नाथ संप्रदायातील एक महान गुरू. हठयोगातील महान नाथ-योगी. मत्स्येंद्रनाथांचे शिष्य. गोरक्षनाथांना बोली भाषेत ‘गोरखनाथ’ या नावाने संपूर्ण भारतीय उपखंडात ओळखतात. दक्षिण भारतात ‘कोरक्कर नाधार’ हे त्यांचे नाव प्रचलित आहे. गोरक्षनाथांच्या जन्मभूमीविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत. गोरक्षसहस्रनामस्तोत्र या ग्रंथात ते ‘बडव’ नावाच्या प्रदेशाचे रहिवासी असल्याचा उल्लेख आहे. योगसंप्रदायाविष्कृती या ग्रंथात ते गोदावरी तीरावरील ‘चंद्रगिरी’ येथील असल्याचे सांगितले आहे.

गोरक्षनाथांचे शिल्प, पिंपरी-दुमाला.

गोरक्षनाथांचे अनेक साहित्यिक संदर्भ सापडतात. त्यांचा सर्वांत प्राचीन संदर्भ तेराव्या शतकाच्या सुरुवातीला विभूतीचंद्रांच्या अमृतकणीकोद्योतनिबंध या ग्रंथात सापडतो. त्यानंतर त्यांचे संदर्भ तेराव्या शतकातील हरिहराच्या कन्नड रगळे विशेषतः रेवणसिद्धेश्वर रगळे, मराठीतील लीळाचरित्रज्ञानेश्वरी तसेच मत्स्येंद्रसंहिता या ग्रंथांत आलेले आहेत. त्यांचे नाव वर्णरत्नाकराच्या चौऱ्याऐंशी सिद्धांच्या सूचीसह इतर सर्व सूचींमध्ये आढळते. नवनाथांच्या काही सूचींमध्येही त्यांचे नाव आहे. सन १३६३ मधील शारंगधरपद्धतीतही त्यांचे उल्लेख आलेले आहेत. चौदाव्या शतकानंतर बऱ्याच ग्रंथांमध्ये त्यांचे नाव व त्यांच्या संबंधित कथांचे उल्लेख पाहायला मिळतात.

काही शिलालेखांमध्येही गोरक्षनाथांचे उल्लेख आलेले आहेत. त्यांमध्ये कर्नाटकातील १२७९ सालच्या कल्लेश्वर शिलालेखात, तसेच १२८७ च्या सोमनाथ येथील शिलालेखातही त्यांचे नामोल्लेख येतात. सोमनाथ येथील शिलालेखात त्यांचे नाव पाशुपत प्रवर्तक लकुलीशाबरोबर पंचदेवतांमध्ये सामील केले आहे. यावरून असेही सिद्ध होते की, तेराव्या शतकात त्यांना देवत्व प्राप्त झालेले होते. बाराव्या शतकात गोरक्षनाथ श्री पर्वतावरील एका मठाचे मठाधिपती असल्याचे सांगितले जाते.

गोरक्षनाथांशी अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. एका आख्यायिकेनुसार, त्यांचे रक्षण शेणाच्या ढिगाऱ्यामुळे झाले होते, म्हणून त्यांना गोरक्षनाथ म्हटले गेले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ते गुराखी होते. एकदा ते गाई पाळत होते, तेव्हा तेथे मत्स्येंद्रनाथ आले व त्यांनी गोरक्षनाथांना आपले शिष्य बनविले. मत्स्येंद्रनाथांच्या आदेशामुळे गोरक्षनाथांनी चौरंगीनाथांची शुश्रूषा केली.

गोरक्षनाथांच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत. गोरक्षसंहिता, विवेकमार्तंड, गोरक्षशतक, योगबीज, अमनस्कयोग हे त्यांपैकी काही उल्लेखनीय ग्रंथ होत. चौदाव्या शतकातील अमरौघप्रबोध या संस्कृत रचनेचे श्रेयही त्यांना दिले जाते. गोरक्षनाथांच्या नावावर काही हिंदी रचनासुद्धा सांगितल्या जातात. हठयोग विद्येच्या विकासात गोरक्षनाथांचे योगदान अनन्यसाधारण आहे. नाथ संप्रदायातील परंपरेनुसार मत्स्येंद्रनाथांना त्यांचे गुरू म्हटले जाते, तर अमरनाथ, गहिनीनाथ, भर्तृहरी, गोपीचंद, विमलनाथ, मल्लिकानाथ यांना गोरक्षनाथांचे शिष्य संबोधले जाते. गोरक्षनाथांचा संबंध हठयोग व रसविद्येशी जोडला जातो. रस-सिद्धांच्या सूचींमध्ये त्यांचे नाव आढळते. नवनाथभक्तिसार या ग्रंथात गोरक्षनाथांना हरिनारायणाचा अवतार म्हटले आहे.

गोरक्षनाथ शिल्प, दभोई (गुजरात).

गोरक्षनाथांचा गाई-गुरांशी असलेल्या संबंधामुळे त्यांना मूर्तिकलेत गाईंसोबत दर्शविले जाते. भारताच्या विभिन्न भागांत त्यांची शिल्पे पाहावयास मिळतात. महाराष्ट्रातून त्यांची सु. तेराव्या शतकातील शिल्पे सिंदखेड राजा व पन्हाळे काजी येथील लेणी क्र. १४ मधून प्राप्त झाली आहेत. त्यांची चौदाव्या शतकातील अन्य शिल्पे पन्हाळे काजी येथील लेणी क्र. २९ व पिंपरी-दुमाळा येथील सोमेश्वर मंदिरावर कोरलेली दिसून येतात.

ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तसेच नेपाळमध्येही गोरक्षनाथांची शिल्पे आढळून आली आहेत. ओडिशा राज्यातील मेघेश्वर येथील मेघेश्वर मंदिर व नियाली येथील शोभनेश्वर मंदिरावरील त्यांची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांपैकी मेघेश्वर मंदिरावरील शिल्प बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात कोरलेले आहे, हे तेथे असलेल्या एका शिलालेखातून स्पष्ट होते. गुजरातमध्ये महुडी तोरणद्वार (दभोई), चित्रेश्वरी मंदिर (वडनगर) व अहमदाबाद संग्रहालयात त्यांची शिल्पे पाहावयास मिळतात. दभोई येथील महुडी तोरणद्वारावर त्यांचे शिल्प चौऱ्याऐंशी सिद्धांसमवेत कोरलेले आहे. मध्य प्रदेशातील मोरेना जवळील ‘नरेसर’ येथून त्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प प्राप्त झाले आहे. त्यात त्यांना आदिनाथ, चौरंगीनाथ व मत्स्येंद्रनाथ (संभवतः) समवेत शिवलिंगावर दाखविले आहे. श्रीशैलम् येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या प्राकारावर त्यांच्या जीवनातील प्रसंग कोरलेले आहेत. त्यामध्ये त्यांना गाई-गुरे व मत्स्येंद्रनाथांच्या सोबत दाखविण्यात आलेले आहे. आंध्र प्रदेशातील बोज्जनकोंडा (संकाराम) येथील बौद्ध लेणीत त्यांचे एक शिल्प मत्स्येंद्रनाथांसोबत कोरलेले आहे. नेपाळमधील काठमांडू येथील गोरक्षनाथ मंदिरात त्यांचे सुमारे चौदाव्या शतकातील शिल्प आहे. सर्वत्र त्यांची शिल्पे थोड्या-फार फरकाने एकसारखीच दिसतात.

गोरक्षनाथांना मूर्तिकलेत गाईंसोबत दर्शविले जाते, तसेच केयूर (दंडातील कडे), वलय (कडे), यज्ञोपवीत (जानवे), कर्णकुंडले व हातात दंड असा त्यांचा सर्वसाधारणपणे वेश दर्शवितात. बहुतेक वेळा त्यांना गोमुखासनात किंवा स्थानक अवस्थेत दाखवतात.

भारतीय उपखंडात त्यांच्याशी संबंधित काही स्थाने पारंपरिक दृष्टीने महत्त्वाची समजली जातात. तेथे त्यांच्याशी संबंधित मंदिरे आजही आहेत. यांमध्ये गोरखपूर (उत्तर प्रदेश), पाकिस्तानातील पेशावर येथील गोरखनाथ मंदिर, गोरखनाथ गुफा, फारफिंग, पाटण (नेपाळ), जगतसिंहपूर (ओडिशा), सदुरागिरी (तमिळनाडू) व महाराष्ट्रातील त्रिंबकेश्वर (नाशिक जिल्हा), टवळाई (नंदुरबार जिल्हा), डोंगरगण (अहमदनगर जिल्हा), बत्तीस-शिराळा (सांगली जिल्हा) इत्यादी स्थळे प्रसिद्ध आहेत. नाशिक-त्रिंबकेश्वर येथील कुंभमेळ्यानंतर ‘नवनाथ झुंडी’चे आयोजन केले जाते. यामध्ये गोरक्षनाथांच्या पादुका त्रिंबकेश्वर येथून कर्नाटकातील मंगळूर येथील कदरीपर्यंत नेल्या जातात. ही परंपरा खूप प्राचीन सांगितली जाते.

संदर्भ :

  • Dowman, K. Masters of Mahamudra : Songs and Histories of the Eighty-Four Buddhist Siddhas, Albany: State University of New York Press, 1985.
  • ढेरे, रा. चिं. नाथ संप्रदायाचा इतिहास, पुणे, २०१०.
  • द्विवेदी, हजारीप्रसाद, नाथ संप्रदाय, अलाहाबाद, १९५०.

                                                                                                                                           समीक्षक : अभिजित दांडेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.