फ्रेरे, जॉन : (१० ऑगस्ट १७४०–१२ जुलै १८०७). प्रागैतिहासिक पुरातत्त्व शाखेची संकल्पनात्मक पायाभरणी करणारे अठराव्या शतकातील ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ व राजकीय नेते. त्यांचा जन्म सफोक परगण्यातील फिनिंगहॅम येथे झाला. तेथे फ्रेरे कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता होती. पुढे दीर्घकाळ फ्रेरे नॉरफोक परगण्यातील रॉयडन हॉल या ठिकाणी राहिले. त्यांनी गॉनव्हिले येथील कायस कॉलेजमधून (Caius College) एम. ए. पदवी प्राप्त केली (१७६६). त्यांनी श्रीमंत हुखम घराण्यातील जेन हुखम (Jane Hookham) यांच्याशी विवाह केला (१७६८). त्यांना सात मुलगे आणि दोन मुली होत्या. त्यांच्या सर्व अपत्यांनी पुढे नावलौकिक मिळवला.

जॉन फ्रेरे यांचे हेन्री वॉल्टन यांनी काढलेले तैलचित्र.

फ्रेरे रॉयल सोसायटी आणि सोसायटी ऑफ अँटिक्वेरीजचे फेलो होते. प्रख्यात पुरावस्तू संग्राहक रिचर्ड गॉफ (१७३५–१८०९) हे त्यांचे जवळचे मित्र होते. फ्रेरेंना विविध विषयांमध्ये रस होता. त्यांनी अनेक उच्च पदांवर काम केले. ते सफोकचे हाय शेरीफ (१७७६-७७) आणि नॉर्विचचे संसद (पार्लमेंट) सदस्य (१७९९-१८०२) होते.

जॉन फ्रेरेंना प्रागैतिहासिक अवजारांचा शोध योगायोगाने लागला. ते आय नावाच्या गावाकडे जात असताना होक्सने (Hoxne) या गावापाशी दक्षिणेला असलेल्या टेकडीच्या माथ्यावर त्यांना विटांसाठी चिकणमाती खोदण्याचे काम चालू असल्याचे दिसले. ते केवळ कुतूहल म्हणून तेथे थांबले. त्यांना फ्लिंट दगडाचे तुकडे फेकून देताना आढळले. हे तुकडे इतक्या मोठ्या प्रमाणात होते की, त्यांचा वापर बाजूच्या रस्त्यात भर घालण्यासाठी केला जात होता. फ्लिंटचे हे तुकडे बारा फूट (सु. ४ मी.) खोलीवर एका स्तरातून निघालेले होते. फ्रेरेंना ताबडतोब ही मानवनिर्मित अवजारे (हातकुऱ्हाडी) असल्याचे लक्षात आले. इतकेच नाही तर त्यांनी तेथील स्तरांचे निरीक्षण करून ही अवजारे चतुर्थक (क्वाटर्नरी) कालखंडाच्या निक्षेपात कशी आली असावीत, याचा अचूक अंदाज बांधला.

होक्सने हातकुऱ्हाड.

फ्रेरेंनी या अवजारांची रेखाटने व त्यांच्यावरील आपले टिपण लंडनच्या सोसायटी ऑफ अँटिक्वेरीजकडे पाठवले (१७९७). परंतु त्यावर पुढे काहीच झाले नाही. नंतर हे टिपण आर्किओलोगिया (Archaeologia) या नियतकालिकात प्रसिद्ध झाले (१८००). त्यांचे हे टिपण मोजक्या शब्दांमध्ये आपले निरीक्षण व निष्कर्ष मांडण्याचा उत्तम नमूना आहे. यानंतरही होक्सने येथील शोधाची फारशी दखल घेतली गेली नाही. कदाचित त्यांचे प्रतिपादन जगाच्या उगमासंबंधी बायबलप्रणीत तत्कालीन लोकप्रिय समजुतीपेक्षा सर्वस्वी विरोधी असल्याने असे घडले असावे; तथापि त्यांचे योगदान पुढे साठ वर्षांनंतर लक्षात आले. जाक बुशे दी पर्थ यांना फ्रान्समधील सोम नदीच्या खोऱ्यात अबीव्हील येथे अवजारे मिळण्याच्या अगोदर जॉन फ्रेरे यांनी होक्सने अवजारे प्रागैतिहासिक असल्याचे नेमकेपणाने ओळखले होते. त्यामुळे पुरातत्त्वविद्येच्या इतिहासकारांनी जॉन फ्रेरे हे पहिले ब्रिटिश प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ असल्याचे नमूद केले आहे.

डेरेहॅममध्ये येथे त्यांचे निधन झाले.

 

 

संदर्भ :

  • Frere, John, ‘An Account of Flint Weapons Discovered at Hoxne, in Suffolkʼ, Archaeologia, 13 : 204-205, 1800.
  • Grayson, Donald K. The Establishment of Human Antiquity, Academic Press, New York, 1983.
  • Wymer, J. J. & West, R. G. ‘A Memorial to John Frereʼ, Past, 33, 1999.
  • https://www.ucl.ac.uk/prehistoric/past/past33.html

                                                                                                                                                                            समीक्षक : जयेंद्र जोगळेकर