जाबालदर्शनोपनिषद् हे सामवेदाशी संबंधित असलेले उपनिषद् आहे. यालाच दर्शनोपनिषद् असे म्हणतात. या उपनिषदामध्ये योगशास्त्रातील संकल्पनांचा विचार पातंजल योगाबरोबरच किंबहुना त्यापेक्षा अधिक वेदान्ताच्या आधारे केला आहे.
भगवान् विष्णूंचे अवतार असलेल्या दत्तात्रेयांनी योगाची दीक्षा घेतली आणि आपले शिष्य सांकृति ह्यांना त्यांनी अष्टांग योगाचे अर्थात् यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि याचे ज्ञान दिले. त्यांचे विवरण प्रस्तुत उपनिषदामध्ये दहा खंडांमध्ये केले आहे. या ठिकाणी खंड हा शब्द अध्याय या अर्थी वापरला आहे. योगाच्या अष्टांगांची नावे पतंजलीच्या योगशास्त्रानुसार असली तरीसुद्धा त्यांचे विवरण निराळे आहे. पतंजलीच्या योगशास्त्रानुसार अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे पाच यम आहेत; तर जाबालदर्शनोपनिषदानुसार यमांची संख्या दहा असून ते पुढीलप्रमाणे आहेत — अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, आर्जव (सरळपणा), क्षमा, धृति (धैर्य), मिताहार आणि शौच ही त्यांची नावे आहेत. ह्या सगळ्यांच्या व्याख्या आणि त्यांचे विवरण प्रस्तुत उपनिषदाच्या पहिल्या खंडात आले आहे.
दुसऱ्या खंडात नियमांचे विवेचन आले आहे. पतंजलींनी योगसूत्रात शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम सांगितले आहेत; तर जाबालदर्शनोपनिषदात मात्र तप, संतोष, आस्तिकता, दान, ईश्वरपूजन, शास्त्रश्रवण करणे, कुकर्माची लाज, जप, मति, व्रत हे दहा नियम सांगितले आहेत. जपाचे वाचिक आणि मानसिक जप असे दोन प्रकार सांगितले असून वाचिक जपाचे उपांशु (पुटपुटणे) आणि उच्चस्वरात उच्चारण असे दोन प्रकार, तसेच मानसिक जपाचे मनन आणि ध्यान हे दोन प्रकार वर्णन केले आहेत.
तिसऱ्या खंडात स्वस्तिकासन, गोमुखासन, पद्मासन, वीरासन, सिंहासन, भद्रासन, मुक्तासन, मयूरासन आणि सुखासन हे आसनांचे नऊ प्रकार आणि त्यांच्या कृतींचे वर्णन आढळते. प्राणायामासाठी आसनांची आवश्यकता येथे नमूद केली आहे.
चवथ्या खंडात शरीरातील विविध नाड्यांचे वर्णन आले आहे. मानवी शरीरात ७२,००० नाड्यांचा समूह असल्याचे प्रतिपादन करून त्यापैकी सुषुम्ना, पिंगला, इडा, सरस्वती, पूषा, वरुणा, हस्तिजिह्वा, यशस्विनी, अलम्बुसा, कुहू, विश्वोदरी, पयस्विनी, शंखिनी आणि गान्धारा या १४ मुख्य नाड्या असल्याचे सांगितले आहे. त्यातही इडा, पिंगला व सुषुम्ना या तीन महत्त्वाच्या नाड्या असल्याचे म्हटले आहे. या सर्व नाड्यांमधून प्राणशक्ती वाहते. प्रत्येक नाडीचे शरीरातील स्थान आणि तिची अधिष्ठात्री देवता यांचे सांगोपाग वर्णन या ठिकाणी आढळते. प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय हे १० वायू सर्व नाड्यांमध्ये संचार करतात. या प्रत्येक वायूचे शरीरातील स्थान व त्याचे विशिष्ट कार्य येथे विशेषत्वाने आढळते.
पाचव्या खंडात नाडीशुद्धीचे विवेचन केले आहे. या विवेचनाच्या अनुषंगाने पुढील विषयांचे प्रतिपादन आले आहे. जो साधक फलप्राप्तीची आशा न करता शास्त्रोक्त कर्मे पार पाडतो तसेच योगाच्या यमनियमादि अंगांचे पालन करतो आणि आत्म्याच्या ठिकाणी चित्त ठेवतो तो नाडीशुद्धीला योग्य साधक आहे. योग्याने पर्वत शिखरावर, नदी किनारी, बिल्व वृक्षाच्या मुळाशी अथवा वनामध्ये रमणीय आणि पवित्र अशा प्रदेशामध्ये आश्रम निर्माण करून तेथे रहावे. साधकाने साधनेसाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून आसनात बसावे. मान, मस्तक आणि शरीर समान रेषेत ठेवून मुख बंद ठेवावे. दृष्टी नासाग्रावर किंवा चंद्रबिंबावर ठेवावी. ज्या साधकाची साधनेमध्ये प्रगती झाली असेल तो प्रणवाच्या (ओंकार) बिंदूमध्ये वास करणाऱ्या परमात्मतत्त्वाला अंत:चक्षूंनी एकाग्र चित्ताने पाहतो.
नाडीशुद्धीसाठी इडेद्वारा प्राणवायूला आत घेऊन उदरामध्ये स्थिर करावे. त्यानंतर शरीराच्या मध्यभागी असलेल्या ज्वालायुक्त अग्नितत्त्वाचे त्याच्या बीजमंत्राने म्हणजेच ‘रं’ने चिंतन करावे. त्यानंतर पिंगलेने प्राणवायूचे विरेचन करावे. नंतर पिंगलेने प्राणवायू शरीरात घेऊन अग्निबीजाचे चिंतन करावे आणि इडेने प्राणवायूचे हळूहळू विरेचन करावे. ह्या क्रियेमुळे नाडी शुद्ध होते आणि ह्या नाडीशुद्धीची शरीर हलके होणे, जाठराग्नि प्रदीप्त होणे इत्यादी चिन्हे दिसू लागतात. नाडीशुद्धीनंतर ध्यान केले असता साधक जीवन्मुक्त होऊ शकतो. अनाहत नाद ऐकू येणे हे नाडीशुद्धी सिद्ध झाल्याचे लक्षण होय. यासारखी लक्षणे जोवर प्रकट होत नाहीत तोपर्यंत अशाप्रकारे अभ्यास सुरू ठेवावा. येथे नाडीशुद्धीला आत्मशुद्धी हा एक पर्याय दिलेला आहे. आत्मा नेहमी शुद्ध, नित्य, सुखरूप आणि स्वयंप्रकाशित आहे. तो अज्ञानामुळे मलिन असल्यासारखा वाटतो. परंतु, ज्ञान झाल्यावर त्याचे शुद्धरूप प्रकाशित होते.
सहाव्या खंडात प्राणायामाचे सविस्तर विवेचन केले आहे. रेचक, पूरक आणि कुंभक याद्वारा प्राणाचे जे नियमन होते त्याला प्राणायाम म्हणतात. प्रणवाच्या तीन वर्णांना म्हणजेच अकार, उकार आणि मकार ह्यांना क्रमश: रेचक, पूरक आणि कुंभक म्हटले आहे म्हणून प्राणायामसुद्धा प्रणवरूप आहे. इडा नाडीद्वारा वायूला हळूहळू उदरात घेऊन १६ मात्रा इतका काळ स्थिर ठेवावे. त्या वेळी अकाराचे स्मरण करावे. नंतर ६४ मात्रा इतका काळ किंवा जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत वायूला धारण करून उकारप्रधान अशा प्रणवाचा जप करावा. त्यानंतर ३२ मात्रा इतका काळ मकाराचे स्मरण करत पिंगलेच्या साहाय्याने वायूचे रेचन करावे. हे प्राणायामाचे एक आवर्तन होय. त्यानंतर याचप्रकारे ध्यान करत पिंगला नाडीद्वारे वायू उदरात घेऊन इडा नाडीद्वारे त्याचे रेचन करावे.
या खंडात पूरक, रेचक व कुंभक यांच्या संक्षिप्त व्याख्या तसेच प्राणायामाच्या अधम, मध्यम आणि उत्तम प्रकारांची लक्षणे सांगितली आहेत. प्राणायामाचे विविध लौकिक लाभ देखील ह्या अध्यायात वर्णन केले आहेत. शरीरात जिभेच्या मुळाशी, भुवयांमध्ये, नाभिमध्ये इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी प्राण स्थिर केल्यावर त्याचे होणारे वेगवेगळे लाभ येथे नमूद केले आहेत. प्राणवायूला ब्रह्मरंध्रात स्थिर करण्याचा विधी आणि त्या साधनेत ऐकू येणारे विविध नाद निर्दिष्ट केले आहेत. कुण्डलिनी शक्तिवर विजय मिळविण्याची साधना व तिचे लौकिक आणि पारलौकिक लाभदेखील सांगितले आहेत.
सातव्या खंडात प्रत्याहाराचे वर्णन करण्यात आले आहे. विषयांमध्ये आनंद घेणाऱ्या इंद्रियांना बलपूर्वक मागे खेचणे ह्याला प्रत्याहार म्हणतात. ब्रह्म जाणणारे ऋषि-मुनि जे काही दिसते ते सर्व ब्रह्म आहे असे जाणणे हाच प्रत्याहार आहे असे मानतात. आपली नित्य तसेच काम्य कर्मे ब्रह्मार्पण करणे ह्याला प्रत्याहार म्हणतात किंवा वायूला आत खेचून शरीरात दन्तमूलापासून कंठात, कंठातून छातीमध्ये, छातीतून नाभिप्रदेशात, नाभिप्रदेशातून कुण्डलिनीमध्ये, कुण्डलिनीमधून मूलाधार चक्रामध्ये स्थिर करावे. त्यानंतर प्राणाला अपान वायूच्या स्थानातून खेचून कंबरेच्या दोन्ही भागांत, छातीत, मध्यम भागात, तेथून मांड्यांमध्ये, दोन्ही जांघांमध्ये, जांघांमधून गुडघ्यांत, गुडघ्यांतून पायांच्या अंगठ्यांमध्ये स्थिर करावे. यानंतर मूलाधार चक्रापासून क्रमाक्रमाने नाभिकन्दामध्ये, हृदयामध्ये, कंठमूलात, तालुमध्ये, भुवयांमध्ये, कपाळामध्ये आणि शेवटी मस्तकामध्ये वायू धारण करणे ह्या प्रकारच्या अभ्यासाला प्रत्याहार असे म्हटले आहे. ‘देह हाच आत्मा आहे’ या विचाराचा त्याग करून आत्म्यामध्ये बुद्धी स्थिर करणे याला प्रत्याहार असे म्हटले आहे. जो अशाप्रकारे अभ्यास करतो त्याला काहीही दुर्लभ नाही.
आठव्या खंडात पाच धारणांचे वर्णन केलेले आहे. देहामधील आकाशतत्त्वामध्ये बाह्य आकाशाची, प्राणामध्ये बाह्य वायूतत्त्वाची, जाठराग्निमध्ये अग्नितत्त्वाची, देहगत जलामध्ये बाह्य जलतत्त्वाची आणि पार्थिव शरीरामध्ये (पृथ्वीतत्त्वापासून बनलेल्या शरीरामध्ये) भूमितत्त्वाची धारणा करावी. आकाशतत्त्वावरील धारणा करताना ‘हं’, प्राणावरील धारणा करताना ‘यं’, अग्नितत्त्वावरील धारणा करताना ‘रं’, जलतत्त्वावरील धारणा करतांना ‘वं’, पृथ्वीतत्त्वावरील धारणा करताना ‘लं’ ह्या बीजमंत्रांचा उच्चार करावा. पृथ्वीतत्त्वावर धारणा करताना ब्रह्मदेवावर, जलतत्त्वावर धारणा करताना विष्णुवर, अग्नितत्त्वावर धारणा करताना महेशावर, वायुतत्त्वावर धारणा करताना ईश्वरावर, आकाशतत्त्वावर धारणा करताना सदाशिवावर धारणा करावी.
या तत्त्वांवर धारणा करताना त्यांचे शरीरातील स्थान कोठे आहे हे जाणणे आवश्यक आहे म्हणून पुढे त्या स्थानांचे विवेचन आले आहे. पायापासून गुडघ्यांपर्यंत पृथ्वीतत्त्वाचे, गुडघ्यांपासून गुदद्वारापर्यंत जलतत्त्वाचे, गुदद्वारापासून हृदयापर्यंत अग्नितत्त्वाचे, हृदयापासून भुवयांपर्यंत वायुतत्त्वाचे आणि मस्तक आकाशतत्त्वाचे ठिकाण होय. वर वर्णन केलेल्या धारणांशिवाय आत्म्यात परमात्म्याची धारणा येथे सांगितली आहे.
नवव्या खंडात ध्यानाचे वर्णन केले आहे. ध्यानामुळे संसाररूपी बंधनाचा नाश होतो. योगीश्वर महेश्वराचे ‘तोच मी आहे’ अशा भावनेने ध्यान करावे अथवा ईशानाचे (शिवाचे एक रूप) ध्यान करावे. सत्-चित्-आनंदरूप, अनंत अशा परब्रह्माचे आत्म्याच्या रूपात ‘ते मी आहे’ असे जाणून मुक्तीसाठी ध्यान करावे. अशाप्रकारे ध्यानाभ्यास करणाऱ्या साधकाला ब्रह्मतत्त्वाची अनुभूति प्राप्त होते.
दशम खंडात समाधीचे विवेचन आले आहे. परमात्मा आणि जीवात्मा हे एक आहेत अशी निश्चयात्मक बुद्धी प्रकट होणे याला दत्तात्रेय समाधि असे म्हणतात. सर्वव्यापी, नित्य, कूटस्थ (अचल) दोषरहित असा आत्मा वस्तुत: एक आहे. मायेने निर्माण झालेल्या भ्रमामुळे तो वेगवेगळा असल्यासारखा भासतो. स्वरूपाने तो वेगवेगळा नाही.
जीवात्मा व परमात्म्याचे अद्वैत हेच सत्य असून प्रपंच आणि संसार नामक दुसरे काहीही नाही. अज्ञानी माणसे एकाच परमात्म्याला जीव आणि ईश्वर अशा दोन रूपात बघतात. ‘मी देह नाही, प्राण नाही, इंद्रिये नाही, मन नाही. सदैव साक्षिरूपात स्थित असल्यामुळे मी केवळ शिवस्वरूप परमात्मा आहे.’ अशाप्रकारे जी निश्चयात्मिका बुद्धी ती समाधि होय. ‘मीच ते परब्रह्म आहे. समुद्रात उत्पन्न झालेले फेस आणि लाटा पुन्हा समुद्रातच विलीन होतात, त्याप्रमाणे हे जगत् माझ्यातून निर्माण होते आणि माझ्यामध्ये विलीन होते.’ अशाप्रकारे ज्या जीवाला हा परमात्मा आपल्या आत्म्याच्या रूपात अनुभवास येतो तो जीव स्वत: श्रेष्ठ अमृतस्वरूप पुरुषस्वरूपाला (परमात्मरूपाला) प्राप्त करतो. सर्व प्राणिमात्रांना स्वत:मध्ये, तसेच स्वत:ला सर्व प्राणिमात्रांमध्ये बघणारा जीव ब्रह्मरूप होतो. साधकाला सर्वव्यापी आत्मचैतन्याची अपरोक्ष रूपात (साक्षात्) अनुभूति होते तेव्हा तो स्वत:च परमात्मरूप होतो. समाधि साधकाचा जन्ममृत्यूचा फेरा नष्ट करते असे प्रतिपादन दत्तात्रेय करतात.
या उपनिषदाचा विशेष असा आहे की, यात अष्टांग योगाच्या साधनेचे लक्ष्य ब्रह्मप्राप्ति हे सांगितले असून जीवाचे ब्रह्माशी ऐक्य हे मोक्षाचे स्वरूप आहे असे प्रतिपादन केले आहे. तर पातंजल योगसूत्रात अष्टांग योगाच्या साधनेचे लक्ष्य पुरुष आणि (बुद्धी) प्रकृति यातील भेदाचे ज्ञान होणे आणि त्याद्वारे मुक्ति प्राप्त होणे असे सांगितले आहे. या उपनिषदात पतंजलींच्या योगसूत्रातील संज्ञांचा विनियोग वेदान्ताच्या अंगाने केला आहे. योग दर्शन आणि वेदान्त दर्शन यांचा समन्वय हे या उपनिषदाचे वैशिष्ट्य आहे.
समीक्षक : कला आचार्य