प्रस्तावना : गृहभेटी देऊन आरोग्याची काळजी घेणे ही आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक परिचर्येची पारंपरिक पद्धत आहे. ज्या योगे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य संवर्धन, आजाऱ्याची शुश्रूषा करणे साध्य होते.

कुटुंब : विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तक विधान यांच्या संबंधांनी एकवटलेल्या एक घरात पति-पत्नी, आई-वडिल, भाऊ–बहिण यांच्या समान सामाजिक भूमिकेतून परस्पर संबंध देऊन एका सामाईक संस्कृतीची निर्मिती करणाऱ्या व्यक्तींच्या समूहास कुटुंब संबोधिले जाते.

कौटुंबिक आरोग्य परिचर्या (Family Oriented Nursing Care) : ज्यात कुटुंबाचा विकास, चांगले आरोग्य, आरोग्याचे संवर्धन, उपचारात्मक सेवा आणि  आवश्यकतेप्रमाणे व्यक्तीचे आजारातून पुनर्वसन या सर्वव्यापी सेवा शुश्रूषा यांचा समावेश केला जातो.

 कौटुंबिक आरोग्य परिचर्या – उद्दिष्टे :

  • आरोग्याचे मूल्यांकन करून व्यक्तीच्या आरोग्य समस्या शोधणे.
  • कुटुंबाला आरोग्य समस्येविषयी स्वीकार करण्यास मदत करणे.
  • सदस्य स्वत:हून ज्या सेवा शुश्रूषा घेऊ शकत नसतील त्या सेवा गरजेनुसार पुरविणे. उदा., मधूमेह आजारात इन्शूलिन सारखे इंजेक्शन देणे किंवा घेण्यास शिकवणे.
  • आरोग्य समस्येमुळे येणारा ताणतणाव कमी करण्यास मदत.
  • कुटुंबातील सदस्यामध्ये एखाद्या क्लिष्ट आजारावर मात करण्यास सहाय्य करणे. उदा., कॅन्सर ट्रिटमेंट.
  • व्यक्तिच्या वैयक्तिक व सामाजिक विकासासाठी साहाय्य करणे. उदा., सामाजिक कल्याण योजनांची माहिती पुरविणे.
  • सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊन सुदृढ नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी प्रेरणा देणे. उदा., शाळा किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग.
  • घरातील सुरक्षितता; वातावरणातील दूषित पाणी, हवा यांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक तेव्हा मार्गदर्शन देणे.
  • कुटुंबातील सदस्यांना कल्याणकारी योजनांची माहिती पुरविण्यास मदत करणे.

गृहभेटी – कौटुंबिक आरोग्य सेवेचे एक माध्यम : सामाजिक परिचारिका गृहभेटी देऊन आरोग्य सेवा देण्याचे पारंपरिक माध्यम म्हणून उपयोगात आणते.

अ) गृहभेटीचे आरोग्य सेवेसाठीचे हेतू :

  • आरोग्य संवंर्धन करणे.
  • आजारी व्यक्तिची गृह-शुश्रूषा.
  • दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरची गृह आरोग्य सेवा.
  • सदस्यांना आरोग्याचे संरक्षण करण्यास मदत करणे.

आ) गृहभेटीद्वारे आरोग्य सेवा देण्याचे उद्दिष्ट :

  • रोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे.
  • कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या गरजेनुसार सेवा देणे.
  • रोगाविषयी माहिती देऊन स्वीकार करण्यास मदत करणे.
  • सर्व सदस्यांचे सर्वसाधारण आरोग्यमान सुधारण्यास मदत करणे.

इ) परिचारिकेने गृहभेटी देताना लक्षात ठेवावयाचे मुद्दे :

  • सेवा देताना संपूर्ण कुटुंब हा आरोग्य सेवेचा मूलभूत घटक आहे असे लक्षात ठेऊन सेवा द्यावी.
  • गृहभेटीचे नियोजन आरोग्याच्या गरजेतून करावे.
  • गृहभेटीद्वारे सेवा देताना आपण ज्या आरोग्य केंद्रामार्फत कार्यरत आहोत त्या केंद्राच्या सेवेचे नियम व पॉलिसी यांचे अधीन राहूनच सेवा देणे.
  • गृहभेटीतून सेवा शुश्रूषा देताना कुटुंब सदस्यांसोबत सहानुभूतीपूर्वक वागणूक असावी.
  • गृहभेटीच्या माध्यमातून सेवा देताना परिचारिका शास्त्रशुद्ध ज्ञानाचा उपयोग करते. उदा., समाजशास्त्र, मानसशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, आहारशास्त्र इ.
  • गृहभेटीदरम्यान कमी बोलणे व अधिक श्रवण करण्याची क्रिया असावी.
  • कुटुंब सदस्यासाठी किंवा सदस्यांकरिता कार्यपद्धती न अवलंबिता सदस्यांसमवेत कार्यपद्धतीचा अवलंब करावा.
  • प्रत्येक गृहभेटीनंतर केलेल्या कामाचे मूल्यांकन करावे.

ई) गृहभेटीद्वारे दिलेल्या आरोग्य परिचर्येचे फायदे :

  • परिचारिका गृहभेटीच्या दरम्यान कौटुंबिक वातावरण प्रत्यक्षपणे बघू शकते. त्याचा आरोग्य समस्येच्या उपाययोजना करताना उपयोग होतो.
  • कुटुंबातील सदस्यांना सर्वसाधारण आरोग्य शिक्षण देत असताना घरात उपलब्ध साधनांचा व वस्तुंचा उपयोग करून अधिक सोप्या पद्धतीने समजावून देण्यास मदत होते. उदा., बहु उद्देशीय आहार, मातेने नवजात शिशुला स्तनपान करण्याच्या पद्धती.
  • गृहभेटीदरम्यान घरातील सदस्य आरोग्य समस्येविषयी खात्रीशीर आणि घरगुती वातावरणात मोकळेपणाने चर्चा करू शकतात.
  • परिचारिकेला कुटुंबसदस्याने आजारी व्यक्तीला द्यावयाच्या शुश्रूषेची प्रत्यक्षपणे देखभाल करून मार्गदर्शन करता येते.
  • गृहभेटीच्या माध्यमातून कुटुंबात काही नवीन आजार किंवा आरोग्य समस्या निर्माण झाल्याची नोंद घेता येते.

 

सारांश : गृहभेटी या तीन स्तरावर केल्या जातात –

      • गृहभेटी पूर्व तयारी,
      • गृहभेटी दरम्यान केलेली कृती व कार्यपद्धती,
      • गृहभेटी पश्चात केलेल्या कृतीचे समायोजन (लेखी नोंद करून पुढील भेटीची तारीख ठरविणे).

संदर्भ :

  • फ्रिमेन : पब्लिक हेल्थ ‍ नर्सिंग प्रॅक्टिस.
  • नाजू कोतवाल : पब्लिक हेल्थ मॅन्यूअल.