भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे. भौगोलिक स्थान अक्षांश १९.१७३९१३७० उत्तर व रेखांश ७३.५८२४२१७० पूर्व असून समुद्रसपाटीपासून २,१००—३,८०० फूट उंच आहे. भीमाशंकरचे वन हे पाणगळ, निमहरित आणि सदाहरित असून पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत पसरलेले आहे. याचे एकूण क्षेत्रफळ १३१ चौ.किमी आहे. भीमाशंकरचे अभयारण्य सुमारे ३,००० फूट उंच कड्यांनी दोन भागांत विभागले गेले आहे.
अतिशय दुर्मीळ असणाऱ्या शेकरू (Ratufa indica) या प्राण्याच्या संवर्धनासाठी हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी असून त्याला उडणारी खार किंवा भीमखार असेही म्हणतात. या अभयारण्यात वाघ, बिबटे, रानडुक्कर, सोनेरी लांडगा, कोल्हा, काळवीट, मुंगीखाऊ, तरस, वानर, सांबर, भेकर, हरीण, पिसोरी हरीण (Mouse deer), उंदीर इत्यादी प्राणी सापडतात. प्राण्यांप्रमाणेच मोर, दयाळ, पोपट, कोतवाल, कोकीळ, तांबट, घुबड, खाटीक, चंडोल, रानकोंबडी, धनेश, शिक्रा, ससाणा, घार आणि गरूड इत्यादी पक्षांचा आढळ या वनात आहे.
भीमाशंकर अभयारण्य दुर्मीळ वनौषधींसाठी प्रसिद्ध आहे. सावर, बहावा, काळाकुडा, पांढरा मळवा या त्यातील काही वनस्पती होत. आयुर्वेदिय उपचारात या साऱ्याच वनस्पती महत्त्वपूर्ण आहेत. शिवाय काही दुर्मीळ वनस्पती इथे जतन करण्यात येत आहेत. वनस्पतींच्या एकूण १०७ जाती या अभयारण्यात सापडतात. या अभयारण्यात जांभूळ (Syzygium cumini), रीठा (Sapindus trifoliatus), आपटा (Bauhinia tomentosa), अडुळसा (Adhatoda zeylanica), शिसम (Dalbergia latifolia), हिरडा (Terminalia chebula), बेहेडा (Terminalia balirica), पिसा (Actinodaphne hookeri), अंजन (Harwikia binata, आंबा (Mangifera indica), उंबर (Ficus recemosa), मोह (madhuka indica), शेंद्री (Mallotus philippensis) असे मोठे वृक्ष; तर कारवी (Strobilanthes callosa), लोहारी, करवंद (Carissa spinarum) आणि लोखंडी (Ventilago madaraspatana) ही झूडपे आहेत. या अभयारण्यात १४ देवराया आहेत. त्यातील काही सुमारे १,००० वर्षे जुन्या असून जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. अभयारण्यातून घोड, भीमा आणि उल्हास या नद्या वाहतात. याठिकाणी वार्षिक सरासरी ६,००० मिमी. इतका पाऊस पडतो. येथील तापमान हिवाळ्यात १३—१८० से., तर उन्हाळ्यात ते २३—२७० से. असते.
पावसाळ्यात रात्रीच्या अंधारात अभयारण्यात काही झाडांच्या फांद्या चमकताना दिसतात. या झाडांच्या फांदीवर असलेल्या बेसिडिओमायकोटा या संघातील मायसीना गणातील (Mycena) काही कवकांमुळे या फांद्या चमकतात (पहा : जीवदीप्ती).
या अभयारण्याला वर्षभर भेट देता येते. मात्र संध्याकाळी सात नंतर भेटीस प्रतिबंध आहे. गिरीभ्रमण आणि पदभ्रमण यासाठी गिर्यारोहक अभयारण्यातील उंच कड्यांचा उपयोग करतात. भीमाशंकर अभयारण्यात अनेक लहान मोठ्या उंचीचे डोंगर सुळके आहेत. त्यातील शिवनेरी, कोठाळीगड, पाडरगड, सिद्धगड येथे गिर्यारोहकांचा अभ्यास चालतो.
संदर्भ :
- https://www.maharashtratourism.gov.in/treasures/wildlife-sanctury/bhimashankar-wild-life-sanctuary
- https://en.wikipedia.org/wiki/Bhimashankar_Wildlife_Sanctuary
पहा : शेकरू.
समीक्षक : जयकुमार मगर