पुरातत्त्वामधील विविध सिद्धांतकल्पना पडताळून पाहणे व निष्कर्ष काढणे यासाठी प्रत्यक्ष प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्याच्या दृष्टीकोनाला प्रायोगिक पुरातत्त्व असे म्हणतात. प्रयोग म्हणजे नियंत्रित निरीक्षणे, ही प्रयोगाची साधीसोपी व्याख्या आहे. पुरातत्त्वामधील निष्कर्ष ज्या मानवी समाजाबद्दल असतात, ते समाज केव्हाच अंतर्धान पावले असल्याने त्यांच्यावर प्रयोग करायला वावच असत नाही. असे असले तरी आजच्या काळातील वस्तूंवर प्रयोग करून तर्कशास्त्रातील साम्यानुमान (Analogical reasoning) पद्धतीने पुरातत्त्वीय निष्कर्षांना आधार देणे शक्य असते. प्रायोगिक पुरातत्त्वाचा भर अशाच साम्यानुमानावर असतो.

प्रायोगिक पुरातत्त्वाला नवपुरातत्त्वाच्या उदयानंतर १९५०-१९६० पासून वेग आला असला, तरी प्रायोगिक पुरातत्त्वाची सुरुवात विसाव्या शतकाच्या प्रारंभी झाली होती. प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय संशोधनात दगडांपासून बनवलेल्या अवजारांना व हत्यारांना अत्यंत महत्त्व असते; तथापि नैसर्गिक रीत्या तुटलेले दगड आणि मानवाने मुद्दाम तोडलेले दगड हे वेगळे कसे ओळखायचे हा प्रश्न पुरातत्त्वज्ञांना फार अगोदरपासून भेडसावत होता. ए. एस. बार्नेस (१९३९) यांनी नैसर्गिकपणे फुटलेल्या दगडांच्या कडा आणि मुद्दाम तोडलेल्या दगडी कपच्यांच्या कडा यांचे संख्यात्मक पद्धतीने केलेले विश्लेषण हे प्रायोगिक पुरातत्त्वाचे पहिले उदाहरण होते. याचप्रमाणे एस. ए. सेमेनोव (१८९८—१९७८) या सोव्हिएत पुरातत्त्वज्ञांनी प्रागैतिहासिक दगडी हत्यारे व हाडांची हत्यारे यांच्या वापरासंबंधी अनुमान काढण्यासाठी प्रयोगांचा वापर केला होता.

ब्रिटिश पुरातत्त्वज्ञांनी १९६२ मध्ये विल्टशायर परगण्यात ओव्हरटन डाउन येथे आणि १९६३ मध्ये वेअरहॅम डाउन येथे मुद्दाम मातीच्या ढिगाऱ्यांखाली वस्तूंचे अवशेष गाडले. ही दोन ठिकाणे वेगवेगळ्या पर्यावरणातील असल्याने या अवशेषांवर काळाच्या ओघात काय परिणाम होतात, याचा पुढील ३२ वर्षे केलेला अभ्यास अत्यंत मोलाचा ठरला. ’बटसर प्राचीन शेतीवाडी’ (Butser Ancient Farm) हा प्रायोगिक पुरातत्त्वामधील आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. लोहयुग-रोमन काळातील (इ. स. पू. ४०० ते इ. स. ३००) ग्रामीण जीवनाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनमध्ये हॅम्पशायर परगण्यात बटसर हिल परिसरात तीन ठिकाणी शेती करणाऱ्यांच्या वाड्या वसवण्याचा प्रयोग पी. जे. रेनॅाल्ड्स यांनी केला (१९७२—१९९५). यात प्राचीन काळातील तंत्रज्ञान वापरून शेती करताना आणि पशुपालन करताना नोंदवलेल्या निरीक्षणांचा उपयोग ब्रिटनमधील लोहयुग-रोमन कालखंडाच्या पुरातत्त्वीय अभ्यासासाठी करण्यात आला होता. या ठिकाणी जमिनीखाली धान्य साठवून ठेवण्यासाठी प्रायोगिक कणग्या तयार केल्या आणि त्यांच्या अभ्यासाने धान्य साठवून ठेवण्याच्या तंत्राविषयी मोलाची माहिती मिळाली. डेन्मार्कमधील कोपनहेगन शहराजवळील ल्येरे (Lejre) येथील प्रायोगिक पुरातत्त्व केंद्र हे यूरोपातील तिसरे महत्त्वाचे उदाहरण असून येथे प्रायोगिक पुरातत्त्वाशी संबंधित उघडे संग्रहालय (Open Air Museum) आहे.

पुरातत्त्वामधील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयोग केले जातात. दगडांची  व हाडांची हत्यारे कोणत्या कामासाठी वापरली असतील याचा अंदाज घेण्यासाठी नव्याने हत्यारे बनवून त्यांच्या धार असलेल्या कडांवर निर्माण होणार्‍या सूक्ष्म खुणांचा (Microwear studies) अभ्यास; पुरातत्त्वीय उत्खननात मिळणारी मातीची निरनिराळी भांडी कशी तयार झाली असावीत, हे तपासण्यासाठी नव्याने भांडी बनवून ती भट्टीत भाजणे; विविध वस्तूंपासून (मौल्यवान दगड, शंख, शिंपले, काच, हाडे, हस्तीदंत, माती) मणी, बांगड्या वगैरे अलंकार बनवून प्राचीन काळात ते कसे तयार केले असतील यांसंबंधी अंदाज करणे; आणि नवीन हाडांपासून अथवा शिंगांपासून बाणाची व भाल्यांची टोके बनवून ती प्रत्यक्ष वापरण्याच्या प्रयोगातून त्यांच्या उपयुक्ततेविषयी माहिती मिळवणे ही  प्रायोगिक पुरातत्त्वातील काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. या खेरीज प्राचीन काळात अन्न मिळवणे, ते शिजवणे अथवा भाजणे व ते समूहात वाटून घेणे या सर्व क्रियांमध्ये काय काय घडते आणि किती जणांचे पोषण कसे होते, याबद्दल जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वज्ञ प्रयोग करून त्यामधून निष्कर्ष काढण्याच्या पद्धती तयार करतात. प्रायोगिक पुरातत्त्वीय पद्धतींना १९७० नंतर पुरातत्त्वीय संगणनातील (Archaeological computing) प्रगतीचाही उपयोग होत आहे.

संदर्भ :

  • Barnes, A. S. ‘The differences between natural and human flaking on prehistoric flint implements’, American Anthropologist, 41: 99–112, 1939.
  • Bell, M.; Fowler, P. J. & Hillson, S. W. The experimental earthwork project 1960-1992, London, 1996.
  • Coles, J. Experimental Archaeology, London, 1979.
  • Outram, A. K. ‘Introduction to experimental archaeology’, World Archaeology, 40(1): 1-6, 2008.
  • Reynolds, P. J.  Experimental archaeology: a perspective for the future, Leiden, 1994.
  • Saraydar, S.C. Replicating the past : The art and science of archaeological experiment, Long Grove, Illinois, 2008.

       समीक्षक : सुषमा देव