कर्नाळा अभयारण्य

कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आहे. याचे भौगोलिक स्थान १८ ५४’ ३१” उत्तर व ७३ ६’ ९” पूर्व या अक्षांश रेखांशावर असून हे माथेरान व कर्जत या ठिकाणांपासून जवळ आहे. मुंबईपासून ६० किमी.वर मुंबई-गोवा महामार्गाला (महामार्ग क्र. १७) लागून हे अभयारण्य आहे. याचा एकूण विस्तार ४४६ चौ.किमी. आहे. महाराष्ट्र शासनाने १९६८ मध्ये यास पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. अभयारण्यातील कर्नाळा किल्ला अकराव्या शतकातील आहे. येथे कर्ण्याच्या आकाराचा सुळका असल्याने ह्या ठिकाणाला कर्नाळा हे नाव पडले असावे. हा सुळका गिर्यारोहकांचे आवडते स्थान आहे. या अभयारण्यात दमट मिश्र पानझडी वने व सदाहरित नदीकाठची वने अशी दोन्ही प्रकारची वने आढळतात.

कर्नाळा अभयारण्य परिसरात पक्ष्यांच्या सुमारे १५० स्थानिक व सुमारे ३७ स्थलांतरित  प्रजाती आढळून येतात. येथे कोतवाल, हळदी, टकाचोर, लिफबर्ड (Chloropseidae), छोटा सूर्यपक्षी, राखाडी धनेश, मोर, चातक, साळुंकी, सातभाई, हरियाल (हिरवे कबूतर) इत्यादी वर्षभर दिसणारे सर्वसामान्य पक्षी असून वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांमध्ये स्वर्गीय नर्तक (Terpsiphone paradisi), भृंगराज कोतवाल (Dicrurus paradiseus), गोमेट (Pericrocotus cinnamomeus), पर्वतकस्तुर (Thrush) यांचा उल्लेख करता येईल. समुद्री घार, ससाणा, घुबड हे येथील शिकारी पक्षी आहेत. तसेच येथे हिवाळ्यामध्ये स्थलांतरीत पक्षी देखील पहावयास मिळतात.

कर्नाळा अभयारण्य

विभिन्न पक्ष्यांबरोबरच रानडुक्कर, ससे, माकडे, रानमांजर, भेकर, कोल्हा, मुंगूस, साळींदर, वानरांच्या काही जाती व क्वचित एखादा बिबट्या या अभयारण्यात आढळतात. वेगवेगळ्या जातींचे विषारी व बिनविषारी सर्प, सरडे देखील येथे सापडतात.

कर्नाळा अभयारण्यातील विविध पक्षी

कर्नाळा अभयारण्यात कोशिंब (Schleichera oleosa), किंजल (Terminalia paniculata), कळंब (Neolamarckia cadamba), जांब (Syzygium jambos), अळू (Colocasia esculenta), अंबा (Mangifera indica), पुत्रंजिवा (Putranjiva roxburghii), जांभूळ (Eugenia jambolana), उंबर (Ficus racemosa), सुरंगी (Mammea suriga), लोखंडी (Maytenus rothiana), कारपा आणि अंजनी (Memecylon umballatum) इत्यादी वृक्षसंपदा आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या माहितीसाठी वनखात्याने झाडांवर त्यांच्या प्रजातींची नावेही लिहिली आहेत. याशिवाय येथे विविध प्रकारच्या औषधी व दुर्मिळ वनस्पती देखील आहेत.

येथील कमाल व किमान तपमान १६ ते ३३ से. इतके आहे. नसर्गप्रेमी व अभ्यासक यांसाठी जंगलात जाण्यासाठी चार पायवाटा आहेत. या वाटा सुरक्षित असल्या तरी दाट जंगलामध्ये जाणाऱ्या वाटांसाठी वाटाड्याला सोबत नेणे योग्य ठरते. हे अभयारण्य मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराच्या इतक्या जवळ असल्यामुळे येथील जीवसंपदेला पर्यटकांचा नेहमी उपद्रव होत राहतो. पर्यटकांनी टाकलेल्या अन्नपदार्थांमुळे येथे डोमकावळ्यांची (Corvus macrorhynchos) संख्या वाढत आहे. ते इतर पक्षांना पळवून लावत असल्यामुळे येथील पक्षीजीवन धोक्यात आले आहे. निसर्गसंवर्धनाबाबत जागृती व्हावी या हेतूने येथे निसर्ग परिचय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Karnala_Bird_Sanctuary

समीक्षक : जयकुमार मगर