ज्या तापमानाला द्रव पदार्थ घन स्थितीत रूपांतरित होतो आणि त्याची वाहून जाण्याची क्षमता लोप पावते, त्या तापमानाला त्या द्रव्याचा ओतनबिंदू असे म्हणतात.

पेट्रोलियम पदार्थात मूलत: मेण असते. खनिज तेलाचे शुध्दिकरण केले जात असताना मेणाचा अंश जास्तीत जास्त प्रमाणात वेगळा केला जातो. मेण हे पॅराफिनिक हायड्रोकार्बनच्या साखळ्यांनी बनलेले असते. उच्च तापमानाला मेण एखाद्या द्रव्यात विरघळते,परंतु  कमी तापमानाला स्फटिक रूपाने बाहेर पडते आणि ते घन बनते. त्यामुळे द्रवाच्या प्रवाहीपणात अडथळा येतो. वाहनाच्या एंजिनातील गाळण्या (filter) मध्ये मेणाचे स्फटिक अडकून पडतात. त्यामुळे इंधन वा वंगण प्रवाही राहू शकत नाही. त्यासाठी इंधन-वंगणातील मेणाचा घटक तपासण्यासाठी ओतनबिंदू ही चाचणी करावी लागते या विश्लेषणात इंधन किवा वंगणाचा विशिष्ट आकारमानाचा नमुना काचेच्या नळकांडी उपकरणात घेऊन त्यास थंडावा देतात आणि किती तापमानापर्यंत तो गोठतो, याचे निरीक्षण केले जाते.

डीझेल तेलातील मेणाचा अंश तपासणीसाठी कोल्ड फिल्टर प्लगिंग पॉइंट (सीएफपीपी) ही चाचणी केली जाते. त्याद्वारे किती थंड तापमानाला मेणाचे स्फटिक तयार होतात, याचा आढावा घेतला जातो. ४५ मायक्रॉन मापाची छिद्रे असलेल्या जाळीतून थंड केलेला नमुना आरपार जाऊ शकत नाही किंवा २० मिलि. आकाराचा नमुना आरपार जाण्यासाठी ६० सेकंदापेक्षा जास्त वेळ घेत असेल, तर त्या तापमानाला त्या नमुन्याचा सीएफपीपी समजले जाते. डीझेल इंधनाचा सीएफपीपी हिवाळ्यात ६ से. तर उन्हाळ्यात १८ से. राखला जातो.

संदर्भ : Major Product Manual, Bharat Petroleum Corporation Ltd.,Mumbai.

समीक्षक : राजीव चिटणीस