आग्नेय आशियातील एक प्रमुख, तर म्यानमार (बह्मदेश) मधील सर्वांत लांब व इरावतीनंतरची दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वपूर्ण नदी. एकूण लांबी सुमारे २,४०० किमी. सॅल्वीनला चीनमध्ये न्यू चिआंग किंवा न्यू जिआंग म्हणतात. तसेच तिला बर्मी लोक थानल्वीन, तर शान लोक नाम काँग या नावाने संबोधतात. ओसाड व प्रामुख्याने वाऱ्याचे कार्य प्रभावी असणाऱ्या पूर्व तिबेटमधील टांगला पर्वतश्रेणीत सॅल्वीनचा उगम होतो. याच प्रदेशात मेकाँग, यांगत्सी व ह्वँगहो नद्यांची उगमस्थाने आहेत. तिबेटची उच्चभूमी, चीनचा यूनान प्रांत व पूर्व म्यानमारमधून वाहत जाऊन ही नदी मोलमाइन येथे मार्ताबानच्या आखाताद्वारे अंदमान समुद्राला मिळते.

सॅल्वीन नदी उगमानंतर तिबेटमध्ये उंच टेकड्यांधील अरुंद व खोल घळयांमधून आग्नेय दिशेत वाहते. ती मेकाँग व यांगत्सी नद्यांना साधारणपणे समांतर वाहत जाते. येथे एके ठिकाणी मेकाँग नदीखोऱ्यापासून सॅल्वीन नदीचे खोरे केवळ ४८ किमी. अंतरावर आहे. त्यानंतर ती चीनच्या यूनान प्रांतातून दक्षिणेस वाहत जाऊन म्यानमारमध्ये प्रवेश करते. चीनमधील यूनान पठाराचे या नदीने बरेच अपक्षरण केले असून तिथे तिने अरुंद व खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. या प्रदेशात सॅल्वीन नदीपात्रापासून बऱ्याच उंचीवरून वेगाने वाहत येणाऱ्या प्रवाहांद्वारे या नदीला पाणीपुरवठा होतो.

म्यानमारमध्ये सॅल्वीन दक्षिणवाहिनी आहे. पूर्व म्यानमारमधील शान पठाराच्या साधारण मध्यातून वाहणाऱ्या या नदीने शानचे पठार व कारेन टेकड्यांचे खनन करून आपला प्रवाहमार्ग तयार केलेला आहे. नाम पांग, नाम तेंग, नाम पॉन या पश्चिमेकडून, तर नाम टिंग, नाम ह्का व नाम ह्सिम या पूर्वेकडून मिळणाऱ्या सॅल्वीनच्या उपनद्या आहेत. शान पठाराच्या उत्तरेस एकही मोठी किंवा महत्त्वाची उपनदी सॅल्वीनला येऊन मिळत नाही. म्यानमारमध्ये कारेन टेकड्यांपासून पुढे गेल्यावर तिने म्यानमार – थायलंड दरम्यानची १२० किमी. लांबीची सरहद्द निर्माण केली आहे. येथे तिला आग्नेयीकडून म्यानमार – थायलंड सरहद्दीवरून वाहत येणारी थाउंगजिन ही उपनदी येऊन मिळते. त्यानंतर सॅल्वीन पुन्हा म्यानमारमधून वाहू लागते. या प्रदेशात तिला पश्चिमेकडून युंग्झालिन, तर पूर्वेकडून ग्याइंग आणि आट्टाराम या प्रमुख उपनद्या येऊन मिळतात. सॅल्वीनला मिळताना तिच्या उपनद्यांनी प्रपातमाला किंवा महाप्रपात निर्माण केले आहेत. म्यानमारमध्ये मोलमाइन बंदराजवळ ही नदी दोन प्रमुख शाखांनी मार्ताबान आखाताद्वारे अंदमान समुद्राला मिळते. येथील बलूजुन बेटाच्या उत्तरेकडून व दक्षिणेकडून या दोन शाखा वाहतात. त्यांपैकी दक्षिणेकडील शाखा अधिक महत्त्वाची आहे; कारण तिच्यातूनच मोलमाइनपर्यंत महासागरी जहाजे येत असतात. मोलमाइनजवळ सॅल्वीन व ग्याइंग या नद्यांनी लहानसा त्रिभूज प्रदेश तयार केला आहे.

ऋतूमानानुसार नदीतील पाण्याच्या पातळीत बरीच तफावत आढळते. कोरड्या ऋतूत पाण्याचे प्रमाण बरेच कमी होऊन पात्रातील दगड-गोटे, वाळू उघडी पडलेली दिसते; मात्र

पावसाळ्यात पाण्याची पातळी सरासरी २० मी.ने किंवा कधीकधी त्यापेक्षाही अधिक म्हणजे जवळजवळ २७ मी.पर्यंत वाढते. अरुंद व खडकाळ पात्र, धोकादायक धबधबे व द्रुतवाह आणि दोन्ही काठांवरील अगदी नदीपात्रापर्यंत येऊन भिडलेले खडकाळ कटक यांमुळे नदी लांबीने फार मोठी असली, तरीही जलवाहतूक, जलसिंचन किंवा व्यापारी दृष्ट्या निरूपयोगी असून प्रवाहमार्गातील द्रुतवाहांचा जलविद्युतनिर्मिती व जलसिंचनासाठी उपयोग करून घेता येऊ शकतो. उजव्या तीरावरील पॉनमार्गे वाहत येणाऱ्या पिलू या सॅल्वीनच्या उपनदीवर जलविद्युतनिर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे.

बर्मा रोड (ह्यूटिंग ब्रिज) हा सॅल्वीन नदी ओलांडणारा प्रमुख मार्ग आहे. चीनने तेंग यूएह व ताली-फू यांदरम्यानच्या मार्गावर सॅल्वीन नदीवर हा पूल बांधला आहे. शान पठारावरील टकवा व कुनलँग येथे फेरी मार्गाने नदी ओलांडली जाते. खालच्या टप्प्यातील साधारण १६० किमी.पेक्षा कमी लांबीच्या पात्रातून जलवाहतूक केली जाते. काही ठिकाणी केवळ स्थानिक पातळीवर जलवाहतूक चालते. युंझाली व क्यायुख्यात नद्यांच्या मुखांदरम्यानची सॅल्वीनची घळई अतिशय खडतर आहे. आग्नेय म्यानमारमधील जंगलातील सागाच्या लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी मात्र या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. खालच्या टप्प्यात नदीची पठारी भागातील वैशिष्ट्ये आढळत नाहीत. मोलमाइन बंदरापासून ६३ किमी. आत असलेल्या श्वेनिनपर्यंत हलक्या होड्या जातात. मोलमाइन वगळता नदीवर फार मोठी नगरे नाहीत.

समीक्षक : माधव चौंडे