देशी पुरातत्त्व ही संज्ञा एकविसाव्या शतकातील पुरातत्त्वविद्येमध्ये बदलत्या सैद्धांतिक भूमिकांचे द्योतक आहे. देशी पुरातत्त्व ही पुरातत्त्वाची एक उपशाखा नसून तो भूतकाळाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. इतिहास व पुरातत्त्वसंशोधक आपल्या संस्कृतीच्या बाहेरील लोकांच्या पुरावस्तूंचा अर्थ लावताना तो त्यांना हवा तसा लावतात; तथापि अनेक वस्तूंना निरनिराळ्या लोकसमूहांमध्ये निरनिराळे अर्थ असतात. इतकेच नाही तर एकाच वस्तूला वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे महत्त्व असू शकते. पुरातत्त्वविद्येच्या मुख्य विचारधारेत हे लक्षात न घेतल्याने विशेषतः ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया व अमेरिका या खंडांतील मूळ रहिवाशांच्या इतिहासाची मांडणी वसाहतवादी भूमिकेतून झालेली आहे, असे देशी पुरातत्त्वाच्या समर्थकांचे प्रतिपादन आहे. म्हणजेच देशी पुरातत्त्व ही वसाहतवादी दृष्टिकोनाच्या विरोधामधील प्रतिक्रिया आहे. कारण पुरातत्त्वविद्या आणि मानवशास्त्र या दोन्हींमध्ये वसाहतवादी विचारसरणी होती. प्राचीन काळासंबंधी चर्चेत प्रतीकांचा आणि धर्माशी संबंधित परंपरांचा विचार केला जातो. हे करताना संशोधकांच्या संस्कृतीमधील नैतिक व सामाजिक चैाकटी लादल्या जातात, कारण पुरातत्त्वविद्या अद्याप वसाहतवादी मनोवृत्तीतून मुक्त झालेली नाही, असा देशी पुरातत्त्वाच्या समर्थकांचा सार्थ आक्षेप आहे.

कोणत्याही काळात राजकीय सत्ता आणि सांस्कृतिक प्रभुत्व यांचा परिणाम सामाजिक संरचनांवर होत असतो. ज्यांचे राजकीय वर्चस्व त्यांच्या सांस्कृतिक, धार्मिक व नीतीमूल्यांच्या चैाकटी ’योग्य’ ठरतात. पुरातत्त्वीय व ऐतिहासिक पुराव्यांचा अर्थ लावताना भाषा हेच माध्यम असल्याने भाषिक वर्चस्वही ओघानेच येते. विशेषतः अठराव्या व एकोणिसाव्या शतकात पुरातत्त्वाचे आणि मानवशास्त्राचे यूरोपीय अभ्यासक वसाहतींमधील लोक हीन असून ते दुय्यम दर्जाचे अथवा पूर्णपणे असंस्कृत होते, असेच मानत. त्यानुसार यूरोपीय लोकांनी त्यांच्या दृष्टीने अज्ञात जगातील संस्कृतींकडे बघताना प्रामुख्याने आपल्या समाजात प्रचलित सामाजिक नीतीमूल्यांवर आधारित विचार केला. अशा सर्व प्रकारच्या बाह्यचौकटी झुगारून पुरातत्त्वविद्येला वसाहतवादी मूल्यांच्या जोखडातून मुक्त करणे (decolonization) व स्थानिक रहिवाशांच्या दृष्टिकोनानुसार त्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाकडे बघू देणे, हा देशी पुरातत्त्वाचा मुख्य गाभा आहे. असे केल्याने वसाहतवादी व साम्राज्यवादी प्रभावामुळे भूतकाळाचे जे चुकीचे चित्र उभे राहिले, ते बदलेल आणि स्थानिक लोक आपल्या परंपरेनुसार इतिहासातील घटनांचा अर्थ लावू शकतील.

स्थानिक अथवा मूळ निवासी अशा अर्थाने ’पहिले लोक’ हा शब्द महत्त्वाचा आहे. त्याचा अर्थ ‘मूळ जागेपासून वंचित केले गेलेले लोकसमूह’ असा आहे. अर्थात असे म्हणत असताना स्थानिक कोण आणि बाहेरचे कोण हे कालसापेक्ष असते, याची अभ्यासकांना जाणीव आहे. कारण संपूर्ण जगात हजारो वर्षांपासून सातत्याने स्थलांतरे घडत आहेत. स्थलांतरीत लोकसमूह काही काळाने स्थानिक लोकसमूहांमध्ये मिसळून जातात. तथापि ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया, व अमेरिका खंडांमध्ये यूरोपीय वसाहतवादी सत्तांची आक्रमणे होण्याच्या अगोदर नांदत असलेल्या सर्व सांस्कृतिक प्रवाहांना व विचारधारांना ‘देशी’ समजावे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. अशा सर्व समांतर सांस्कृतिक प्रवाहांचा विचार पुरातत्त्वीय अर्थनिष्पत्तीत करावा, असा देशी पुरातत्त्वाच्या समर्थकांचा आग्रह आहे. प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया व पॅसिफिक महासागरातील बेटांवरील आदिवासी, उत्तर व दक्षिण अमेरिकेतील ‘इंडियन’ हे कोलंबसपूर्व स्थानिक रहिवासी आणि आफ्रिकेतील आदिवासी लोकांच्या पुरातत्त्वीय वारशाच्या अभ्यासातून या दिशेने कामाला सुरुवात झालेली आहे. परंतु स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशा प्रकारच्या अगोदरच जगभर चालू असलेल्या राजकीय संघर्षाला पाठबळ मिळेल, असे प्रतिपादन देशी पुरातत्त्वावर टीका करणाऱ्यांनी केले आहे.

संदर्भ :

  • Atalay, Sonya, ‘Indigenous Archaeology as Decolonizing Practice’, The American Indian Quarterly, 30 (3-4): 280-310, 2006.
  • Bruchac, Margaret M.; Siobhan, M. Hart & H. Martin Wobst, Eds., Indigenous Archaeologies, California, 2010.
  • Colwell-Chanthaphonh, C. ‘Archaeology and indigenous collaboration’, Archaeological Theory Today (Ian Hodder Ed.), pp. 267-291, Cambridge, 2012.
  • Murray, T. ‘Archaeologists and indigenous people : A maturing relationship?, Annual Review of Anthropology, 40 (1) : 363-381, 2011.

                                                                                                                                                                    समीक्षक : सुषमा देव