योगकर्णिका हा नाथ अघोरानंद निर्वाणी यांचा योगविषयक पद्य उताऱ्यांचे संकलन असलेला ग्रंथ आहे. अघोरानंद हे अघोरानंदनाथ या नावानेही ओळखले जातात. श्री गंगा प्रसाद आश्रम वाराणसी यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. तसेच श्री नरेन्द्र नाथ शर्मा यांनी १९८१ साली त्याचे संपादन करून ईस्टन बुकलिंकर्स या प्रकाशनाद्वारे तो प्रकाशित केला. या ग्रंथाची रचना विसाव्या शतकात झाली असून त्यात प्रामुख्याने हठयोगविषयक श्लोक आढळतात. यात एकूण १५ प्रकरणे असून या प्रकरणांचा निर्देश पाद शब्दाने केला आहे; उदा., ‘इत्यघोरविरचिते योगसङ्केते सप्तम: पाद:’ असे सातव्या पादाच्या पुष्पिकेत म्हटले आहे.
पहिल्या पादात प्रात:काळी करावयाचे धार्मिक विधि उदा., सद्गुरूपूजन, शरीरातील षट्चक्रांचे चिंतन, तिलकधारण, गायत्री जप इत्यादी विषयांचे वर्णन आढळते. दुसऱ्या पादात शरीरातील विविध भागांवर ध्यान, नाडीशुद्धी, तिसऱ्या पादात प्राणायाम, चवथ्या पादात मिताहार, षट्कर्म, पाचव्या पादात आसने, सहाव्या पादात प्रत्याहार, सातव्या पादात कुंभक, आठव्या पादात मुद्रा, नवव्या पादात धारणा, दहाव्या पादात ध्यान, अकराव्या पादात समाधि, बाराव्या पादात लययोग, तेराव्या पादात आसनांच्या कृती, चौदाव्या पादात घटशोधन, पंधराव्या पादात महामुद्रा, महाबंध, योगाचा अधिकारी, विधिनिषेध यांचे वर्णन आले आहे.
पुढील ग्रंथातील श्लोक योगकर्णिकेत समाविष्ट केले आहेत — विश्वसारतन्त्रम्, कुञ्जिकातन्त्रम्, गणेशविमर्शिनी, वर्णविलासतन्त्र, दत्तात्रेयसंहिता, योगस्वरोदय, मार्कण्डेयपुराण, बिन्दूपनिषद्, मदनपारिजात, नरसिंहपुराण, योगियाज्ञवाल्क्यस्मृति, गौतमस्मृति, बौधायनस्मृति, ताराप्रदीप, विशुद्धेश्वरतन्त्र, समयाङ्गमातृका, घेरण्डसंहिता, हठप्रदीप (हठप्रदीपिका), काशीखण्ड (स्कन्दपुराण), निरुत्तरतंत्र, ग्रहयामल, स्वरोदय, शिवगीता, ज्ञानसार या ग्रंथांमधील श्लोक येथे आढळतात. तसेच व्यास, गोरक्ष यांच्या रचना येथे उद्धृत केल्या आहेत.
योगकर्णिका या ग्रंथामध्ये घेरण्डसंहितेतील ३२ आसनांचा नाम निर्देश केला असून सिद्धासन, पद्मासन, भद्रासन, मुक्तासन, वज्रासन, स्वस्तिकासन, सिंहासन, गोमुखासन, वीरासन, धनुरासन, मृतासन (शवासन), गुप्तासन, मत्स्यासन, योगेन्द्रासन, गोरक्षासन, मत्स्येन्द्रासन, उत्कटासन, संकटासन, मयूरासन, कुक्कुटासन, कूर्मासन, योनिमुद्रासन, उत्तानकूर्मकासन, मण्डूकासन, उत्तानमण्डूकासन, वृक्षासन, गरुडासन, वृषासन, शलभासन, मकरासन, उष्ट्रासन, भुजंगासन, योगासन या आसनांची विविध ग्रंथांनुसार कृती दिली आहे. नेतियोग, दण्डयोग, धौतियोग, लौलीयोग, क्षालनयोग या पाचांना रुद्रयामलात अमरा योग म्हटले आहे (योगकर्णिका २.४२-४५). या क्रिया यमनियमांच्या पालनाबरोबर कराव्यात असा उपदेश केला आहे. दुसऱ्या पादात काही मजकूर अपवादात्मकरीत्या गद्यात आढळतो.
साधारणपणे असे म्हणता येईल की, संग्रहात्मक स्वरूपाचा ग्रंथ असल्याने यात नावीन्य आढळून येत नाही. तरीही साधकाला एकाच आसनाविषयी/क्रियेविषयी निरनिराळ्या ग्रंथातील श्लोक एकत्र आढळत असल्यामुळे त्यांची तुलना करून तो स्वत:ला अनुरूप पद्धत अनुसरू शकतो. शिवाय एकाच साधनेच्या वेगवेगळ्या व्याख्या त्याला एकत्र मिळतात. उदा., प्राणायामाची व्याख्या काशीखण्डात पुढीलप्रमाणे आली आहे — आसनात स्थिर बसल्यावर डाव्या नाकपुडीने प्राणवायू बाहेर सोडावा. नंतर उजव्या नाकपुडीने आत घ्यावा. याला प्राणायाम म्हणतात (योगकर्णिका ३.१००). ग्रहयामल या ग्रंथात श्वास बाहेर सोडून (रेचक) किंवा आत घेऊन (पूरक) सुखपूर्वक वायूला धारण करणे याला प्राणायाम असे म्हणतात. हाच केवल कुंभक होय अशी व्याख्या केली आहे (योगकर्णिका ३.१३३).
उद्धृत केलेल्या निरुत्तरतन्त्रात आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि ही योगाची सहा अंगे मानली असून यम व नियम यांचा योगाच्या अंगांत समावेश केला नाही (योगकर्णिका ३.१२३).
काशीखण्डात योग्याचा आहार, निद्रा इत्यादिविषयी आलेल्या श्लोकाचे भगवद्गीतेतल्या श्लोकाशी साम्य आढळते. या श्लोकात असे म्हटले आहे की, आहार, विहार, क्रिया, निद्रा याविषयी नेमस्त असलेल्या योग्याला तत्त्वाचे दर्शन होते (योगकर्णिका ११.७, भगवद्गीता ६.१७).
समाधीची काशीखण्डातील व्याख्या ही पतंजलीच्या समाधीच्या व्याख्येपेक्षा निराळी आहे. काशीखण्डानुसार पाणी आणि मीठ हे एकत्र आल्यावर एकरूप होतात त्याप्रमाणे आत्मा आणि मन यांचे ऐक्य म्हणजे समाधि होय (योगकर्णिका ११.२). पतंजलीच्या योगशास्त्रानुसार ही व्याख्या पुढीलप्रमाणे आहे — ध्येय वस्तुव्यतिरिक्त अन्य कोणताही विषय (अर्थ) चित्तात न स्फुरणे म्हणजे अर्थमात्रनिर्भासता होय. ध्यानाच्या विकसित अवस्थेत ‘ज्यावर चित्त एकाग्र केले आहे केवळ त्या विषयाचीच अनुभूती होणे, मात्र त्या विषयाचे ज्ञान होत आहे ही जाणीव नष्ट होणे हीच समाधि होय’ (योगसूत्र ३.३).
ग्रहयामलतंत्रातील त्राटकाचे वर्णन करणारा श्लोक योगकर्णिकेत उद्धृत केला आहे. त्यात असे म्हटले आहे की, सूक्ष्म अशा लक्ष्याला डोळ्यात अश्रू येईपर्यंत निश्चल दृष्टीने प्रयत्नपूर्वक पाहावे. त्राटकाचा हा विधी ज्याप्रमाणे बाजारातून आणलेल्या करंड्याचे आपण रक्षण करतो त्याप्रमाणे गोपनीय ठेवावा (योगकर्णिका ४.५२).
या ग्रंथामध्ये पहिल्या पादात कुंडलिनीस्तोत्र आढळते. देवीच्या ब्राह्मी, गायत्री, वैष्णवी, दुर्गा, सरस्वती अशा विविध रूपांची उपासना यात सांगितली आहे. तसेच प्रणवोपासना, बीजाक्षरे, करन्यास यांचेही वर्णन आढळते. हा या ग्रंथावर असलेला तंत्राचा प्रभाव होय. ग्रंथकाराने ज्या ग्रंथांतून हे श्लोक निवडले त्यांची निवड कोणत्या निकषावर केली याविषयी संदिग्धता आहे. कारण पुराणांना योगविषयक अधिकृत ग्रंथ मानणे कठीण आहे. मात्र विज्ञानभिक्षूंनी पातंजल योगसूत्राच्या व्यासभाष्यावरील योगवार्त्तिक या ग्रंथात पुराणांचे दाखले सढळ हस्ते दिल्यामुळे याचे समर्थन करता येते. तंत्रग्रंथांचा या ग्रंथात विपुल प्रमाणावर समावेश केला आहे. त्यामुळे हठयोगाची तंत्राशी घातलेली सांगड हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे असे म्हणता येईल. योगशास्त्रावरील संकलनात्मक ग्रंथ हा योगकर्णिका या ग्रंथाचा विशेष आहे.
समीक्षक : ललिता नामजोशी