भारतीय दर्शनांतील एक संज्ञा. त्रय म्हणजे तीन प्रकारचे. भारतीय दर्शनांत दु:ख तीन प्रकारचे मानले आहे. या दर्शनांमध्ये दु:ख, त्याची कारणे, दु:खनिवारण (निवृत्ती) आणि निवारणाचे उपाय यांवर विस्तृत विचार केलेला आहे. सांख्य आणि योगदर्शनानुसार दु:खाचे कारण त्रिगुण असून त्यांच्या प्रभावामुळे प्रत्येक प्राणिमात्रास दु:खाचा अनुभव येतो आणि त्यापासून तो मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. जरी सर्व प्रकारच्या दु:खांचा अनुभव हा अंत:करणाद्वारेच होत असला तरीही दु:ख ज्या कारणांमुळे उत्पन्न होते ती कारणे प्रामुख्याने तीन प्रकारची असू शकतात. या दु:खांना सांख्यशास्त्राने आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक या तीन प्रकारात विभाजित केले आहे.

(१) आध्यात्मिक दु:ख : जे स्वत:च्याच शरीर किंवा मनाद्वारे प्राप्त होते, त्या दु:खाला आध्यात्मिक दु:ख म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत – शारीरिक दु:ख आणि मानसिक दु:ख. यांना अनुक्रमे व्याधी आणि आधी असेही संबोधिले जाते.

(अ) शारीरिक दु:ख : हे शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या विषमतेमुळे निर्माण होते. उदा., ज्वर, अतिसार इत्यादी दु:खे.

(आ) मानसिक दु:ख : मनातील काम, क्रोध, लोभ, मोह इ. विकारांमुळे निर्माण होणारे तसेच इच्छित वस्तू प्राप्त न झाल्यामुळे किंवा प्रियजनांच्या वियोगाने होणारे दु:ख मानसिक दु:खामध्ये समाविष्ट होते.

(२) आधिभौतिक दु:ख : जे अन्य भूत म्हणजे अन्य जीवांपासून उत्पन्न होते, त्या दु:खाला आधिभौतिक दुःख म्हणतात. उदा., सर्पदंश, दुसऱ्या व्यक्तीकडून मिळणारे दु:ख इत्यादी.

(३) आधिदैविक दु:ख : पंचमहाभूतांच्या प्रकोपाने निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे जीव दु:खी होतात; उदा., वादळ, भूकंप, त्सुनामी इत्यादी आपत्तींमुळे होणाऱ्या दु:खांना आधिदैविक दु:ख म्हणतात.

अशाप्रकारचे भोग क्लेशदायक असल्याने प्राणिमात्र त्या दु:खांपासून मुक्त होण्याचा उपाय शोधत असतात. चिकित्सा पध्दती, मनोरंजनाची साधने इत्यादी उपलब्ध उपायांमुळे दु:ख तात्पुरत्या स्वरूपात दूर केले जाऊ शकते. परंतु, दु:खापासून निश्चित रूपाने आणि नेहमीसाठी मुक्त व्हायचे असेल, अर्थात् दु:खाची ऐकान्तिक आणि आत्यन्तिक निवृत्ती होण्यासाठी विवेकज्ञान हाच एकमेव उपाय असल्याचे योगदर्शनाने वर्णिले आहे.

योगदर्शनानुसार वस्तुत: दु:ख हे त्रिगुणांमुळे निर्माण होत असल्याने आणि आत्मा हा निर्गुण असल्यामुळे त्याचा दु:खाशी संबंध येत नाही. मात्र, प्रकृती आणि तिच्या तत्त्वांच्या संपर्कात आत्मा आल्यामुळे त्याला आपणच दु:ख अनुभवत आहोत असे वाटते.

विवेकी मनुष्यासाठी दु:ख हेय (त्याग करण्यास योग्य) आहे. कालाच्या भेदानुसार दु:ख हे अतीत, वर्तमान आणि अनागत असे तीन प्रकारचे असते. यांपैकी अतीत दु:ख (भूतकालिक दु:ख) हे आधीच अनुभवून झाल्यामुळे त्याचा त्याग करता येणे शक्य नसते. वर्तमानकालिक दु:ख हे भोगारूढ असल्याने त्याचाही त्याग करणे शक्य नसते. त्यामुळे अनागत दु:ख (भविष्यकालिक दु:ख) प्राप्त होण्याआधीच ते टाळण्यासाठी योग्याने प्रयत्न केले पाहिजेत व ज्ञान प्राप्तीचा उपाय शोधला पाहिजे.

पहा : क्लेश, दु:ख, विवेकज्ञान.

संदर्भ :

  • डॉ. कर्नाटक, विमला योगवार्त्तिक,  बनारस हिन्दु विश्वविद्यालय, वाराणसी, १९९२.
  • डॉ. कर्नाटक, विमला योगसूत्रम्, बनारस हिन्दु विश्वविद्यालय, वाराणसी, १९९२.
  • डॉ. शास्त्री, राकेश सांख्यकारिका, संस्कृत ग्रन्थागार प्रकाशन, दिल्ली, २००४.

समीक्षक : श्रीराम आगाशे