भारतीय वास्तुकलेचा इतिहास : इतिहास, संस्कृती व धर्म यात भारतीय वास्तुकलेचे मूळ सापडते. ज्याप्रकारे येथील संस्कृतीचा (civilization) विकास होत गेला, त्याप्रकारे वास्तुकला प्रगत होत गेली. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या सामग्रीच्या (Building material) गुणधर्मानुसार बांधकामाची निरनिराळी तंत्रे शोधली गेली. अशाप्रकारे बदलते साम्राज्य, स्थानिक वास्तुशैली आणि उपलब्ध सामग्री यांच्या एकत्रित परिणामांतून वास्तुकला विकसित होत गेली. तसेच भारत हा खंडप्राय देश असल्यामुळे येथील हवामान व भौगोलिक परिस्थिती यातील विविधता प्रादेशिक वास्तुशैलीमधून देखील दिसून येते.
भारतीय वास्तुकलेची सुरुवात सुमारे ५००० वर्षांपूर्वी सिंध, गुजरात व पंजाब या प्रांतांमध्ये ‘सिंधू संस्कृती’च्या स्वरूपात झाली. यामध्ये विटा आणि लाकडाचा वापर इमारतींच्या बांधणीसाठी केला जात असे. रेखीव ‘नगर नियोजन’ हे त्याकाळच्या वास्तुकलेचे वैशिष्ट्य होते. त्यानंतर इ.स.पू. १५००-६०० मधील वैदिक कालखंडात, शाकार व लाकूड वापरून घरांची बांधणी केली जात असे. लहान आकाराची गावे वसवली गेली. गावांभोवती असणारे कुंपण आणि मुख्य प्रवेशद्वार हे या काळातील मुख्य प्रगती होती. यातील प्रवेशद्वाराच्या रचनेवरून बौद्ध कालखंडात ‘तोरण’ बांधण्यास सुरुवात झाली. इ.स.पूर्व चौथ्या शतकात मौर्य काळापासून बौद्ध वास्तुकलेची सुरुवात झाली. तसेच या काळात लाकडासोबत दगडाचाही वापर करण्यास सुरुवात झाली. लाकडात बांधल्यामुळे कमानीच्या लांबीवर वर येणारी बंधने दगडामुळे कमी झाली. अशाप्रकारे जास्त पैस असणाऱ्या भव्य वास्तूंची निर्मिती होऊ लागली. स्तूप, स्तंभ, दगडात कोरलेले चैत्य, विहार आणि लेण्या हे बौद्धकालीन वास्तुकलेचे प्रतिनिधित्व करतात. तसेच लेण्यांप्रमाणेच अखंड दगडात कोरलेले रथ आणि मंदिरे देखील बांधली गेली. महाबलीपुरम येथील रथ आणि वेरूळचे कैलास मंदिर ही अशा प्रकारची सर्वोत्कृष्ट उदाहरणे आहेत.
इ. स. चौथ्या शतकात सुरू झालेला ‘गुप्त’ कालखंडाला भारतातील वास्तुकलेतले सुवर्णयुग मानले जाते. या काळात मंदिरांच्या बांधणीची सुरुवात झाली. यानंतर ‘मंदिर’ हा वास्तुप्रकार भारतात सर्वत्र पसरला गेला आणि विस्तृत प्रमाणात बांधला गेला. ही मंदिरे त्या काळातील राजांच्या आश्रयातून बांधली गेल्यामुळे तेथील विख्यात वास्तुरचनाकार व शिल्पकार यांनी त्यांची बांधणी केली. तसेच तेथे उपलब्ध असणारा उत्कृष्ट दगड बांधकामासाठी वापरला गेला. त्यामुळे यातील अनेक मंदिरे आजही सुस्थितीत आहेत. मंदिरांच्या बांधणीचे प्रामुख्याने दोन प्रकार तयार झाले- उत्तर भारतीय नागर शैली व दक्षिण भारतीय द्रविड शैली. या शैलींमध्ये फरक असला तरीही दोन्ही प्रकार हे स्तंभतोरण शैली (trabeate) म्हणजे ‘खांब व वासे’ (Post & lintel) अशा रचनेत बांधले गेले. तसेच स्थानिक बदलानुसार त्यांचे अनेक उपप्रकार झाले. खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर ही मंदिरे परिपूर्ण नागर वास्तुशैलीची उदाहरणे आहेत. तर चोला साम्राज्यात बांधलेली बृहडेश्वर, ऐरावातेश्वर ही देवळे द्रविड शैलीतील सर्वोत्कृष्ट उदाहरणे आहेत. अशी ही निरनिराळ्या शैलीतील मंदिरे भारतीय वास्तुकलेतील वैविध्य दर्शवतात.
तेराव्या शतकातील इस्लाम आक्रमणानंतर भारतीय वास्तुशैलीत आमुलाग्र बदल झाले. इस्लामिक वास्तुकलेतील मशीद व समाधीस्थळे (Tomb) हे वास्तूप्रकार भारताला नवीन होते. दिल्ली सल्तनतच्या कुतुब उद्दीन ऐबक याने ‘कुवत-उल-इस्लाम’ ही भारतातील पहिली मशीद बांधली. इस्लामिक वास्तुशैलीमुळे कमानी व घुमट या प्रकारांचा भारताला परिचय झाला. स्तंभतोरण शैलीवर येणारी बंधने कमानदार / चापाकार (Arcuate) शैलीमुळे कमी झाली. आणखी मोठ्या लांबीच्या कमान असणाऱ्या वास्तूंची निर्मिती होऊ लागली. भारतीय वास्तुकला व इस्लामिक वास्तुकला यांच्या मिश्रणातून ‘इंडो-इस्लामिक’ शैली निर्माण झाली. दिल्ली सल्तनत नंतर आलेल्या मुघलांच्या काळात बांधलेली समाधीस्थळे, मशिदी, किल्ले व उद्याने ही या प्रकारच्या वास्तुशैलीची परिपूर्ण उदाहरणे आहेत. १६व्या शतकात अकबराच्या काळात मुघल वास्तुकला खूप मोठ्या प्रमाणावर विकसित झाली. नंतर १७ व्या शतकात मुघल सम्राट शाहजन याने बांधलेला ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यामधील एक आहे. इंडो-इस्लामिक शैलीतील घटक हे प्रादेशिक वास्तुकलेत वापरले गेले. त्यामुळे राजपूत, मराठा अशा प्रादेशिक वास्तुकलेमध्ये या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
पंधराव्या शतकामध्ये पोर्तुगीज व नंतर इंग्रज आणि फ्रेंच यांनी भारतात वसाहतवादाची सुरुवात केली. त्यांच्यामार्फत युरोपीय शैली येथे आली, चर्च बांधणीची सुरुवात झाली. भारतातील हवामान आणि सामग्रीला अनुसरून यूरोपीय शैलीमध्ये बदल केले गेले. पुढे युरोपातील औद्योगिक क्रांतीचे पडसाद भारतात देखील उमटले. इंग्रज राजवटीनंतर भारतात प्रमाणात शहरीकरण सुरु झाले. वाहतुकीची साधने, दळणवळण, तंत्रज्ञान यात प्रगती झाली याचा फायदा वास्तुकलेला देखील झाला. भारतातील वास्तुप्रकार मंदिर, मशीद, राजवाडे एवढेच मर्यादित न राहता महानगरपालिका, पोस्ट ऑफिस, न्यायालये अशी अनेक प्रशासकीय कार्यालये आणि रेल्वे स्थानके, महाविद्यालये, मनोरंजनाची केंद्रे, मार्केट अशा सार्वजनिक वास्तू यांची बांधणी सुरु झाली. यामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक तसेच आर्ट डेको या प्रकारातील वास्तू यांना UNESCO च्या जागतिक वारसा असणाऱ्या यादीत स्थान मिळाले आहे. युरोपीय शैली व भारतीय शैली यांच्या मिश्रणातून ‘इंडो सारासेनिक’ शैली निर्माण झाली. दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाची वास्तू हे या शैलीचे उत्तम उदाहरण आहे.
लेखात नमूद केलेल्या सर्व वास्तू आणि शैली या भारतीय वास्तुकलेच्या समृद्धतेची उदाहरणे आहेत. या वास्तूंमुळे भारतीय वास्तुकला सर्वाना परिचित झाली. यातील अनेक वास्तूंना UNESCO चा सन्मान लाभलेला आहे.
समीक्षक : श्रीपाद भालेराव