अद्वयतारकोपनिषद्  शुक्लयजुर्वेदाशी संबंधित आहे. या उपनिषदामध्ये राजयोगाचे वर्णन आले आहे. या उपनिषदात वर्णन केलेल्या योगाला तारकयोग असे नाव आहे. प्रस्तुत उपनिषदातील साधनेचा उपदेश योगी, संन्यासी, जितेंद्रिय आणि शम-दमादि षड्गुणांनी युक्त असलेल्या साधकांसाठी केला आहे. ‘अद्वय-ब्रह्म’ आणि ‘तारक-ब्रह्म’ अशा दोन प्रकारांनी ब्रह्माचे स्वरूप ह्या उपनिषदात विशद केले आहे.

जीव आणि ईश्वर हे दोनही अज्ञानाने आवृत्त आहेत. ब्रह्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू सत्य नाहीत असा विचार करून त्या सर्वांचे ‘हे नाही’, ‘हे नाही’ असे म्हणून निराकरण करून जे शेष उरते ते ‘अद्वय ब्रह्म’ होय. अद्वय शब्दाचा अर्थ एकमेव असा होतो. ते अद्वय ब्रह्म  गर्भ, जन्म, जरावस्था (वार्धक्य), मरण, संहार इत्यादींपासून जीवाला तारते, म्हणून त्यालाच ‘तारक-ब्रह्म’ असे म्हणतात. जो डोळे मिटून प्रकाशस्वरूपात त्या ब्रह्माला बघतो तो ब्रह्मच होतो. त्याची प्राप्ती होण्यासाठी अंतर्लक्ष्य, बहिर्लक्ष्य आणि मध्यलक्ष्य या तीन लक्ष्यांवर साधना करावी. अंतर्लक्ष्य या शब्दाचा अर्थ ज्याचा अंत:करणात साक्षात्कार होतो असा आहे. यामध्ये कुंडलिनीचा त्याचप्रमाणे मस्तकावर असलेल्या विशेष प्रकाशाचा, दोन्ही नेत्रांच्या मध्यभागातील निळ्या ज्योतीचा समावेश होतो. या प्रकाशाची अनुभूती हृदयात देखील होऊ शकते. हे अंतर्लक्ष्य आंतरिक दृष्टीने पाहणे अपेक्षित आहे.

बहिर्लक्ष्य (बाह्यलक्ष्य) म्हणजे नासिकेच्या अग्रभागापासून चार अंगुळे अंतरावर निळ्या वर्णाच्या आकाशावर, सहा अंगुळे अंतरावर श्याम वर्णाच्या आकाशावर, आठ अंगुळे अंतरावर लाल वर्णाच्या आकाशावर, दहा अंगुळे अंतरावर पिवळ्या आणि पांढऱ्या वर्णाच्या आकाशावर चित्त एकाग्र करणे. तसेच मस्तकाच्या वरील भागापासून बारा अंगुळे अंतरावर ज्योतीवर मन एकाग्र करणे.

मध्यलक्ष्यामध्ये आकाश, परमाकाश, महाकाश, तत्त्वाकाश, सूर्याकाश या पाच आकाशावर ध्यान करावयाचे आहे. ही नावे आकाशाला प्रकाशाच्या वेगवेगळ्या रंगांच्या अभिव्यक्तिमुळे मिळाली आहेत. या पाच आकाशावरील ध्यान हेच तारक ब्रह्माचे लक्ष्य आहे. यावर ध्यान करणारा मुक्ती आणि अमनस्क अवस्था प्राप्त करतो. म्हणजेच त्याच्या चित्ताचा अशेष नाश होतो. वर सांगितलेले ध्यान साधकाने डोळे पूर्ण बंद करून अथवा अर्धे उघडे ठेवून करावयाचे आहे. अंतर्लक्ष्य आणि बाह्यलक्ष्य पाहण्यासाठी साधकाची दृष्टी स्थिर होते त्या स्थितीस ‘शांभवी मुद्रा’ असे म्हटले आहे. साधकाने ध्यान करताना ‘मी चित् स्वरूप आहे’ असे चिंतन करावयाचे आहे.

मूर्तितारकाचे ज्ञान होण्यास चक्षू (डोळे) व मन या दोघांची  आवश्यकता आहे. अमूर्तितारक हे दोन्ही भुवयांच्या पलीकडे आहे. (भ्रूयुगातीत) त्याचे ज्ञान होण्यास चक्षू व मन या दोघांची  आवश्यकता आहे. मात्र,  अमूर्तितारकातील चक्षू हा भौतिक चक्षू नसून ते चक्षुरिंद्रिय आहे.

ह्या उपनिषदाच्या शेवटी ‘गुरु’ शब्दाची व्युत्पत्ती आणि गुरूची स्तुतिवजा वचने आहेत. उपनिषदाचा शेवट फलश्रुतीने केला आहे. त्यानुसार उपनिषदाचा पाठ करण्यामुळे साधकाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. त्याला चारही पुरुषार्थ सिद्ध होतात. त्याची जन्मोजन्मीची सर्व पापे तत्काळ नष्ट होतात. तसेच साधकाची संसार-सागरातून निवृत्ती होते.

हे उपनिषद् आकाराने अगदी लहान असले तरी ते गहन आशयाने परिपूर्ण आहे.

               समीक्षक : कला आचार्य