उस्मानाबाद जिल्ह्यातील जैवविविधतेने संपन्न असलेले एकमेव अभयारण्य व सुंदर वनपर्यटन स्थळ. येडशी रामलिंग अभयारण्याचे मुख्यालय येडशी येथे असून हे अभयारण्य उस्मानाबाद शहरापासून २० किमी. व बीड शहरापासून ९५ किमी. अंतरावर आहे. लातूर-बार्शी हा रस्ता याच अभयारण्यातून जातो. हे अभयारण्य कळंब, भनसगाव आणि वडगाव या परिसरात विखुरले आहे. सह्याद्रीच्या बालाघाट पर्वत रांगेत असलेले हे अभयारण्य दक्षिण उष्ण कटिबंधीय (प्रदेशीय) शुष्क पानगळीची वने व काटेरी वने या प्रकारातील आहे. विविध वनस्पती, प्राणी व पक्षी यांचा येथे आढळ असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी १९९७ मध्ये शासनाने २२३७.५ हेक्टर क्षेत्राला ‘रामलिंग घाट’ अभयारण्य म्हणून घोषित केले. भगवान शंकराच्या प्राचीन रामलिंग मंदिरामुळे हा परिसर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. तसेच समुद्रसपाटीपासून उंचावर असल्याने याला हिल स्टेशन असेही म्हणतात.

या परिसरात सीतेच्या शोधार्थ निघालेल्या रामाची जखमी झालेल्या जटायू पक्ष्याशी भेट झाली होती. तेव्हा त्याला पाणी पाजण्यासाठी रामाने इथे एक बाण मारला. त्यामुळे इथे एक गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची  धार वाहू लागली. रावणाबरोबर झालेल्या युद्धामुळे जटायूचा मृत्यू झाला. त्यामुळे या ठिकाणी जटायू पक्ष्याची समाधी आहे. अशी रामायणाशी संबंधित आख्यायिका येथे सांगितली जाते. पावसाळ्यामध्ये याच गुहेतून येणाऱ्या पाण्याचा मोठा धबधबा तयार होतो. या अभयारण्य परिसरातील रामलिंग मंदिर, जटायूची समाधी, धबधबा व भोवतालचा सुंदर निसर्ग यांमुळे हे ठिकाण पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे स्थळ बनले आहे.

या वनात निसर्गत: आपटा, हिवर, अंजन, साग, चंदन, अर्जुन, बेल, खैर, धावडा, गुग्गुळ/सालई, कडुनिंब, भेरा, गराडी, सावर, ऐन, बोर, बाभूळ, धामन, सीताफळ, सादडा, मोह, मेडशिंग आणि बेहडा हे वृक्ष आढळतात. तसेच येथे करवंद आणि घाणेरीची झुडपेही मोठ्या प्रमाणावर आढळतात. यांशिवाय वनविभागाने बोर, शिसम, सुबाभूळ, ग्लिरिसीडिया या वृक्षांची येथे मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. हे अभयारण्य अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे येथे पाऊसमान कमी आहे. म्हणून मोठे वृक्ष कमी आणि झुडपे, झाडोरा तसेच कुसळी, मारवेल, शेडा पवना या प्रकारची खुरटी गवते अधिक प्रमाणात दिसून येतात.

श्री रामलिंग मंदिर

या अभयारण्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील पक्षीजीवन. या ठिकाणी १०० पेक्षा जास्त पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. येथे प्रामुख्याने सापमार गरूड, खरूची, रानलावा, खडकलावा, राखी तित्तर, भटतित्तर, चंडोल, सुगरण, डोंबारी, काळा कोतवाल, करडा कोतवाल, पीतमुखी टिटवी, नकल्या खाटीक, तुईया पोपट, पावश्या, चातक, ढोकरी, गायबगळा, मध्यम बगळा, पांढऱ्या पोटाची पाणकोंबडी, अडई, टकाचोर, भारद्वाज, सातभाई, रानभाई, वटवट्या इत्यादी प्रजाती पहायला मिळतात. तसेच राष्ट्रीय पक्षी मोर मोठ्या प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात येथे काही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमनही होते. पक्ष्यांप्रमाणेच रानमांजर, खोकड, सायाळ, तरस, काळवीट, कोल्हा, लांडगा, रानडुक्कर, लाल तोंडाची माकडे, ससे इत्यादी वन्यजीव प्राणी या अभयारण्यात पाहायला मिळतात.

हे अभयारण्य पर्यटकांसाठी वर्षभर खुले असते. त्यामुळे निसर्गप्रेमी कधीही इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि वन्यजीवनाचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकतात. तसेच पक्षी निरीक्षणासाठी हे अभयारण्य विशेष उपयोगी ठरते. या अभयारण्याला भेट देण्याचा योग्य काळ ऑक्टोबर ते जून असा आहे.

                                                                                         समीक्षक – निलिमा कुलकर्णी