अनेक खेड्यापाड्यांत दिवाबत्तीसाठी आणि स्वयंपाक शिजवणाऱ्या स्टोव्हसाठी वापर होतो. यामध्ये इंधन म्हणून केरोसीन वापरले जाते. या इंधंनाला आपल्या देशात ‘गरिबाचे इंधन’ म्हटले जाते. त्यासाठी सरकार सवलत देऊन त्याची किंमत कमी  ठेवण्याचे प्रयत्न करते.

गुणधर्म : खनिज तेलाचे ऊर्ध्वपातन केले असताना, तेरा ते सोळा कार्बनयुक्त हायड्रोकार्बन रसायनांच्या मिश्रणाने हे इंधन तयार केले जाते. केरोसीन दिव्यात जळत असताना कमी धूर येतो, त्यामुळे कंदिलाची काच पटकन धुरकट होत नाही.  तसेच, स्टोव्हमध्ये जळताना कमी प्रदूषण व्हावे म्हणून त्यात कमीत कमी  प्रमाणात गंधक असावे याची दक्षता घ्यावी लागते. शिवाय धूर सोडणाऱ्या सेंद्रिय रसायनांचे प्रमाण कमी ठेवले जाते. या इंधनातील ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन रसायनामुळे धूर येतो परंतु हीच रसायने जळणाऱ्या वातीला प्रकाशमान करतात. अर्थात जास्त प्रकाश मिळावा म्हणून केरोसीनमध्ये काही प्रमाणात ॲरोमॅटिक रसायनांचे अस्तित्व आवश्यक असते. तसेच स्टोव्हमध्ये केरोसीन पंप करताना भडका उडू नये, यासाठी त्यात पातळ इंधने मिसळणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. या एकूण खबरदारीतून निर्मिती होणारे केरोसीन तेल हे उच्च दर्जाचे केरोसीन तेल (Superior Kerosene Oil, SKO) म्हणून ओळखले जाते.

परीक्षण : केरोसीन तेल १५० ते ३०० से. तापमानादरम्यान उकळते. त्याचा धूमबिंदू (smoke point) किमान १८ मिमी. असतो. संरक्षणखाते आणि रेल्वेमध्ये किमान २२ मिमी धूमबिंदू असलेले केरोसीन वापरतात. ही कसोटी धूर न सोडणाऱ्या वातीची जास्तीत जास्त लांबी मोजते.

केरोसीन दिव्यात जळताना वातीवर कार्बनयुक्त पूड जमा होऊ नये, यासाठी या इंधनाची  दग्ध कार्बन क्षमता (char value) तपासली जाते. साधारण  ५ लिटर इंधन एका प्रमाणित दिव्यात २४ तासांत जाळले जाते आणि प्रति किलो इंधनात किती ‍ मिलिग्रॅम कार्बनची पूड तयार होते ती मोजली जाते. तिची कमाल मर्यादा २० मिग्रॅ. असते. तसेच कंदिलाच्या काचेवर गंधकाच्या संयुगांची काजळी जमा होऊ नये, याची तपासणी देखील केली जाते.

केरोसीन : विविध उपयोग

प्रज्वलन बिंदू (Flash point) परीक्षण ही चाचणी केरोसीनची सुरक्षा-कसोटी असते. ज्या कमीतकमी तापमानाला केरोसिनच्या बंद कपातील वाफा हवेत मिसळून तयार होणाऱ्या ज्वालाग्राही मिश्रणात ज्वलनस्रोत (उदा., ज्योत) नेला असता पहिली ठिणगी पडते तो प्रज्वलन बिंदू असतो.

वास्तविकत: केरोसीन रंगहीन असते. परंतु त्याचा पेट्रोल-डीझेलसारख्या खर्चिक इंधनात भेसळ करण्यासाठी वापर होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी वाटप (PDS) होणाऱ्या या इंधनात निळा रंग मिसळतात.

उपयुक्तता : प्रकाश मिळविणे, अन्न शिजवणे यासोबतच केरोसिनचा वापर रंग व शाई तयार करताना द्रावण, पॅराफीन संयुगे तयार करण्यासाठी कच्चा माल, तेल-ग्रीजने माखलेली उपकरणे स्वच्छ करण्यासाठी होतो.

संदर्भ : Bharat Petroleum Corpn. Ltd., Mumbai.