सॉलोमन, सुनीती : ( १४ ऑक्टोबर, १९३९ – २८ जुलै,२०१५ )
सुनीती सॉलोमन या पूर्वाश्रमीच्या सुनीती गायतोंडे होत. त्यांचा जन्म चेन्नई येथील चामड्याचा व्यापार करणाऱ्या हिंदू कुटुंबात झाला. मद्रास वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. तेथे शिकत असताना त्यांची व्हिक्टर सॉलोमन यांच्याशी मैत्री होऊन त्या विवाहबद्ध झाल्या. व्हिक्टर हे हृदयरोग शल्यचिकित्सक होते. युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशात सुनीती यांनी विकृतीशास्त्रात विशेष प्रशिक्षण घेतले. त्या १९७३ साली आपले पती व्हिक्टर सॉलोमन यांच्यासह चेन्नईला परत आल्या. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात पीएच्.डी. केली.
पुढे त्या मद्रास वैद्यकीय महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात प्राध्यापक होत्या.
त्यांनी १९८१ साली एड्सच्या लक्षणांचा सखोल अभ्यास केला. १९८३ साली एडसच्या एचआयव्ही व्हायरसचा प्रत्यक्ष शोध लागला. १९८६ साली त्यांनी शरीरविक्रय व्यवसायातील १०० स्त्रियांची तपासणी केली. त्यांच्या रक्त नमुन्यात सहा एड्सग्रस्त होते. त्यांनी हे रक्ताचे नमुने बाल्टिमोरच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठात खात्री करून घेण्यासाठी पाठवले आणि ते एड्सग्रस्त असल्याचे सिद्ध झाले. भारतातील एड्सग्रस्त रुग्णांची ही पहिली नोंद आहे. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी एचआयव्हीवर संशोधन सुरू केले.
सुनीतींनी एडसग्रस्त रुग्णांच्या बरोबर काम करणे त्यांच्या पतीस मान्य नव्हते. कारण हे सगळे रुग्ण एकतर समलिंगी समागम करणारे, अमली पदार्थ रक्तात टोचून घेणारे किंवा शरीरविक्रय व्यवसायातले होते. सुनीती त्यांच्या पतींना म्हणाल्या, ‘तुम्ही त्यांच्या कथा ऐकल्यावर असे कधीच म्हणणार नाही.’ एड्स या रोगाबद्दल उघडपणे बोलणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. त्या म्हणत, ‘एड्सग्रस्त रुग्ण हा रोगामुळे मरण्याऐवजी समाजाने बहिष्कृत केल्यामुळे प्राण गमावतो’.
सुनीती यांनी १९८८ ते ९३ या कालावधीत मद्रास वैद्यकीय महाविद्यालयात भारतातील पहिला एड्स रिसोर्स ग्रुप तयार करून संशोधन आणि सामाजिक प्रबोधनाला सुरुवात केली. १९९३ साली त्यांनी आपल्या वडलांच्या नावे ‘वाय.आर.गायतोंडे एड्स संशोधन आणि अभ्यास केंद्र’ स्थापन केले. या केंद्राचा पसारा पुढे इतका वाढला की, २०१५ साली तेथे रोज जवळजवळ १०० बाह्यरुग्णांची नोंदणी होऊ लागली आणि १५००० रुग्ण हे नियमितपणे उपचारासाठी येऊ लागले. त्यांच्या या कार्यामुळे एचआयव्हीचा प्रादुर्भाव चांगलाच आटोक्यात आल्याचे दिसून आले. भारतीय एड्स संशोधन संस्थेच्या त्या अध्यक्ष होत्या. अमेरिकन मानसिक स्वास्थ्य राष्ट्रीय संस्थेतील आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पात त्या सहभागी झाल्या.
त्यांना एड्सच्या क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे काम केल्याबद्दल गौरवण्यात आले. तमिळनाडू राज्य एड्स नियंत्रण संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. अमेरिकेच्या ब्राउन विद्यापीठाने डीएमएस पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांना राष्ट्रीय महिला जीवशास्त्रज्ञ पारितोषिकाने सन्मानित केले. नॅशनल ॲकेडेमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले. चेन्नईच्या एमजीआर वैद्यकीय महाविद्यालयाने त्यांना एड्स व एचआयव्ही क्षेत्रातील कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले.
सुनीती सॉलोमन यांचा स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे चेन्नई येथे मृत्यू झाला.
संदर्भ :
- in/nagpur/…/dr…sunita-soloman/DIM7885/
- https://in.linkedin.com/in/sunita-soloman-0baa8516
- Encyclopedia of Women in Today’s World The Multimedia Encyclopedia of Women in Today’s World
समीक्षक : मुकुंद बोधनकर