औद्योगिक पुरातत्त्व ही विसाव्या शतकाच्या मध्यावर उदयाला आलेली पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची उपशाखा आहे. या उपशाखेचा मुख्य उद्देश मानवी इतिहासातील औद्योगिक कालखंडाचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून अभ्यास करणे हा आहे. औद्योगिक पुरातत्त्वात अठराव्या शतकात यूरोपमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीपासून ते विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या काळाचा समावेश होतो. विविध कारखाने, गिरण्या, वखारी आणि औद्योगिक वसाहतींच्या स्थळांचे पुरातत्त्वीय उत्खनन करून तेथे मिळालेल्या वस्तूंच्या आधारे या कालखंडातील औद्योगिक व तांत्रिक प्रगतीचा मागोवा औद्योगिक पुरातत्त्वात घेतला जातो. मानवाने अतिप्राचीन काळापासून पर्यावरणातील संसाधने वापरून केलेल्या तंत्रज्ञानाचा आणि उद्योगधंद्यांचा अभ्यास करून त्यांचा मानवी जीवनावर कसा प्रभाव पडला, या संबंधी निष्कर्ष काढणे अशी औद्योगिक पुरातत्त्वाची आणखी एक व्याख्या आहे. तथापि औद्योगिक पुरातत्त्वातील समकालीन संशोधन इतक्या व्यापक अर्थाने केले जात नसून अद्याप संशोधनाचा भर आधुनिक काळापुरता मर्यादित आहे.
दुसर्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये औद्योगिक आस्थापना आणि कारखाने यांचा प्रचंड विध्वंस झाला. या उद्योगधंद्यांची पुनर्बांधणी १९५० नंतर सुरू झाली. असे करत असताना औद्योगिक क्रांतीत इंग्लंड जेव्हा अग्रेसर होते त्या काळातील निवडक औद्योगिक आस्थापनांच्या अवशेषांचे जतन करावे या कल्पनेतून औद्योगिक वारसा आणि त्याचा पुरातत्त्वीय अभ्यास ही संकल्पना पुढे आली. सुरुवातीच्या काळात औद्योगिक पुरातत्त्वाचा मुख्य भर हा इंग्लंडच्या इतिहासातील सुवर्णकाळामधल्या भव्य औद्योगिक वारशाचे जतन-संवर्धन हा होता. औद्योगिक पुरातत्त्वाच्या विकासात १९६३ मध्ये स्थापन झालेल्या ’नॅशनल रेकॉर्ड ऑफ इंडस्ट्रियल मॉन्युमेंट्स’ या सरकारी विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली.
गेल्या दोन शतकांच्या औद्योगिक इतिहासाबद्दल भरपूर लिखित माहिती उपलब्ध असताना वेगळ्या पुरातत्त्वीय अभ्यासाची गरज नाही, हा आक्षेप औद्योगिक पुरातत्त्वाबाबतही घेतला गेला; तथापि औद्योगिक आस्थापनांसंबंधीची माहिती प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाची आणि मालक-व्यवस्थापक यांनी गोळा केलेली असल्यामुळे त्यात कामगार अथवा उद्योगधंद्यांशी निगडीत लोकांच्या दैनंदिन जीवनाबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही. विशेषतः औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या, मजूरांचे शोषण होण्याच्या काळात, कामगारवर्गाच्या हलाखीच्या जीवनाबद्दल पारंपरिक ऐतिहासिक साधनांमध्ये जवळजवळ काहीही माहिती उपलब्ध नसते. अशा प्रसंगी औद्योगिक आस्थापना स्थळांच्या पुरातत्त्वीय उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा उपयोग होतो. विविध कारखाने निर्माण होत असताना बांधल्या गेलेल्या इमारती, वखारी, गोदामे, दळणवळणाच्या सोईसुविधा, रस्ते, रेल्वेमार्ग, कालवे, जलमार्ग, खाणींमधील यंत्रसामग्री, विविध स्तरावरील कर्मचारी वसाहती, मालाचे उत्पादन व बाजारपेठेत वितरण करण्यासाठी लागणारी यंत्रणा, कामगार व कर्मचार्यांनी कामाच्या ठिकाणी वापरलेल्या वस्तू व अवजारे इत्यादी सर्व गोष्टींच्या अवशेषांचा उपयोग औद्योगिक पुरातत्त्वात केला जातो. तसेच औद्योगिक वाढ होताना अथवा औद्योगिक आस्थापनांचा ऱ्हास होताना गावांमध्ये अथवा शहरांमधील वसाहतींच्या आकृतीबंधांमध्ये झालेले फेरबदल यांचा अभ्यास केला जातो. विशेषतः वेगवेगळ्या काळात वापरून टाकून दिलेली यंत्रसामग्री आणि अवजारे यांच्या अभ्यासातून तंत्रज्ञानातील प्रगतीचा मागोवा घेता येतो. औद्योगिकरण होताना निर्माण झालेल्या तात्पुरत्या अथवा कायमस्वरूपी वसाहतींची रचना त्या त्या ठिकाणच्या गरजांनुसार बनलेली असते. अशा वसाहतींचे अर्थकारण आणि सामाजिक जीवनही विशिष्ट प्रकारचे असते. अमेरिकेमध्ये एकोणिसाव्या शतकात पश्चिमेकडे खाण आणि अन्नप्रक्रिया उद्योगांची वाढ होताना छोट्या-मोठ्या गावांमधील आर्थिक-सामाजिक जीवनांत झालेले बदल हे याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे.
इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला पूरक घटक ठरलेल्या लोखंड आणि कोळसा खाणींवर काम करणार्या मजूरांच्या वसाहती, मँचेस्टर व पश्चिम यॉर्कशायर मधील कापडगिरण्यांचा उदय आणि ऱ्हास (१७७०-१९३०), पूर्व चेशायर भागातील रेशीम आणि सूतगिरण्यांचा आजूबाजूच्या परिसरावर झालेला परिणाम या संबंधी पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास करून काढलेले निष्कर्ष ही इंग्लंडमधील औद्योगिक पुरातत्त्वाची काही उदाहरणे आहेत. सन १९६७ मध्ये न्यू इंग्लंड भागातील कापड गिरण्यांच्या सर्वेक्षणाने अमेरिकेत औद्योगिक पुरातत्त्वाची सुरुवात झाली आणि १९७१ मध्ये ’सोसायटी फॉर इंडस्ट्रियल आर्किओलॉजी’ ही संस्था स्थापन झाली. इंग्लंड व अमेरिकेखेरीज इतर देशांमध्ये, विशेषतः यूरोपीय युनियनमधील देशांत औद्योगिक पुरातत्त्वीय वारसा जतन करून त्याचे संवर्धन करण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सुरुवात १९९९ मध्ये झाली. औद्योगिक पुरातत्त्वातील संशोधनाला प्रसिद्धी आणि प्रोत्साहन देण्यासाठी या क्षेत्रात ‘इंडस्ट्रियल आर्किओलॉजी’ (१९७५) आणि ‘इंडस्ट्रियल आर्किओलॉजी रिव्ह्यू’ (१९७६) ही दोन नियतकालिके अग्रेसर आहेत. या दोन नियतकालिकांमध्ये इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर विविध देशांमधील औद्योगिक पुरातत्त्वीय संशोधनाची अनेक उदाहरणे आढळतात. अलिशा आचार्य यांनी मुंबईमधील आता बंद पडलेल्या कापड गिरण्यांचा वारसास्थळे म्हणून विचार करण्यासंबंधी केलेले संशोधन वगळता भारतात अद्यापही औद्योगिक पुरातत्त्व हा विषय नवीन असून त्यात फारसे काम झालेले नाही.
संदर्भ :
- Acharya, Alisha, ‘Mill landscapes of Mumbai : When Remains Remained’, International Journal of Architecture 5(2) : 10–21, 2019.
- Casella, Eleanor, C. & James, Symonds, Eds., Industrial Archaeology. Future Directions, USA: Springer, 2005.
- Douet, J. Ed., Industrial Heritage Re-tooled : The TICCIH guide to Industrial Heritage Conservation, Lancaster : Carnegie, 2012.
- Hudson, K. World Industrial Archaeology, Cambridge, 1979.
समीक्षक : सुषमा देव