनीश पाटील