ताडोबा-अंधारी अभयारण्य हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि अंधारी अभयारण्य व या दोहोंमधील कोळसा आणि मोहर्ली वन विभाग अशा तीन विभागांचे एकत्र ताडोबा-अंधारी राखीव वन क्षेत्र बनले आहे. अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १,७२७ चौ.किमी. असून त्यातील १,१०२ चौ.किमी. हे राखीव क्षेत्र (बफर झोन) व ६२५ चौ.किमी. हे गाभा क्षेत्र (कोअर झोन) म्हणून ओळखले जाते. तारू या आदिवासींच्या दैवतावरून ताडोबा हे नाव ठेवण्यात आले. तसेच अभयारण्यातून अंधारी नावाची नदी वाहते त्यामुळे अभयारण्याचे नाव अंधारी अभयारण्य असे पडले आहे. ताडोबा हे सर्वांत जुने राष्ट्रीय उद्यान असून १९५५ मध्ये त्याची स्थापना झाली; तर अंधारी अभयारण्याची घोषणा १९८६ मध्ये करण्यात आली. ताडोबा अभयारण्याचे भौगोलिक स्थान अक्षांश २०१०’०” उत्तर आणि रेखांश ७९२४’०” पूर्व आहे. हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ४५ किमी. व नागपूरपासून १५५ किमी. अंतरावर आहे.

ताडोबा-अंधारी अभयारण्य

ताडोबा-अंधारी अभयारण्य हे प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील कोरड्या पानगळ वन प्रकारातील आहे. त्याचबरोबर येथे गर्द वनश्री, सपाट मैदानी भूप्रदेश, खोल दरी आणि तलाव अशी विविधता आहे. अभयारण्यात ताडोबा आणि कोळसा हे दोन तलाव व अंधारी नदी असल्याने वनास आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असतो.

पट्टेरी वाघ (Panthera tigris tigris) हे ताडोबाचे मुख्य आकर्षण आहे. २०१६ च्या व्याघ्र गणनेप्रमाणे ताडोबामध्ये ८८ वाघ आहेत. वाघाशिवाय ताडोबामध्ये बिबट्या, अस्वल (चांदी अस्वल आणि मधाळ अस्वल), उदमांजर, रानमांजर, रानकुत्रे, वन्यबैल, गवा, ढोल, तरस, लांडगा, कोल्हा, मुंगूस तसेच हरिण, सांबर, चितळ, भेकर, पिसोरी, नीलगाय इत्यादी सस्तन प्राणी; अजगर, भारतीय कोब्रा, घोरपड इत्यादी सरपटणारे प्राणी; मोर, तुरेवाला कोतवाल, धनेश, भारद्वाज, हळद्या, स्वर्गीय नर्तक, हरियाल (हिरवे कबुतर), रातवा, नीलकंठ, मत्स्य गरूड, सर्प गरूड, सोनपाठी सुतार, दुर्मीळ गिधाड तसेच विविध प्रकारचे करकोचे आणि बगळे इत्यादी पक्षी पहायला मिळतात. त्याचप्रमाणे येथे फुलपाखरांच्या ७४ जाती पहायला मिळतात. पान्सी, मरमॉन, मोनार्क ही फुलपाखरांची काही प्रातिनिधीक नावे आहेत. सर्वांत मोठा पतंग अ‍ॅटलास  हा या अभयारण्यात आढळतो.

ताडोबा-अंधारी अभयारण्यात स्तनी वर्गातील प्राण्यांच्या ४१ जाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३० जाती, पक्ष्यांच्या २९० जाती, अष्टपाद कोळी या किटकाच्या ३५ जाती, असंख्य कीटक व माशांच्या विविध २० जाती सापडतात. काळा बिबट्या (ब्लँक पँथर) येथे २०१८ मध्ये दिसला होता असे सांगतात; परंतु, काळा बिबटा सहसा सदाहरित वनात आढळतो. ताडोबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेल्या डोंगर कपाऱ्यात सुमारे १६५ गुहा आहेत. या गुहेत वाघापासून ते मुंगूसापर्यंत सारेच प्राणी राहतात.

अभयारण्यात साग (Tectona grandis) ही मुख्य वनस्पती असून ऐन (Terminalia tomentosa), बिजा (Pterocarpus Marupium), धावडा (Anogeissus latifolia), हळदू (Haldina cordifolia), सालई (Bosewellia serrate), सेमाल (Bombaxceiba), तेंदू (Diospyros melanoxylon), हिरडा (Terminalia chebula), बेहडा (Terminalia balirica) आणि आवळा (Phyllanthus emblica) या त्रिफळा वनस्पती, अर्जून (Terminalia arjuna), बांबू (Dendrocalamus stocksii), साल (Shorea robusta), कुम्भा (Careya arborea), बहावा (Cassia fistula), पांगारा (Erythrina variegate) आणि पळस (Butea monosperma), कुसुम (Schleichera Oleaosa), आंबा (Mangifera indica), मोह (Madhuca indica), उक्षी (Calycopteris floribunda) इत्यादी वृक्ष अभयारण्यात आहेत.

ताडोबा-अंधारी अभयारण्य : वन्यसंपदा.

ताडोबाचे हिवाळ्यातील तापमान २५—३० से. असते, तर उन्हाळ्यातील तापमान ४७—४८ से. असते. हे पाणगळीचे वन असल्याने अभयारण्यास भेट देण्याचा योग्य काळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा आहे. १५ ऑक्टोबर ते ३० जून या काळात अभयारण्य पर्यटकांसाठी खुले असते. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी हे मुख्य आकर्षण आहे. प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शकासह जीप आणि बस पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. ताडोबा अभयारण्यात जागोजागी पाणवठे आहेत. पाणवठ्यानजीकच मचाणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मोहर्ली आणि कोलारा येथे वनविकास महामंडळाचे निसर्ग पर्यटन संकुल आहे. तेथेच खाजगी पर्यटक निवास उपलब्ध आहेत. ताडोबापासून सर्वांत जवळचे विमानतळ नागपूर हे आहे. वरोरा हे जवळचे रेल्वे स्थानक ५५ किमी. अंतरावर असून चिमूर हे सर्वांत जवळचे बस स्थानक ३२ किमी. अंतरावर आहे.

संदर्भ :

  • https://www.tadobanationalpark.in/
  • https://en.wikipedia.org/wiki/Tadoba_Andhari_Tiger_Reserve#Fauna

समीक्षक : जयकुमार मगर