आधुनिक पुरातत्त्वविद्येची प्रारंभिक वाटचाल : (१८५०–१९५०).

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर आधुनिक पुरातत्त्वविद्येचा खऱ्या अर्थाने प्रारंभ होत असताना प्रामुख्याने दोन घटना घडून आल्या: पहिली घटना म्हणजे जुझेप्पे फिओरेल्ली (१८२३–१८९६) या इटालियन पुरातत्त्वज्ञाने पोम्पेईचे (⇨पाँपेई) उत्खनन हाती घेतले (१८६०) आणि दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे तत्कालीन ब्रिटिश सरकारने भारतात पुरातत्त्वीय संशोधन आणि प्राचीन वारसास्थळांच्या देखभालीसाठी ⇨ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) या संस्थेची स्थापना केली (१८६१). अर्थात असे असले तरी यूरोप, भारत व अमेरिकेत पुराणवस्तू जमा करणाऱ्या अनेक संस्था (Societies of antiquaries) बहरलेल्या होत्या. रशियात १८४६ मधील रशियन आर्किऑलॉजिकल सोसायटीच्या स्थापनेनंतर पुरातत्त्वविद्येला चालना मिळाली. अशा संस्थांशिवाय गुप्तधन शोधण्यासाठी (treasure hunting) हौशी व स्वघोषित पुराणवस्तू-संशोधकही होतेच.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपातील अनेक देशांमध्ये राष्ट्रवादाचा उगम झाला. पुराणवस्तू जमा करणाऱ्या संस्थांमुळे ‘राष्ट्रीय वारसा व त्याचे जतनʼ अशा संकल्पनांचा उदय झाला. त्यामुळे सुमारे शंभर वर्षे आपापल्या राष्ट्रातील महान व भव्य ऐतिहासिक वारसा शोधण्याच्या दिशेने आधुनिक पुरातत्त्वविद्येची प्रारंभिक वाटचाल होत गेली. याला राष्ट्रवादाचा उदय आणि प्राचीन इतिहासातून प्रेरणा घेणे यांची पार्श्वभूमी होती.  शिवाय बायबलमध्ये वर्णन केलेल्या स्थळांचा आणि आता नष्ट झालेल्या संस्कृतींच्या ठिकाणांचा शोध घेण्याची प्रेरणा शिल्लक होती. जर्मन हौशी पुराणवस्तू-संशोधक हाइनरिष श्लीमान (⇨हाइन्रिख श्लीमान ;१८२२–१८९०) यांनी ग्रीस व तुर्कस्तानात केलेली उत्खनने हे याचे उत्तम उदाहरण आहे. याखेरीज सर आर्थर जॉन इव्हान्स ( ⇨ आर्थर जॉन एव्हान्झ ; १८५१–१९४१) यांनी क्रीटमधील ⇨ नॉसस येथे उत्खनन करून ताम्रपाषाणयुगाचा शोध लावला. तसेच सर ⇨ चार्ल्स लेनर्ड वुली (१८८०–१९६०) यांचे उर (⇨ अर) येथील उत्खनन, हॉवर्ड कार्टर (१८७४–१९३९) यांनी लावलेला ⇨ तूतांखामेन याच्या थडग्याचा शोध (१९२२), व्ही. गॉर्डन चाइल्ड (१८९२–१९५७) यांचे पुरातत्त्वाला कलाटणी देणारे लेखन आणि ⇨ सिंधू संस्कृतीचा शोध ही या कालखंडाची वैशिष्ट्ये होती.

आधुनिक पुरातत्त्वाचा प्रारंभ नेपल्स विद्यापीठातील प्राध्यापक जुझेप्पे फिओरेल्ली यांच्या पोम्पेई येथील उत्खननाने सुरू झाला. या उत्खननात त्यांनी खणलेल्या स्तरांचे निरीक्षण व वर्णन करण्याची तंत्रशुद्ध पद्धत विकसित केली. तसेच प्रत्येक उत्खनित वास्तूला विशिष्ट प्रकारे क्रमांक दिला. केवळ पुराणवस्तूंवर लक्ष न देता त्यांनी पोम्पेईच्या समग्र इतिहासाची मांडणी करण्याला प्राधान्य दिले. फिओरेल्लींचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी पुरातत्त्वीय उत्खननतंत्राच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली आणि सर्वसामान्य लोकांनी पुरातत्त्वीय अवशेष पहावेत, यासाठी प्रयत्न केले.

आधुनिक पुरातत्त्वाच्या जडणघडणीत हाइनरिष श्लीमान, जनरल ⇨ ऑगस्टस हेन्री पिट-रिव्हर्स (१८२७–१९००), सर आर्थर जॉन इव्हान्स आणि सर विल्यम फ्लिंडर्स पिट्री (१८५३–१९४२) यांचे महत्त्वाचे योगदान होते. श्लीमान यांनी तुर्कस्तानातील हिसार्लिक येथे उत्खनन करून (१८७१–१८८२) प्राचीन ⇨ ट्रॉय नगरीचा शोध लावला. परंतु त्यांच्या पद्धती फारशा काटेकोर नव्हत्या. त्यामुळे आधुनिक पुरातत्त्वीय उत्खननपद्धतींचा विकास व वापर करण्याचे खरे श्रेय जनरल पिट-रिव्हर्स व सर विल्यम फ्लिंडर्स पिट्री यांना दिले जाते. जनरल पिट-रिव्हर्स यांनी उत्खननात सापडलेल्या फक्त चांगल्या व मौल्यवान वस्तूच नाही, तर अगदी साध्या व क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात, हे ठसवले. तसेच उत्खननाबरोबर त्याचे वृतांत प्रकाशित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी क्रॅनबोर्न चेस येथे १८८७ ते १८९८ दरम्यान केलेल्या उत्खननाचे अहवाल अत्यंत उच्च प्रतीचे मानले जातात. जनरल पिट-रिव्हर्स यांच्याप्रमाणे सर फ्लिंडर्स पिट्री यांनी उत्खननात मिळणाऱ्या सर्व अवशेषांची नोंदणी करणे, त्यांचा अभ्यास करणे आणि अहवाल प्रकाशित करणे यांचे महत्त्व जाणले होते. हे सर्व शिस्तीने केले नाही, तर उत्खनन हा प्रत्यक्षात प्राचीन स्थळाचा विध्वंसच असतो, याची त्यांना कल्पना होती. त्यांचा मेथड्स ॲन्ड एम्स इन आर्किऑलॉजी (१९०४) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. विविध थरांमधील खापरांचा तौलनिक अभ्यास करून त्यावरून सांस्कृतिक कालखंडांच्या कालनिश्चितीचे तंत्र त्यांनी विकसित केले. तौलनिक कालमापनाच्या या तंत्राला सिरिएशन (Seriation) असे म्हणतात. अशा प्रकारे पुरातत्त्वाला एक सुव्यवस्थित व विशिष्ट पद्धत असणारी ज्ञानशाखा म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य सर फ्लिंडर्स पिट्री यांनी केले. आधुनिक पुरातत्त्वविद्येच्या इतिहासात जॉर्ज फॉक्स आणि विल्यम सेन्ट जॉन होप यांचे सिल्चेस्टर येथील उत्खनन वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते (१८९०–१९०९). ब्रिटनमधील हॅम्पशर परगण्यातील या रोमन स्थळाच्या उत्खननात धातुशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र अशा विषयांच्या तज्ज्ञांचा सहभाग होता. पुरातत्त्वातील आंतरविद्याशाखीय संशोधनपद्धतीची ही सुरुवात होती.

भारतात ⇨ सर अलेक्झांडर कनिंगहॅम (१८१४–१८९३) यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या अखत्यारीत पुरातत्त्वीय सर्वेक्षण व उत्खननांना १८७१ नंतर सुरवात झाली. त्यापूर्वी ⇨ भगवानलाल इंद्रजी आणि ⇨ भाऊ दाजी लाड यांनी प्राचीन अभिलेख व नाणी अशा पुरातत्त्वीय अवशेषांकडे लक्ष दिले होते. भारतात वसाहतवादी राज्य असल्याने भारतीय पुरातत्त्वात प्राचीन काळाकडे बघण्याच्या यूरोपीय संकल्पनांचाच पगडा होता. अशा लेखनाला वसाहतवादी विवेचन (Colonial discourse) असे संबोधले जाते. परंतु भारताच्या भूतकाळाविषयी जिज्ञासा जागृत करण्याचे श्रेय प्राच्यविद्या संशोधक ⇨ रामकृष्ण भांडारकर (१८३७–१९२५) व ⇨ राजेंद्रलाल मित्र (१८२२–१८९१) यांचे आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेच्या अनेक महासंचालकांच्या नेतृत्वाखाली या काळात भारतात विविध ठिकाणी उत्खनने झाली. त्यात कंकाली टिला, ⇨ नालंदा, ⇨ सारनाथ,  ⇨ सांची, ⇨ मांडू, ⇨ तक्षशिला, ⇨ मोहें-जो-दडो, ⇨ हडप्पा, चन्हुदारो, ⇨ अहिच्छत्र, ⇨ ब्रह्मगिरी आणि ⇨ अरिकामेडू यांचा समावेश होता. तसेच गैरसरकारी क्षेत्रातील पुरातत्त्वीय संशोधनाला प्रारंभ झाला होता. ⇨ ह. धी. सांकलिया आणि मोरेश्वर दीक्षित यांचे ⇨ ब्रह्मपुरी (कोल्हापूर) येथील उत्खनन (१९४५-४६), मोरेश्वर दीक्षित यांचे ⇨ रंगपूर येथील उत्खनन (१९४५-४६), जी. आर. शर्मा यांचे ⇨ कौशाम्बी येथील उत्खनन (१९४८), पुणे येथील ⇨ भारत इतिहास संशोधक मंडळाने केलेले कराडचे उत्खनन (१९४९) आणि सांकलियांचे नाशिक येथील उत्खनन (१९५०-५१) ही याची काही उदाहरणे आहेत.

या काळातील भारतीय पुरातत्त्वात सर अलेक्झांडर कनिंगहॅम, ⇨ जेम्स बर्जेस, हेन्री कझिन्स, ⇨ सर जॉन ह्यूबर्ट मार्शल, रावबहादूर दयाराम साहनी, ⇨ रावबहादूर काशिनाथ नारायण दीक्षित आणि ⇨ सर मॉर्टिमर व्हीलर यांचे योगदान लक्षणीय होते. विशेषतः व्हीलर यांनी अनेक भारतीय विद्यार्थ्याना पुरातत्त्वीय उत्खननतंत्राचे प्रशिक्षण दिले. यांतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी पुढील काळात भारतीय पुरातत्त्वाची धुरा सांभाळली. व्हीलर यांनी १९३४-३७ मध्ये इंग्लंडमधील ⇨ मेडन कॅसल येथील उत्खननाला लोकांनी भेट द्यावी म्हणून प्रयत्न केले आणि पुरातत्त्वीय कामांना प्रसिद्धी मिळावी, यासाठी प्रसारमाध्यमांना उद्युक्त केले.

सन १८५० ते १९५० या शतकभरात आधुनिक पुरातत्त्वाचा एक सक्षम ज्ञानशाखा म्हणून विकास झाला. या काळात उत्खनन व पुरावशेषांची नोंदणी यांच्या तंत्रामध्ये लक्षणीय फरक पडत गेला. तसेच पुरातत्त्वीय संशोधनाच्या उद्दिष्टांमध्ये बदल होऊन पुरातत्त्वामधील प्राचीन कलात्मक गोष्टी गोळा करण्याचा व अद्भुततेचा भाग कमी होत गेला.

संदर्भ :

  •   Chakrabarti, Dilip. K. A History of Indian Archaeology from the Beginning to 1947, New Delhi, 1988.
  •   Daniel, Glyn A Hundred and Fifty Years of Archaeology, Cambridge, Massachusetts, 1976.
  •   Evans, Christopher ‘Delineating Objects : Nineteenth-Century Antiquarian Culture and the Project of Archaeologyʼ, in Visions of Antiquity: The Society of Antiquaries of London 1707–2007 (Pearce, Susan Ed.), London, 2007.
  •   Kradin, Nikolay N. ‘A Panorama of Social Archaeology in Russiaʼ, in Comparative Archaeologies: A Sociological View of the Science of the Past (Lozny, L. R. Ed.), 2011.
  •   Moro-Abadía, O. ‘The History of Archaeology as a ‘Colonial Discourse’, Bulletin of the History of Archaeology, 2006.
  •   Ray, H. P. ‘Colonial Archaeology in South Asia. The Legacy of Sir Mortimer Wheelerʼ, New Delhi, 2007.

समीक्षक : शरद राजगुरू